जे वेड मजला लागले....!

Total Views |
Article on Mark Twain Book Life on the Mississippi

‘लाईफ ऑन मिसिसिपी’ प्रकाशन वर्ष - १८८३ हे मार्क ट्वेनचं पुस्तक म्हणजे पाण्यावरच्या भ्रमंतीच्या विलक्षण वेडाची कहाणीच आहे. लेखक जणू त्या नदीच्या प्रेमातच पडला आहे. तिला सोडून जमिनीवर पाय ठेवावा, असं त्याला मुळी वाटतच नाही. आज १४० वर्षांनंतरही लेखकाच्या शब्दांमधलं ते पाण्याचं वेड वाचकाला झपाटून टाकतं.

'जे वेड मजला लागले, तुजलाही ते लागेल का....’ अवघ्या महाराष्ट्राचे लाडके बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनी गायलेलं हे एक कमालीचं गोड, मधाळ असं गाणं. बाबूजींचं गाणं म्हटल्यावर साहजिकच सर्वांचा असा समज होतो की, स्वतः बाबूजीच या गाण्याचे संगीतकार असणार आणि अर्थातच गदिमा कवी असणार. प्रत्यक्षात संगीतकार आहेत-वसंत पवार आणि कवी आहेत-डॉ. वसंत अवसरे. संगीतकार वसंत पवार हा कमालीचा प्रतिभाशाली, पण तितकाच शापित, असा एक विलक्षण कलावंत होता. डॉ. वसंत अवसरे हे मुंबईत सांताक्रूझला स्वतःचं रुग्णालय आणि जोरदार प्रॅक्टिस असलेले व्यावसायिक डॉक्टर होते. अनेक साहित्यिक, नाट्य-चित्रपट कलावंत त्यांचे खास दोस्त होते. त्यामुळेच त्यांनी लिहिलेल्या चित्रपट गीतांबद्दल थोडे मतभेद आहेत. काहीचं म्हणणं असं की, खरोखरच स्वतः डॉक्टरांनीच त्यांच्या अफाट व्यापातून वेळ काढून ही गीतं लिहिली आहेत. काहींचं म्हणणं असं की, डॉक्टरांच्या कौटुंबिक मित्र असणार्‍या शांताबाई शेळक्यांनी प्रत्यक्षात ही गीत लिहिली. पण, नाव डॉक्टरांचं दिलं, जाणत्यांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.

दि. १२ नोव्हेंबरला निसर्गतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी वयाची ९१ वर्षं पूर्ण केली. (जन्म १२ नोव्हेंबर १९३२) लहानपणापासूनच प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष, वनस्पती, डोंगर, नद्या, रानातल्या अनवट पायवाटा यांमध्ये रमणार्‍या मारूतरावांना सुदैवाने नोकरीसुद्धा वन खात्यातच मिळाली. मग पुढची सगळी वर्षं मारूतराव सतत भ्रमंती करीत राहिले. निसर्गाची असीम, अमर्याद, अनंत लीला डोळसपणे निरखत राहिले, ती शब्दांकित करून मराठी वाचकांसमोर मांडत राहिले. वनस्पतीशास्त्र, पक्षिशास्त्र, कीटकशास्त्र यांच्यातील असंख्य पारिभाषिक इंग्रजी शब्दांना मराठी किंवा देशी भाषेतले प्रतिशब्दच नव्हते. ते मारूतरावांच्या लेखनातून मिळाले. उदा. ‘हेरॉन’ या पक्ष्याच्या वसाहतीला ’हेेरॉनरी’ असा शब्द प्रचलित आहे. ‘टणटणी’ हे एक सर्वत्र आढळणारं औषधी झुडूप आहे. ‘बहावा’ हा एक सुंदर पिवळी फुलं येणारा वृक्ष आहे.

मारुतरावांनी ‘हेरॉन’साठी ’सारंग’, ‘हेरॉनरी’साठी ‘सारंगागार’, ‘टणटणी’ला ’रायमुनिया’, तर ‘बहाव्या’ला ’अमलताश’ अशी सुंदर नावे दिली आहेत. मारूतरावांच्या अप्रतिम निसर्गवर्णनांमुळे जंगल भटकंतीचं वेड लागलेला, डोळसपणे प्राणी-पक्षी-वनस्पती यांचं निरीक्षण करणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला आहे, यात काहीच संशय नाही.

मारूतराव निसर्गप्रेमी, निसर्गअभ्यासक आणि अधिकृत सरकारी वनसंरक्षक होतेच. त्यांचं हे प्रेम, निरीक्षण शब्दांकित करून मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणारा माणूस स्वतःही असाच वेडा होता. पांडुरंग, ज्ञानोबा, तुकोबा, रामदास आणि शिवछत्रपती यांच्या प्रेमात आकंठ बुडालेला हा माणूस म्हणजे गोपाल नीलकंठ दांडेकर उर्फ आप्पा. महाराष्ट्रातल्या तमाम डोंगर भटक्यांचे परमाचार्य. अगोदर माणसं किल्ले बघायला जात नव्हती असं नव्हे; पण साधारण १९७० सालापासून गो. नी. दांडेकर या तप्त सुवर्णासारख्या लखलखीत नाममुद्रेने किल्ल्यांवरील पदभ्रमणाबद्दलचे त्यांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. ते स्वतः भटक्या गटांना बरोबर घेऊन गड, खिंडी, कपारी, पठारं पालथी घालू लागले आणि मराठी मुलुख पदभ्रमण-ट्रेकिंग या वेडाने झपाटला, पछाडला. आता तर हे वेड सह्याद्री ओलांडून हिमालयाकडे झेपावलं आहे.

यात अनेकांनी आपल्या प्रतिभेची भर घातली आहे. बुलेट फटफटीवाल्यांचाच फक्त गट बनवून मुंबई ते कारगिल अशा साहसयात्रा नियमितपणे करणारे अनेक गट आहेत. हे विलक्षण वेड फक्त महाराष्ट्रातच आहे. अन्य कुठल्याही प्रांतातले लोक अशा रितीने पदभ्रमण, साहसयात्रा करतात, असं ऐकलं-वाचलेलं नाही. मला इथे कोणत्याही प्रांताला, तिथल्या समाजाला कमी लेखायचं नाही. कसोटीची वेळ झाली की, कोणताही भारतीय माणूस सारख्याच जिद्दीने आव्हानाला भिडतो आणि यशस्वी होतो. उदा. १९४७-४८च्या भारत-पाक युद्धात भारतीय रणगाडा दलाने लडाखमध्ये ११ हजार, ५७५ फूट उंचीवरच्या झोजीला खिंडीत आपले रणगाडे नेऊन उभे केले. नुसते पाकिस्तानीच नव्हे, तर अवघ्या जगातले तमाम लष्करी सेनानी, तज्ज्ञ आश्चर्याने थक्क झाले. रणगाडा हे युद्धवाहन १९१६ साली युरोपात निर्माण झाले.

तेव्हापासून मे १९४८ मधल्या या घटनेपर्यंत जगभरात कुणीही एवढ्या उंचीवर रणगाडा नेण्याची कल्पनाही केली नव्हती. तो पराक्रम नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतीय सैन्याने करून दाखवला. या घटनेचे शिल्पकार मराठी-राजपूत-शीख-जाट यांच्यापैकी कुणी नसून कानडी आणि तामिळ होते. आपला असा एक समज असतो की, मराठी-राजपूत-शीख-जाट एवढेच लोक लढवय्ये असतात, तर तसं काही नाही. रामाचं, कृष्णाचं, हुनमंताचं आणि अर्जुनाचं क्षात्रतेज भारताच्या प्रत्येक प्रांतात आहेच. रणगाड्यासारखं अवजड वाहन ११ हजार फूट उंचीवर नेऊन उभं करण्याची बहादुरी गाजवणारा वीर होता- लेफ्टनंट जनरल कोदंडेरा सुबय्या थिमय्या. एक कानडी माणूस आणि त्या रणगाड्यांना पेलून धरणारा रस्ता हिमालयाच्या भुसभुसीत पृष्ठभागावर उभारणारं इंजिनिअरिंग पथक होतं-’मद्रास सॅपर्स अ‍ॅण्ड मायनर्स.’ ‘तंबी’ या प्रेमळ टोपणनावाने ओळखले जाणारे तामिळ भाषिक इंजिनिअर्स आणि जवान.

असो. भारतीय सैन्यातले सगळेच लोक वेडे असतात. ते वेडे असतात म्हणूनच इतिहास घडवतात. पण, नागरी समाजातही जेव्हा मारुती चितमपल्ली, गोनीदा असे वेडे निर्माण होतात, तेव्हा ते आपलं वेड समाजात संक्रमित करतात. जे त्या वेडाने झपाटून जातात, त्यांचं जीवन धन्य होऊन जातं. गोनीदा जवळपास शेवटपर्यंत भ्रमंती करीत होते. मारूतराव आजही रानवाटांवरून भटकतच असतात, नव्हे, ते रानातच जाऊन राहिले आहेत. या दोघांनी आणि प्र. के. घाणेकर, आनंद पाळंदे, जगन्नाथ कुंटे, कृष्णमेघ कुंटे इत्यादी मंडळींनी आपल्या भटकंतीबद्दल लिहिलं, व्याख्यानं दिली म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल कळलं तरी. पण, हजारो वर्षांपासून असंख्य साधू, संन्यासी, बैरागी, श्रमण आणि भिक्खू या भारत देशात आसेतुहिमाचल पदयात्रा करीत अखंड हिंडतच आहेत. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ एका ठिकाणी राहायचं नाही, अशी त्यांनी मुळी धर्माज्ञाच आहे. स्वामी विवेकानंद भारतभर फिरले होते. समर्थ रामदास काबूलपासून रामेश्वरपर्यंत फिरले होते. गुरू नानकदेव तर मक्केपर्यंत गेले होते, असे उल्लेख आपल्याला त्यांच्या चरित्रात मिळतात. पण, हजारो संन्यासी केवळ आपला देश पाहण्यासाठी अखंड भ्रमण करीत होते. आजही करीत असतात. त्यांच्यापैकी फारच थोड्यांनी आपले वृत्तांत लिहून ठेवले आहेत.
 
हे झालं जमिनीवरच्या भटकंतीबद्दल. समुद्राचं काय? तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या आपल्या देशातल्या रहिवाशांना या अफाट समुद्राचं आकर्षण वाटलं नसेल का? नक्कीच वाटलं होतं. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर ही नावं त्यांना युरोपीय दर्यावर्दींनी दिली. पण, मुळातली भारतीय हिंदू नावं अनुक्रमे ‘रत्नाकर’ आणि ‘महोदधी’ अशी आहेत. ज्या सागराला सिंधू, सरस्वती आणि नर्मदेसारख्या पश्चिम वाहिनी महानद्या मिळतात, तो ‘रत्नाकर’ आणि ज्या सागराला गंगा, गोदावरी आणि कावेरी मिळतात, तो ‘महोदधी.’ या दोन्ही समुद्रांवर भ्रमंती करणारे मुख्यतः व्यापार करणारे असंख्य भटके प्रवासी, व्यापारी, दर्यासारंग होते, हे तर नक्कीच. त्यांच्या प्रवासाचा पल्ला पार दक्षिण अमेरिकेपर्यंत होता, याचे पुरातत्त्वीय पुरावे म्हणजे शिलालेख, मूर्ती, कुंभ, अलंकार इत्यादी वस्तू सापडल्या आहेत. पण, साहित्य, वाङ्मय यातले पुरावे संख्येने कमी आहेत. बौद्ध वाङ्मयातल्या जातककथा हा अशा समुद्र भटकंतीचं वेड असलेल्या व्यापारांच्या कथा सांगणारा एक पुरावा आहे. या कथांमधल्या अनेक साहसी वीरांना समुद्रावर फिरण्याचंच आकर्षण असलेलं दिसतं. जाता-येता त्याला जीवघेण्या वादळांचा सामाना करायला लागलेला असतो. कसाबसा बचावून आणि त्या परक्या देशात बर्‍यापैकी धनसंपत्ती गाठीशी बांधून तो परतलेला असतो. आता वास्तविक जमिनीवरचं स्थिर, सुखी कौटुंबिक जीवन जगणं त्याला शक्य असतं. पण, तो समुद्र जणू त्याला हाका घालून बोलावत असतो. जातककथा वगळता समुद्री भटकंतीच्या वेडाने झपाटलेल्यांच्या अशा फारशा कथा आपल्याकडे नाहीत. कदाचित परकीय आक्रमणांच्या तडाख्यात ते साहित्य नष्ट झालं असेल.

युरोपीय भाषांमध्ये आणि त्यातही विशेषतः इंग्रजीत समुद्री जीवनाबद्दलचं विपुल साहित्य उपलब्ध आहे. इंग्रजीत जास्त आहे. कारण, त्या देशाचं सगळं जीवनच मुख्यतः समुद्रावर अवलंबून आहे. आधुनिक युगापूर्वी तर ते जास्तच होतं. एखादा तरूण वीर घोड्यावर स्वार होऊन जोरदार रपेट मारून येईलच. पण, त्याहीपेक्षा तो एखादी छोटी शिडाची होडी दर्यावर लोटून शीड आणि वल्ही यांच्या मदतीने समुद्रावर एक चक्कर मारून येईल. वार्‍याची एखादी बारीकशी झुळूकसुद्धा अचूकपणे शीडामध्ये पकडून त्या जोरावर होडी हवी तशी फिरवणं नि क्षितिजाच्या कडेवर कुठे बारीकसा एखादा ढग दिसला, तरी पाहता-पाहता तो उग्ररूप धारण करेल का, हे त्या वीराला कदाचित नुसत्या हवेच्या वासावरून समजेल. अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये स्थलांतरीत झालेले बहुसंख्य लोक मुख्यतः ब्रिटिशच. त्यामुळे त्या लोकांसाठी समुद्रावर किंवा एकंदरीत पाण्यावरच्या भटकंतीचं वेडच असतं. सॅम्युअल लाँगहॉर्न क्लेमेला (जन्म १८१५, मृत्यू १९१०) उर्फ मार्क ट्वेन हा लेखक अमेकिन साहित्याचा जनक मानला जातो. मिसिसीपी ही अमेरिकेतली एक अतिप्रचंड नदी आहे. ’लाईफ ऑन मिसिसिपी’ प्रकाशन वर्ष - १८८३ हे मार्क ट्वेनचं पुस्तक म्हणजे पाण्यावरच्या भ्रमंतीच्या विलक्षण वेडाची कहाणीच आहे. लेखक जणू त्या नदीच्या प्रेमातच पडला आहे. तिला सोडून जमिनीवर पाय ठेवावा, असं त्याला मुळी वाटतच नाही. आज १४० वर्षांनंतरही लेखकाच्या शब्दांमधलं ते पाण्याचं वेड वाचकाला झपाटून टाकतं.

जोशुआ स्लोकम हा मार्क ट्वेनचाच समकालीन. अनेक जहाजांवर कप्तानपद गाजवीत, तो जगभर फिरला. त्याचा जन्म १८४४ सालचा. तो साधारण पन्नाशीला आला, तोपर्यंत शिडाच्या जहाजांचा काळ संपूर्णपणे संपून आगबोटींचा जमाना सुरू झाला. म्हणजेच जोशुआ बेकार झाला. पण, तो पठ्ठ्या घरी बसणारा नव्हता. नवीन तंत्र आत्मसात करीत, तो जगभर फिरतच राहिला. १८९८ साली तो एका शिडाच्या होडीतून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला आणि वर्षभरात त्याने ती पूर्ण केलीसुद्धा. आधुनिक काळात शिडाच्या होडीतून एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा करणारा जोशुआ स्लोकम हा पहिला दर्यावर्दी. ‘सेलिंग अलोन अराऊंड द वर्ल्ड’ हे पुस्तक त्याने १८९९ साली प्रसिद्ध केलं, जे लोक आजही आवडीने वाचतात.

बर्नार्ड मॉईतेसीर हा एक फ्रेंच भटक्या होता. १९६८ साली तो ’गोल्डन ग्लोब’ या अतिशय प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी लंडनला आला. शिडाच्या होडीतून एकट्याने सर्वांत जलद पृथ्वी प्रदक्षिणा कोण पूर्ण करतो, अशी ही शर्यत होती. या संपूर्ण स्पर्धेच वृत्त, चित्र इत्यादींची भरपूर प्रसिद्धी करून खेळाला उत्तेजन आणि धंदा करणं असा आयोजकांचा दुहेरी उद्देश होता. बर्नार्डने शर्यत जवळ-जवळ जिंकलीच होती आणि अचानक त्याला जणू आध्यात्मिक साक्षात्कार झाला. आपली ‘ग्रेट केप’ ही शिडाची नौका जणू सजीव आहे, ती श्वासोच्छवास करते, तिचा आत्मा एखाद्या बाळासारखा कोमल आहे आणि त्याच वेळी एखाद्या गुन्हेगारांसारखा कठोरही आहे, असं त्याला वाटू लागलं. समुद्रात आढळणारे मासे, कासवं, पक्षी हे आपले मित्र असून त्यांच्यासह आपण या समुद्री जीवनाचाच एक भाग आहोत आणि या सर्वांचा उपयोग करुन पैसे कमावणं ही एक गलिच्छ गोष्ट आहे, असा भाव त्याच्या मनात द़ृढ झाला. जवळपास जिंकत आलेली शर्यत त्याने सरळ सोडून दिली.

रिचर्ड किंग हा माणूस असाच समुद्रवेडा आहे. शिडाच्या होडीतून एकट्याने लांब-लांब फिरत राहणं, हा त्याचा छंद आहे. ’सेलिंग अलोन ः अ हिस्ट्री’ या त्यांच्या पुस्तकात त्याने जोशुआ स्लोकमपासून अनेक समुद्र भटक्यांच्या कहाण्या रोचक पद्धतीने मांडल्या आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.