अमेरिकेत उपाध्यक्षपदासाठीही मोठी स्पर्धा

    13-Dec-2023   
Total Views |
Article on Upcoming USA Presidential Election

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध अमेरिकेच्या न्यायालयात अनेक खटले चालू असून, त्यांचा ट्रम्प यांच्या उमेदवारीवर परिणाम होऊ शकतो. तसे न झाल्यास या वादविवादांतून अमेरिकेच्या अध्यक्षपदापेक्षा उपाध्यक्षपदाचा उमेदवार मिळण्याची शक्यता मोठी आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. दि. १५ जानेवारीपासून आयओवा राज्यातून अध्यक्षीय उमेदवारांच्या निवड प्रक्रियेला प्रारंभ होईल. अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये दोन्ही पक्षांचे सदस्य मतदानाद्वारे आपला उमेदवार निवडतात. काही राज्यांमध्ये पक्षाच्या मेळाव्यांत उमेदवाराची निवड केली जाते. निवड केलेल्या उमेदवाराला त्या-त्या राज्यात असलेल्या अध्यक्षीय मतांच्या प्रमाणात मतं मिळतात. पक्षाचे मोठे देणगीदार आणि वरिष्ठ सदस्यांकडे काही मतं असतात. जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्ये दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होऊन, त्यात अध्यक्षीय उमेदवारांची औपचारिक निवड केली जाते. जो बायडन यांनी २०२४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये आपण लढणार असल्याचे घोषित केले असल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षात त्यांना आव्हान दिले जाण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपण निवडणूक लढण्याचे घोषित केले आहे. ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड होण्यापूर्वी पक्षातील आव्हानवीरांचा मात्र सामना करावा लागणार आहे.

अमेरिकेतील निवडणुका तशा प्रचंड खर्चिक असतात. अध्यक्षीय उमेदवाराला देणग्यांच्या रुपात प्रचारासाठी हवा तितका पैसा उभारण्याचे स्वातंत्र्य असले, तरी नवख्या उमेदवारांना पक्षाच्या देणगीदारांच्या नजरेत भरण्यापूर्वी स्वतःच्या खिशातून मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यामुळे केवळ गडगंज श्रीमंत असलेले किंवा राजकारणात स्वतःला प्रस्थापित केलेले लोकच अध्यक्षीय निवडणुका लढू शकतात. त्यामुळे अमेरिकेत महत्त्वाच्या वृत्त माध्यमांवर इच्छुक उमेदवारांमध्ये वादविवादाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये इच्छुक उमेदवारांना सामान्य लोकांचे आणि देणगीदारांचे लक्ष आकृष्ट करून घेण्याची चांगली संधी मिळते. रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये वादविवादाची पहिली फेरी दि. २४ ऑगस्ट रोजी पार पडली. त्यात दहा इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. दि. ६ डिसेंबरला या इच्छुकांमध्ये चर्चेची चौथी फेरी पार पडली. त्यात अवघे चार उमेदवार सहभागी झाले होते. बाकीच्या उमेदवारांना पैसा किंवा लोकप्रियतेच्या अभावी माघार घ्यावी लागली. त्यामध्ये अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष माईक पेन्स यांचाही समावेश होता.

डोनाल्ड ट्रम्प आजही रिपब्लिकन पक्षात सर्वात लोकप्रिय नेते आहेत. पक्षाच्या ६१ टक्क्यांहून अधिक मतदारांचा त्यांना पाठिंबा असून, उर्वरित चार उमेदवारांपैकी फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसॅन्टिस आणि अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील माजी राजदूत निकी हेली यांची लोकप्रियता ११ टक्क्यांहून अधिक असून विवेक रामास्वामी यांना पाच टक्के लोकांचा पाठिंबा आहे. न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर ख्रिस्त ख्रिस्ती यांना दोन टक्के लोकांचा पाठिंबा आहे. सुमारे आठ टक्के लोकांचा कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत निर्णय झाला नाहीये. असे असूनही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला जाणीवपूर्वक इच्छुकांमधील वादविवादांपासून दूर ठेवले आहे. त्यांना वाटत असावे की, चर्चेत सहभागी होणे म्हणजे आपण त्यांच्या बरोबरीचे असल्याचे मान्य केल्यासारखे आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध अमेरिकेच्या न्यायालयात अनेक खटले चालू असून, त्यांचा ट्रम्प यांच्या उमेदवारीवर परिणाम होऊ शकतो. तसे न झाल्यास या वादविवादांतून अमेरिकेच्या अध्यक्षपदापेक्षा उपाध्यक्षपदाचा उमेदवार मिळण्याची शक्यता मोठी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक लढण्यास अपात्र ठरवल्यास त्यांची जागा फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसॅन्टिस घेतील, असे गेले वर्षभर बोलले जात असले, तरी डिसॅन्टिस यांची कामगिरी फारशी लक्षवेधी नाही. अमेरिकेच्या सैन्यात सेवा बजावलेले ते एकमेव उमेदवार असल्याने युक्रेन तसेच गाझा पट्टीतील युद्धात आपल्या अनुभवाचा उपयोग होऊ शकेल, असे त्यांना वाटते. अमेरिकेच्या युक्रेनमधील युद्धाला रिपब्लिकन पक्षामध्ये फारसा पाठिंबा नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात अनेकदा युद्धाची धमकी दिली असली, तरी प्रत्यक्षात त्यांनी कोणतेही नवीन युद्ध सुरू केले नव्हते. रिपब्लिकन पक्षात निकी हेली आणि ख्रिस ख्रिस्ती यांचा युक्रेनला मदत चालू ठेवण्यास पाठिंबा आहे.

डिसॅन्टिस यांचे तळ्यात मळ्यात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये भूभागाचा वाद आहे. पुतीन हुकूमशाही वृत्तीचे असून, ते लोकशाही मानणार्‍या सर्व देशांसाठी धोका आहेत, हा तर्क त्यांना मान्य नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि रामास्वामी यांचा युक्रेनला मदत करण्यास पूर्ण विरोध आहे. रामास्वामी यांचे म्हणणे आहे की, “अफगाणिस्तान आणि इराकमधील अनावश्यक युद्धांमुळे अमेरिकेच्या डोक्यावर सात लाख कोटी डॉलरचे कर्ज चढले आहे.“ आपल्या स्पर्धकांच्या परराष्ट्र धोरणातील अनुभवाला आव्हान देत, त्यांनी संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत असलेल्या निकी हेली यांना पूर्व युक्रेनमध्ये युद्ध चालू असलेल्या, तीन प्रांतांची नावं विचारली असता हेली यांना ती सांगता आली नाहीत. ‘हमास’ विरुद्धच्या युद्धात अमेरिकेने इस्रायलला सर्वतोपरी मदत करायला हवी. प्रसंगी या या युद्धात सामील व्हायला हवे, अशी मतं व्यक्त करण्यात आली. इराणविरोधात कठोर कारवाई न केल्याबद्दल अध्यक्ष जो बायडन यांना दोष देण्यात आला.

विवेक रामास्वामींनी याबाबत वेगळी भूमिका घेतली. इस्रायलला पाठिंबा असला तरी हे अमेरिकेचे युद्ध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. इच्छुक उमेदवारांमध्ये चीनचा मुद्दाही प्रकर्षाने चर्चिला जात आहे. निकी हेली आणि डिसॅन्स्टिस यांनी पूर्वी आपापल्या राज्यांमध्ये चिनी कंपन्यांना घातलेल्या पायघड्या त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरत आहेत. रामास्वामी यांना रशियाला चीनपासून वेगळे करायचे असून, युक्रेनला पाठिंबा न दिल्यास, असे होऊ शकेल असे त्यांना वाटते. २०२१ साली अमेरिकेत अमली पदार्थांमुळे एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यातील सुमारे ७० टक्के लोकांनी ‘फेंटनील’ या रासायनिक पदार्थाच्या गोळ्यांचे सेवन केले होते. या रसायनांचे उत्पादन मुख्यतः चीनमध्ये होते. तेथून ती मेक्सिकोला निर्यात केली जातात आणि तिथे त्यांच्यावर प्रक्रिया करून त्याची अमेरिकेत तस्करी केली जाते. युक्रेनमध्ये सैन्य न पाठवता मेक्सिकोमध्ये या तस्करांविरोधात कारवाई करण्यासाठी सैन्य पाठवायला हवे, असा सूर या चर्चेत दिसला. चीन जाणीवपूर्वक अमली पदार्थांच्या निर्यातीत गुंतला असून, त्यात अमेरिकेला कमकुवत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आरोप करण्यात आले. त्यामुळे चीनविरुद्ध कडक निर्बंध घालायला हवे, अशीही भूमिका मांडण्यात आली.

गेल्या काही आठवड्यांपासून निकी हेली यांच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसत आहे. नुकतेच त्यांना अमेरिकेतील वित्त संस्थांनी मोठ्या देणग्या दिल्या. त्यावरून डिसॅन्टिस आणि रामास्वामी यांनी त्यांच्यावर टीका केली. अमेरिकेतील धनदांडगे आणि खासगी कंपन्या डाव्या उदारमतवादी विचारांच्या असून त्यांनी निकी हेली यांना आपलेसे केले आहे. निकी हेली भ्रष्ट असून, या धनदांडग्यांकडून देणग्या घेऊन त्या रिपब्लिकन पक्षाच्या ध्येय-धोरणांना हरताळ फासत असल्याचे आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आले. दुसरीकडे “मी लोकप्रिय असल्यामुळे, मला लक्ष्य करण्यात येत आहे,” असे सांगून हेली यांनी अन्य उमेदवारांवर कडी करण्याचा प्रयत्न केला. आता सगळ्यांचे लक्ष जानेवारीमध्ये पार पडणार्‍या आयओवा आणि न्यू हॅम्पशायर या राज्यांतील प्राथमिक फेरीतील निवडणुकांकडे लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक लढू न दिल्यास रॉन डिसॅन्टिस किंवा निकी हेली यांना संधी मिळू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांचे उपराष्ट्रपतीपदाचे सहकारी म्हणून विवेक रामास्वामींना संधी आहे. तसे न झाल्यास त्यांना स्थानिक राजकारणापासून सुरुवात करावी लागणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.