सोनार बांगलावर अमेरिकेची वक्रदृष्टी

    07-Nov-2023   
Total Views |
Article on relation between U.S. and Bangladesh

अमेरिका बांगलादेशच्या राजकारणात लोकशाहीच्या नावावर ढवळाढवळ करत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अ‍ॅन्थोनी ब्लिंकन यांनी काही महिन्यांपूर्वी सूचित केले की, बांगलादेशच्या लोकशाही व्यवस्थेला धक्का पोहोचवणार्‍या लोकांना अमेरिका व्हिसा देणार नाही, तसेच त्यांची संपत्तीही गोठवण्यात येईल.
 
शेजारच्या बांगलादेशमध्ये निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. बांगलादेशच्या संसदेचे दि. २९ जानेवारी, २०२४ ला विसर्जन होत असून, त्यापूर्वी तिथे निवडणुका होणे अपेक्षित आहे. या निवडणुकांपूर्वी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने राजीनामा देऊन काळजीवाहू सरकारकडे कारभार सोपवला, तरच मुक्त वातावरणात निवडणुका होऊ शकतील, या मागणीसाठी लाखो लोक रस्त्यावर आंदोलन करत आहेत. या आंदोलनांना अमेरिकेसह युरोपातील काही देशांचा पाठिंबा आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशच्या लोकशाहीची गळचेपी केली जात असल्याचा आरोप या देशांनी केला आहे. शेख हसीना २००९ सालापासून पंतप्रधान असून त्यापूर्वीही त्यांनी १९९६ ते २००१ या कालावधीत पंतप्रधानपद सांभाळले होते.

दि. ३० डिसेंबर, २०१८ रोजी बांगलादेशच्या संसदेसाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शेख हसीना यांच्या आवामी लीग आणि तिच्या मित्रपक्षांचा प्रचंड विजय झाला. त्यांना ३०० पैकी २८८ जागा मिळाल्या. विरोधी पक्षांना केवळ सात जागा मिळाल्या. २०१४ साली झालेल्या निवडणुकींवर बांगलादेश नॅशनल पार्टीसह प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्यामुळे शेख हसीनांचे आव्हान सोपे होते. २०१८ साली विरोधी पक्ष मैदानात असून आवामी लीगच्या १२ जागा वाढल्या. या निवडणुकीत शेख हसीना यांनी सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचे आरोप करण्यात आले. १९९६ साली घटना दुरूस्तीद्वारे बांगलादेशमध्ये निवडणुकांदरम्यान काळजीवाहू सरकारची नेमणूक करण्यात येऊ लागली. तेव्हा शेख हसीना यांचा ‘बांगलादेश आवामी लीग’ हा पक्ष अशी मागणी करण्यात आघाडीवर होता. २००९ साली त्यांच्या पक्षाला विजय मिळवल्यावर त्यांनीच घटना दुरूस्ती करून २०११ साली ही तरतूद रद्द केली. निवडणुका तोंडावर आल्या असताना काळजीवाहू सरकार स्थापन करणे शक्य नसल्यामुळे निवडणुकांदरम्यान विदेशी निरीक्षकांना परवानगी देण्याचे शेख हसीना सरकारने मान्य केले आहे.
 
बांगलादेशच्या संसदेत एकूण ३५० जागा असतात. त्यातील ५० महिलांसाठी राखीव असतात आणि विजयी झालेल्या पक्षांना जिंकलेल्या जागांच्या प्रमाणात त्या वाटून घेतल्या जातात. उरलेल्या ३०० जागांसाठी निवडणुका होतात. १९७१ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बांगलादेशचे राजकारण वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची आवामी लीग आणि माजी अध्यक्ष-लष्कर प्रमुख झियाउर रेहमान यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बीएनपी) या दोन पक्षांभोवती फिरते. विशेष म्हणजे, आज या दोन्ही पक्षांचे नेतृत्त्व पंतप्रधान अनुक्रमे शेख हसीना आणि बेगम खलिदा झिया या महिलांकडे आहे. आवामी लीग उदारमतवादी असून ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ इस्लामिक मूलतत्त्ववादी आहे. या दोन्ही पक्षांमध्ये साप मुंगुसाचे नाते आहे. दोन्ही पक्ष निवडणुकीतील हिंसाचारासाठी तितकेच कुप्रसिद्ध. बांगलादेशच्या लष्करातील काही सैनिकांनी अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांची त्यांच्या परिवारातील ३५ सदस्यांसह दि. १५ ऑगस्ट, १९७५ रोजी हत्या केली होती. त्यांच्या कन्या शेख हसीना तेव्हा परदेशात असल्यामुळे या हल्ल्यातून वाचल्या. १९७७ साली अध्यक्ष झालेले माजी लष्करप्रमुख झियाउर रहमान यांची १९८१ साली सैनिकांनी हत्या केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी बेगम खलिदा झिया यांनी त्यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षा’चे नेतृत्त्व केले.

शेख हसीना २००९ सालपासून पंतप्रधान असून त्यापूर्वी १९९६ ते २००१ या कालावधीतही त्यांनी पंतप्रधानपद भूषविले होते. ‘आवामी लीग’ उदारमतवादाकडे झुकली असली, तरी सत्तेवर आल्यानंतर शेख हसीना यांनी पद्धतशीरपणे विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्यास प्रारंभ केला. बांगलादेश निर्मिती युद्धात झालेल्या मानवाधिकार हननाच्या गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानला मदत करणार्‍यांना कठोर शिक्षा करण्यात आल्या. भ्रष्टाचारविरोधी कारवाईचा भाग म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. ‘बीएनपी’च्या नेत्या आणि माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया फेब्रुवारी २०१८ मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी तुरूंगात टाकून ‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’मधील अपहाराबद्दल त्यांना सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. २०२० साली वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्यांची सुटका करण्यात आली. त्यांचा मुलगा तारिक रहमान भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक होऊ नये, म्हणून ब्रिटनमध्ये स्थायिक झाला आहे. असं म्हटलं जातं की, ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षा’च्या ५० लाख कार्यकर्त्यांपैकी सुमारे २५ लाख लोकांविरूद्ध गुन्हे दाखल केले गेले असून, त्यापैकी अनेक राजकीय हेतूंनी प्रेरित आहेत.

राजकीय हिंसाचार आणि विरोधी विचारांचे दमन या गोष्टी वगळता शेख हसीना यांच्या काळात बांगलादेशला स्थैर्य प्राप्त झाले असून, आर्थिक विकासाचा वेगही वाढला आहे. शेख हसीना यांचे सरकार काही आदर्श लोकशाही व्यवस्थेला धरून नाही. बांगलादेशात सरकारी यंत्रणा वापरून विरोधी पक्षांचे दमन करणे, ही नित्याची बाब आहे. पण, दुसरीकडे बांगलादेशची अर्थव्यवस्था भारत वगळता दक्षिण आशियात सर्वात स्थिर आहे. अनेक वर्षांमध्ये तिथे लष्कराने हस्तक्षेप केला नाहीये. लोकसंख्या स्थिर आहे. इस्लामिक मूलतत्ववाद्यांनी सरकारने नियंत्रणात ठेवले आहे. मानवी निर्देशांकाच्या अनेक क्षेत्रांत बांगलादेशने भारतालाही मागे टाकले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, बांगलादेशचे चीनशी चांगले संबंध असले तरी तो चीनच्या कह्यात गेला नाही. पाकिस्तान दिवाळखोरीकडे वाटचाल करत असताना, बांगलादेशने अनेक विकसनशील देशांपुढे आदर्श ठेवला आहे.
 
अमेरिका बांगलादेशच्या राजकारणात लोकशाहीच्या नावावर ढवळाढवळ करत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अ‍ॅन्थोनी ब्लिंकन यांनी काही महिन्यांपूर्वी सूचित केले की, बांगलादेशच्या लोकशाही व्यवस्थेला धक्का पोहोचवणार्‍या लोकांना अमेरिका व्हिसा देणार नाही, तसेच त्यांची संपत्तीही गोठवण्यात येईल. ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिकेच्या मनात पाकिस्तानच्या फाळणीतून जन्मलेल्या बांगलादेशबद्दल आकस आहे. बांगलादेश जरी मुस्लीम देश असला तरी जगाच्या दृष्टीने तो दुर्लक्षित आहे. काही आठवड्यापूर्वी अमेरिकेचे राजदूत पीटर हास बांगलादेशच्या निवडणूक आयुक्तांना भेटून त्यांना मुक्त वातावरणात निवडणुका घ्यायला सांगितले. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे शेख हसीना यांच्या मनात संशय निर्माण झाला आहे की, अमेरिका लोकशाहीच्या नावावर बांगलादेशात सत्तांतर करू इच्छित आहे. दुसरीकडे बेगम खलिदा झियांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेख हसीना चीनकडे कलू लागल्या आहेत.

शी जिनपिंग यांनीही बांगलादेशमध्ये अन्य देशांनी ढवळाढवळ करण्यास विरोध करून चीन बांगलादेशच्या सोबत असल्याचे सांगितले. यामुळे सावध होऊन भारतानेही अमेरिकेला सबुरीचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षात मुस्लीम लॉबी ताकदवान आहे. त्यांच्यावर तुर्की, मलेशिया, पाकिस्तान आणि कतारसारख्या देशांचा लक्षणीय प्रभाव आहे. पारंपरिकरित्या शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कन्या शेख हसीना रशियाच्या जवळच्या समजल्या जातात. दुसरे म्हणजे एकीकडे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध वाढवत असताना भारताने डोईजड होऊ नये, यासाठीही अमेरिका प्रयत्नशील आहे. अमेरिका आपल्या मित्रदेशांसोबत असेच धोरण राबवतो आणि त्यांना कायम आपल्यावर अवलंबून ठेवतो. सध्या चालू असलेल्या इस्रायल आणि हमास युद्धामध्ये जो बायडन यांनी स्पष्टपणे इस्रायलची बाजू घेतल्यामुळे, त्यांच्या उदारमतवादी तसेच मुस्लीम मतदारांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यांना खूश करण्यासाठी बांगलादेशमधील मुस्लीम मूलतत्ववादी गटांना चुचकारण्याचे काम अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय करू शकते.

भारतानेही बांगलादेशच्या बाबतीत सक्रिय भूमिका स्वीकारली असून शेख हसीना यांना मदत होईल, अशी पावले उचलण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदींनी नुकतेच त्रिपुरा आणि बांगलादेश यांना जोडणार्‍या रेल्वेमार्गाचे लोकार्पण केले. या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटी डॉलर खर्च आला आहे. भारताने बांगलादेशमधील खुलना ते मोंगला बंदराला जोडणार्‍या रेल्वेमार्गासाठी तसेच १३२० मेगावॅट विद्युतप्रकल्पासाठी किफायतशीर दरात कर्जपुरवठा केला आहे. चीनची शेजारच्या देशांमध्ये घुसखोरी आणि बांगलादेशमधून होणार्‍या घुसखोरांच्या समस्येच्या निवारणासाठी बांगलादेशमध्ये भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असणारे सरकार असणे आवश्यक आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.