भारतीय पर्यटन क्षेत्राला सुगीचे दिवस!

    30-Nov-2023
Total Views |
Indian tourism sector

 
इस्रायल-‘हमास’संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विदेशी पर्यटक भारताकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. २०२४ पर्यंत देशात १.३३ कोटी पर्यटक येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. ऑक्टोबरपासून पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढू लागली आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, तसेच दिवाळीसारखा सण यामुळे हंगामाची सुरुवात सकारात्मक झाली, असे मानले जाते. त्याविषयी...

विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ झालेली असून, प्रवासी मोठ्या संख्येने भारताकडे आकर्षित होत असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः इस्रायल-‘हमास’ संघर्षामुळे प्रवासी इजिप्त, इस्रायल तसेच जॉर्डन यांच्याऐवजी भारताला पसंती देत असल्याचे हा अहवाल सांगतो. एक आकर्षक स्थान म्हणून भारत विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरला असून, २०२४ पर्यंत देशात १.३३ कोटी पर्यटक येतील, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. साथरोगापूर्वी भारतात येणार्‍या पर्यटकांच्या संख्येपेक्षा ती २२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.अनेक कारणांमुळे पर्यटक भारताला भेट देत आहेत. चीनमधील परिस्थिती अद्याप पूर्ववत झालेली नाही, हे त्यापैकी एक कारण. पर्यटनामध्येही भारत हा चीनला समर्थ पर्याय म्हणून समोर आला आहे. इस्रायल-‘हमास’ संघर्षामुळे इजिप्त, इस्रायल तसेच जॉर्डन पर्यटकांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. तसेच ‘एअर इंडिया’ने आपल्या सेवांचा विस्तार केल्यामुळे पर्यटकांना विमान वाहतुकीचा पर्यायही मिळत आहे. म्हणूनच २०२४ मध्ये देशांतर्गत पर्यटन क्षेत्राला चांगले दिवस आलेले दिसून येतील.

विशेषतः इस्रायल-‘हमास’ संघर्षानंतर पर्यटकांनी अमेरिकेपासून पश्चिम आशियातील ठिकाणांकडे जाण्याचे टाळले आहे. तेथील हॉटेल बुकिंगमध्ये २६ टक्के इतकी घट नोंदवली गेली. क्रिकेट विश्वचषक तसेच दिवाळीमुळे भारतातील पर्यटनाच्या हंगामाची सकारात्मक सुरुवात झाली. ‘यात्रा’नुसार देशांतर्गत प्रवासी संख्येत वाढ झालेली दिसून येते. विशेषतः दिवाळीदरम्यान अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅण्ड्समधून सर्वाधिक पर्यटक भारतात आले.जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ६०.४ लाख विदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली. पर्यटन मंत्रालयानुसार, मार्चपर्यंत ही प्रवासी संख्या आणखी वाढेल. २०१९ मध्ये भारतात १.०९ कोटी पर्यटक आले होते. मध्य-पूर्वेतीलसंघर्षाचा परिणाम म्हणून इतर देशातील पर्यटकही भारताचा विचार करतील, अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी भारतातील विमानांची वाढलेली भाडी, पर्यटनाचा वाढलेला खर्च यांचे आव्हान आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे रशियन पर्यटकांची संख्या घटली आहे. कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. त्याचाही पर्यटन क्षेत्राला फटका बसला आहे. म्हणूनच तुलनेने पर्यटकांची संख्या ही कमी आहे.

पर्यटन मंत्रालयाच्या अहवालानुसार, जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत भारतात आलेल्या पर्यटकांची संख्या ही २०२२ पेक्षा १०६ टक्क्यांनी अधिक होती. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक बांगलादेश (१९.३५ टक्के), अमेरिका (१७.९६ टक्के), इंग्लंड (१०.४७ टक्के), कॅनडा (५.९१ टक्के), ऑस्ट्रेलिया (४.६७ टक्के), रशिया (२.८ टक्के) येथून पर्यटक भारतात आले. पर्यटन मंत्रालयाने २०२३ हे वर्ष ‘भारत भेट वर्ष’ म्हणून घोषित केले होते. त्याचाही फायदा पर्यटन क्षेत्राला झालेला दिसून येतो. जागतिक पर्यटन बाजारपेठेतील भारताचा वाटा वाढवण्यासाठी पर्यटन मंत्रालय विशेष प्रयत्न करत आहे.भारतीय विमान कंपन्यांकडे ७५० विमाने असून, त्यापैकी सुमारे १६० विमाने जमिनीवरच आहेत. यात दिवाळखोरीतील ‘गो फर्स्ट’च्या ५४ विमानांचा समावेश आहे. ‘इंडिगो’ची ४५ विमाने इंजिन उपलब्ध नसल्यामुळे उड्डाण करण्यास असमर्थ आहेत. त्यात आणखी काही विमानांचा समावेश होईल, असे असतानाही देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय वाहतुकीत यावर्षी वाढ नोंद होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘गो फर्स्ट’ मे महिन्यात दिवाळखोरीत गेल्यानंतरही देशांतर्गत वाहतूक सुरळीत आहे. २०२४ मध्ये विमान प्रवाशांची संख्या १५.५ कोटी इतकी असेल (गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १५ टक्क्यांनी वाढ झाली असेल). आंतरराष्ट्रीय वाहूतक वाढली असून, वर्ष अखेरपर्यंत सात कोटी प्रवासी संख्या पूर्ण होईल.

नवीन वर्षानिमित्त बुकिंग वाढले!


नाताळ तसेच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी प्रवासाचे बेत आखले जात असून, पर्यटन क्षेत्रात उत्साह असल्याचे दिसून येते. आगाऊ बुकिंगमध्ये २० ते ४० टक्के इतकी वाढ झाली असून, वाढलेले विमान भाडे तसेच हॉटेलचे दर यामुळे २० टक्क्यांनी यंदा पर्यटन महागले आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मजबूत वाढ दिसून येत आहे. मेट्रो तसेच नॉन-मेट्रो शहरांना पर्यटक पसंती देत आहेत. गोवा, जयपूर, पुदुच्चेरी, पुणे, कुर्ग ही पर्यटकांची सर्वाधिक आवडती ठिकाणे म्हणून नोंदवली गेली आहेत. त्याचवेळी ३० दिवसांचा व्हिसा मुक्त मुक्कामाची परवानगी मिळाल्यामुळे मलेशिया तसेच थायलंड येथे भारतीय सर्वाधिक संख्येने जात असल्याचे दिसून येते. विदेशातील पर्यटकांना भारतातील स्थळे साद घालत असताना, भारतीय पर्यटक दुबई, बँकॉक, न्यूयॉर्क, कोलंबो, बाली, माले यांना प्राधान्य देत आहेत. बाली, थायलंड, दुबई, मलेशिया, सौदी अरेबिया, मालदीव तसेच मॉरिशस येथे व्हिस प्रक्रिया सुलभ करण्यात आल्याने पर्यटकांनी त्यांची निवड केली आहे. मलेशिया, थायलंड आणि श्रीलंका येथे १०० टक्के इतकी वाढ नोंदवली गेली. भारतीय पर्यटकांसाठी नवीन व्हिसा धोरण जाहीर केल्याचा फायदा त्यांना मिळत आहे. बँकॉकसाठी १.४२ तर क्वालालंपूरसाठी २.२ पटीने वाढ झाली. मलेशियातील पर्यटन क्षेत्रात भारतीय पर्यटक सर्वाधिक योगदान देत आहेत. अशातच भारतीय प्रवाशांसाठी व्हिसामुक्त प्रवेशाला परवानगी देण्यात आल्यामुळे त्यात वाढ होत आहे.

भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा तसेच वैविध्यपूर्ण निसर्ग विदेशी पर्यटकांना साद घालत आहे. त्याचवेळी देशातील ऐतिहासिक ठिकाणे, वास्तूशिल्प चमत्कार त्यांना आकर्षित करतात. हिमालयापासून ते केरळपर्यंत आढळणारे वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्यही खुणावणारे ठरते. त्याशिवाय भारताची अन्य दक्षिण आशियाई देशांशी असलेली जवळीक तसेच सांस्कृतिक संलग्नता हे पर्यटनाला चालना देणारे ठरते. पर्यटनात तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र अशी ही क्रमवारी आहे. तामिळनाडूतील द्रविड शैलीतील हिंदू मंदिरे ही प्रमुख आकर्षणे आहेत. कन्याकुमारीला भेट दिल्याशिवाय पर्यटनाचा समारोप होऊ शकत नाही. उत्तर प्रदेशातही पर्यटकांसाठी अनेक आकर्षणे आहेत. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक पर्यटकांची नोंद होईल, असे मानले जाते.


-संजीव ओक