पाकिस्तान आणि ‘जिरगा’

    29-Nov-2023   
Total Views |
pakistan-another-kohistan-girl-killed-on-jirga-s-orders

'त्या' १८ वर्षांच्या मुलीला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तिच्यावर गोळी झाडून, तिचा खून करण्यात आला. काय गुन्हा होता तिचा? सोशल मीडियावर मित्र-मैत्रिणींसोबत नृत्य करताना तिची पोस्ट फक्त सोशल मीडियावर ’व्हायरल’ झाली. नृत्य करते तेही मुलांसोबत, वर सोशल मीडियावर पोस्टही केले, यामुळे म्हणे तिला शिक्षा सुनावली गेली. दि. २३ नोव्हेंबरची पाकिस्तानमधील कोहरीस्तानची ही घटना.

शिक्षा सुनावणारे कोण तर स्थानिक जनजातीचे पंच. यांना ’जिरगा’ म्हणतात. मुस्लीम मुलीने नृत्य करून धर्माचा अनन्वित अपमान आणि माफ होऊच शकत नाही, असा जघन्य गुन्हा केला, असे त्यांचे म्हणणे. तिच्या सोबतच्या मैत्रिणीलाही मृत्यूचीच शिक्षा सुनावली गेली. पण, तिला गोळी मारण्यापूर्वीच तिथे पोलीस आले आणि ती वाचली. काल-परवा नृत्य करणार्‍या त्या मुलीसोबत मुलंही नृत्य करत होती, मग मृत्युदंड मुलीलाच का? नृत्य वगैरे करून खरंच त्यांच्या धर्माचे मोठे नुकसान होते का? मुली, महिलांना मूलभूत अधिकार मिळू नयेत आणि कायमच त्या गुलाम राहाव्यात, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी ‘जिरगा’ पद्धत असेल का?

२०१२ सालची अशीच एक घटना. दोन पुरुषांची मारामारी झाली. त्यात एकाने दुसर्‍याचा खून केला. न्यायनिवाड्यासाठी जिरगा पंचायत बसली. त्यात न्याय करण्यात आला की, मृत मुलाच्या घराचे नुकसान झाले, त्याची किंमत होऊ शकत नाही. त्यासाठी गुन्हेगाराने दंड म्हणून १३ अल्पवयीन कुमारीका मुली मृत मुलाच्या कुटुंबाकडे सुपुर्द कराव्यात. त्या मुलाचा खून झाला, त्याच्या नातेवाईक, आप्तांचे मोठे नुकसान झाले. अगदी बरोबर. पण, त्या नुकसानीची पूर्तता १३ अल्पवयीन मुलींची पशूसारखी देवाणघेवाण करून कशी होणार? या मुलींची काय चूक? हा कसला न्यायनिवाडा? काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या लाहोर शहराजवळ जिरगा पंचायत बसली. न्यायनिवाड्यासाठी दोन्ही कडील लोक जमले होते. पण, कोणी कुणाचे ऐकायला तयार नव्हते. दोन्ही कडील लोकांनी एकमेकांवर हल्ले करायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली, त्यात दोन्ही गटांचे मिळून आठ जण मारले गेले. खुनाखुनी झाल्यानंतर मारेकरी पळून गेले. मात्र, आठ जणांचे मृतदेह घेऊन, त्यांचे नातेवाईक रस्त्यावर उतरले. वाहतूक बंद करून टाकली. चक्का जाम करून टाकला.

जिरगा पंचायतीच्या न्यायनिवाड्याचे उत्तम उदाहरण पाकिस्तानची मुख्तार माईच आहे. २००२ सालची गोष्ट मुख्तारच्या १२ वर्षांच्या भावाचे शकूरचे चार जणांनी लैंगिक शोषण केले. शकूर जेव्हा याबाबत तक्रार करायला गेला, तेव्हा त्यांनी शकूरचे अपहरण केले आणि त्याला एका घरात कैद केले. ही सगळी घटना जगजाहीर झाल्यावर, त्या चार जणांनी सांगितले की, शकूरचे त्यांच्या बहिणीसोबत सलमासोबत अनैतिक संबंध आहेत. त्यावेळी शकूर १२ वर्षांचा, तर सलमा २० वर्षांची होती. या चार जणांनी स्वतःच्या गुन्ह्याला दडपवत शकूर आणि सलमाच्या व्यभिचारावर न्यायनिवाडा करण्याची मागणी केली. जिरगा पंचायत बसली. काही लोक म्हणाले की, शकूरने सलमासोबत निकाह करावा आणि शकूरच्या बहिणीने मुख्तार माईने सलमाच्या भावासोबत निकाह करावा, तरच न्याय होईल. मात्र, जिरगा पंचायतीचे मुख्य लोक म्हणाले नाही, व्यभिचाराची किंमत व्यभिचारच. त्यामुळे मुख्तार माईवर सलमाच्या भावांनी बलात्कार करावा.

त्यानंतर मुख्तारला पंचायतीसमोर खेचून नेत, चार जणांनी अत्याचार केला. तिची नग्न धिंड काढली, तर अशीही जिरगा पंचायत. पाकिस्तानमध्ये जिरगा पंचायत कायद्याने अवैधच. मात्र, पाकिस्तानींना वाटते की, पोलिसांकडे तक्रार केली, न्यायालयात प्रकरण गेले, तर लाच द्यावी लागेल, न्याय मिळणार नाही. त्यापेक्षा जिरगा पंचायतीकडे जायचे, तसेही जिरगा पंचायतीच्या न्यायनिवाड्यामागे गुन्हेगाराच्या घरातल्या स्त्रियांचाच बळी जातो. गुन्हेगार पुरूष मात्र शिक्षेपासून मुक्त. असे हे पाकिस्तानी महिलांचे जगणे. ते पाहून वाटते की, आपल्या देशात ’सीएए’विरोधात शााहीनबागेत आंदोलन करणारे लोक, जिरगा पंचायतीमुळे पाकिस्तानमध्ये बळी गेलेल्या, त्यांच्या धर्मभगिनींच्या जीवन हक्कासाठी बोलणार की नाही? की हक्क- न्यायाची भाषा केवळ भारताविरोधातच? तूर्तास पाकिस्तानमधल्या त्या क्रूर घटनेचा निषेध!
 
९५९४९६९६३८
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.