"मी कधीच काम मागायला गेलो नाही", असं का म्हणाला उपेंद्र?
16-Dec-2023
Total Views |
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : प्रत्येक कलाकाराचे प्रमुख ध्येय असते प्रेक्षकांना एक अजरामर भूमिका देणे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मागे वळून पाहिले तर अनेक दिग्गज अभिनेत्यांनी नव्या पिढीसाठी मनोरंजनाचा पिटारा साठवून ठेवला आहे. याच फळीतील एक गुणवंत कलाकार म्हणजे अभिनेता उपेंद्र लिमये. सध्या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरच्या तोडीस तोड भूमिका साकारल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार विजेता उपेंद्र लिमये चर्चेत आहे. मात्र, मी कधीच ही किंवा कोणतीही भूमिका मागायला गेलो नसल्याची कबूली उपेंद्र यांनी ‘महाएमटीबी’शी बोलताना दिली.
मी कधीच कुणाकडे काम मागितले नाही
चित्रपटातला नट उंच, गोरा पान, देखणा असावा असा अपेक्षा दिग्दर्शकांच्या नक्कीच असतात. मात्र, केवळ ताकदीच्या अभिनयाची पुंजी गाठीशी बांधून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या उपेंद्र यांनी कधीच कुणाकडे काम मागितले नसल्याची कबूली प्रामाणिकपणे दिली. “मला कोणत्याही भूमिकेसाठी नकार मिळाला नाही याचे कारण असे की मी कधीच कुणाकडे काम मागायला गेलो नाही. माझा पहिला चित्रपट होता दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा मुक्ता चित्रपट. तिथपासून सुरु झालेला माझाय चित्रपटांचा प्रवास अविरतपणे अजूनही चालूच आहे, ज्यात मला विविधांगी भूमिका मिळत आहेत. गेल्या ३० वर्षांच्या मला अभिनय क्षेत्रातील या कारकिर्दित मी निभावलेले प्रत्येक पात्र मला त्या-त्या दिग्दर्शकांनी माझ्या अभिनय क्षमतेवर विश्वास ठेवून मला त्या भूमिका देऊ केल्या आहेत. जोगवा, मुळशी पॅटर्न, पेज ३, सरकार राज, ट्रॅफिक सिग्नल अशा अनेक भूमिका या विभिन्न असून मला माझ्या अभिनयाच्या अनुभवावरुन साकारता आल्या याचा आनंद आहे. अजून एक महत्वाची बाब म्हणजे मी जोपर्यंत काम करत राहणार आहे तोपर्यंत मी अधिक उत्तम नट होण्याच्या प्रयत्नात आणि शोधात असणार आहे”.
दरम्यान, उपेंद्र लिमये यांनी आजवर ‘जोगवा’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘पेज ३’, ‘सरकार राज’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘आणीबाणी’, ‘यल्लो’, ‘सावरखेड एक गाव’, ‘चांदनी बार’, अशा अनेक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले आहे.