खादी ग्रामोद्योगाच्या नावाखाली शासनाच्या जागेचा खासगी कारणांसाठी गैरवापर

भाजप नेते प्रविण दरेकरांकडून चौकशीची मागणी

    15-Dec-2023
Total Views |
BJP MLA Pravin Darekar

नागपूर :
बोरिवली मधील ३० एकर महसुलाची जागा खादी ग्रामोद्योगाच्या नावाखाली एका ट्रस्टला दिली आहे. मात्र त्याचा तिथे खाजगी कारणांसाठी गैरवापर होताना दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तात्काळ चौकशीचे आदेश सरकारने द्यावेत अशी मागणी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात केली. त्याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारवाईचे आश्वासन दिले.

विधानपरिषद सदस्य सचिन अहिर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्या चर्चेत सहभाग घेत आमदार दरेकर म्हणाले की, बोरिवलीला जवळपास ३० एकर महसूलाची जागा खादी ग्रामोद्योगाच्या नावाखाली एका ट्रस्टला दिली आहे. आपण शासनाची ५०० ते हजार कोटीची जागा खासगी कार्यक्रमांसाठी देता. त्या जागेचे एक कोटी भाडे घेता आणि एकीकडे पैसे नाही बोलता. ही जागा तिकडे कुणीतरी हडप करतंय, त्याला कंपाउंड घालतंय, डेव्हलप करतंय नेमके हे प्रकरण काय आहे? जिल्हाधिकारी पाठीशी घालताहेत की अजून कोणी पाठीशी घालतेय? शासनाचा त्या जागेवर एखादा प्रकल्प होईल किंवा एखादी योजना होऊ शकते. याप्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश देऊन त्या जागेची माहिती घ्यावी आणि ती जागा शासन तात्काळ ताब्यात घेणार का? याचे उत्तर द्यावे, असे दरेकर म्हणाले.

दरेकर यांच्या प्रश्नावर बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शासनाच्या अशा ज्या जमिनी भाडेपट्ट्यावर दिल्या होत्या त्याचे उल्लंघन झाले आहे. त्या जमिनींचा अनधिकृत वापर होतोय. या सर्वबाबतीत स्पेशल ड्राइव्ह घेऊन या सर्व जमिनी शासनाकडे जमा करण्याबाबत कारवाई करू, असे आश्वस्त केले.