"निळू फुलेंनी लॅंडलाईनवर फोन करुन...",उपेंद्र लिमयेंनी सांगितला खास किस्सा

    14-Dec-2023
Total Views | 75
 
 
nilu phule and upendra
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : आपल्या ठसकेबाज अभिनयाची प्रेक्षकांसह इतर भाषिक दिग्दर्शकांवर अशी छाप सोडायची की आपल्यासाठी छोटेखानी का होईना पण ताकदीचा एक मोठ्या चित्रपटातला भाग साकारण्याची संधी समोरुन चालून आली पाहिजे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी अशीच काहीशी कामगिरी केली असून थेट दाक्षिणात्य दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनाही उपेंद्रच्या कामाची भूरळ पडली आणि त्यांनी आग्रह करत रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटात उपेंद्रसाठी विशेष उल्लेखनीय भूमिका लिहिली. ‘ॲनिमल’ चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातला आहेच, पण रणबीर सोबत मराठमोळ्या उपेंद्र लिमये यांच्या अभिनयाची देखील सर्वाधिक चर्चा केली जात आहे. नाटक, मालिकांपासून सुरु झालेला प्रवास करता करता उपेंद्र लिमये यांनी मराठीसह हिंदीत देखील उत्तम भूमिका साकारल्या. त्यांच्या अनेक भूमिकांपैकी पेज ३ चित्रपटातील कामासाठी ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी उपेंद्र यांचे विशेष कौतुक केले होते. त्याबद्दल ‘महाएमटीबी’शी बोलताना त्यांनी एक खास किस्सा सांगितला.
 
“मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार आणि माझे स्वत:चे आवडीचे कलाकार म्हणजे निळू फुले. त्यांनी पेज ३ चित्रपट पाहिल्यानंतर मला मोबाईल फोन नसल्याकारणाने मला लॅंडलाईवर फोन केला होता; आणि माझ्या कामाचे त्यांनी प्रचंड कौतुक केले होते. त्यानंतर सुहास जोशी ताईंना देखील आम्ही एकत्र मालिका करायचो त्यावेळी असा विश्वास होता की उप्या तुझं फार बरं होणार आहे, या म्हातारीला लक्षात ठेव. तर अशा दिग्गज कलाकारांच्या कौतुकामुळे आणि त्यांच्या आशिर्वादामुळे आज मी या क्षेत्रात आपले योगदान देऊ शकलो”, अशा शब्दांत त्यांनी आपल्या ज्येष्ठ कलाकारांचे आभार मानले.
 
उपेंद्र लिमये यांचे नाव जोगवा चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारावर कोरण्यात आले. उपेंद्र यांनी ३० वर्षांच्या आपल्या अभिनयाच्या प्रवासात ‘मुक्ता’, ‘सरकारनामा’, ‘सावरखेड एक गाव’, ‘चांदनी बार’, ‘पेज ३’, ‘ट्राफिक सिग्नल’, ‘शिवा’, ‘सरकार राज’, ‘आणीबाणी’, ‘येल्लो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तर, ’अतिरेकी’, ‘आम्ही जातो आमुच्या गावा’, ‘नियतीच्या बैलाला’ अशा नाटकांत आणि ‘दामिनी’, ‘नकाब’, ‘या सुखांनो या’, ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘समांतर’, अशा मालिकांमध्ये देखील अष्टपैलु भूमिका साकारल्या.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121