ट्रूडोंना मोठा धक्का! कॅनडात सुरु झाले रिव्हर्स स्थलांतर
13-Dec-2023
Total Views |
ओटावा : जगभरातील स्थलांतरीत संधीच्या शोधात कॅनडात जाऊन स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत असतात. कॅनडातील ट्रूडो सरकार सुद्धा देशातील वृद्धत्व आणि लोकसंख्या कमी होण्याचे मोठे आव्हान दूर करण्यासाठी जगभरातील स्थलांतरीतांचे आपल्या देशात स्वागत करते. पण आता समृद्ध आणि शांतताप्रिय जीवन जगण्याचे स्वप्न पाहून कॅनडात आलेले स्थलांतरीत, कॅनडातील वाढत्या महागाईमुळे पाठ फिरवत आहेत. अशी माहिती इन्स्टिट्यूट फॉर कॅनेडियन सिटीझनशिप या संस्थेच्या अभ्यासातून समोर आली आहे.
मागच्या काही दशकांमध्ये जगभरातील स्थलांतरीतांसाठी कॅनडा एक आश्वासक देश म्हणून समोर आला होता. या स्थलांतरीतांच्या लोढ्यांमुळे कॅनडाच्या वृद्ध होणाऱ्या लोकसंख्येला सुद्धा तारुण्य आले. एकीकडे विकसित पाश्चिमात्य देशांमध्ये लोकंसख्या घटत असताना, कॅनडाची लोकसंख्या वाढली आहे. जगभरातील स्थलांतरीतांनी कॅनडातील अर्थव्यवस्थेला सुद्धा हातभार लावला. पण आता कॅनडातील स्थलांतरीत वाढत्या महागाईला कंटाळून देश सोडत आहेत.
इन्स्टिट्यूट फॉर कॅनेडियन सिटीझनशिप या संस्थेच्या अहवालानुसार,२०१९ मध्ये कॅनडा सोडणाऱ्या स्थलांतरितांचा दर दोन दशकांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. कॅनडा सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत सुमारे ४२,००० लोकांनी कॅनडाची नागरिकता सोडली आहे. तर, २०२२ मध्ये ९३,८१८ लोकांनी आणि २०२१ मध्ये ८५,९२७ लोकांनी कॅनडा सोडला आहे. ही आकडेवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारसाठी धक्कादायक आहे.
कॅनडामध्ये ट्रूडो यांना स्थलांतरितांचा पाठीराखा म्हणून पाहिलं जातं. पण त्यांच्याच कार्यकाळात कॅनडामध्ये रिव्हर्स स्थलांतर चालू झाले आहे. या आयसीसी या संस्थेच्या अहवालानुसार, कॅनडातील रिव्हर्स स्थलांतराचे सर्वात मोठे कारण आहे, ते म्हणजे वाढती महागाई. कॅनडामध्ये घराच्या किमती आणि भाडे गगणाला भिडले आहे. एकूण उत्पादनाचा ६० टक्के खर्च हा फक्त घराचे भाडे देण्यासाठी करावा लागत आहे. याच महागाईला कंटाळून स्थलांतरीत कॅनडाकडे पाठ फिरवून नवीन देशात स्थायिक होत आहेत.