डोळे उघडले असतील का?

    22-Nov-2023   
Total Views |
Meat, liquor served at Pakistan's Kartarpur Gurdwara dance party

पार्टीत मांसाहार किंवा मद्यसेवन करणे आणि नशेच्या अमलात नृत्य करणे ही म्हणा ज्याची-त्याची आवड. प्रत्येक देशाचा कायदा आहे आणि हा कायदा उल्लंघन न करता, जर हे सगळे केले, तर कुणालाच काही आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र, पाकिस्तानमधील अशा मांसाहार, मद्याची उधळण करणारी एक पार्टी नुकतीच विवादात सापडली. कारण, ही पार्टी पाकिस्तानातील. या पार्टीमध्ये ८० लोक सहभागी झाले होते.
 
दि. १८ नोव्हेंबर रात्री ८ वाजता पार्टी सुरू झाली. मांसाहार आणि मद्यसेवनाची लयलूट. पार्टीच्या नशेचा अमल सगळ्यांवरच होता. या नशेच्या अमलातच लोक नृत्यही करू लागली. अर्थात, त्याला नृत्य म्हणायचे का, हा प्रश्नच. या पार्टीचे व्हिडिओ फूटेजही जगासमोर आले. यावर भाजप नेता आणि ’दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटी’चे माजी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी निषेध व्यक्त करत म्हटले की, ”करतारपूर गुरुद्वारा परिसरात अशा प्रकारे डान्स आणि मांसाहाराची पार्टी आयोजित करून मंदिर परिसराला अपवित्र केले गेले. या सगळ्या घटनेचा मी निषेध करतो आणि याविरोधात तत्काळ कारवाई व्हावी, अशी मी मागणी करतो.”

पाकिस्तानमधील ही पार्टी अतिशय विवादास्पद आणि शीख धर्मीयांचा अपमान करणारी. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांनी १५०४ साली रावी नदीच्या तीरावर करतारपूर शहर वसवले. पुढे शीख धर्माच्या संवर्धनासाठी त्यांनी यात्रा केल्या, अत्याचाराविरोधात प्रचंड संघटन उभे केले. त्यानंतर ते या करतारपूर शहरात परतले. दि. २२ सप्टेंबर १५३९ साली त्यांना देवाज्ञा झाली, तोपर्यंत ते या करतारपूर शहरात राहिले. जवळ-जवळ १८ वर्षं त्यांनी या परिसरामध्ये दिव्यकार्य केले. असे म्हटले जाते की, जिथे गुरुनानक देवांचा मृत्यू झाला, तिथेच करतारपूर साहिब गुरुद्वारा उभा आहे. शीख धर्मीयांसाठीच नव्हे, तर जगभरातल्या समस्त भारतीयांसाठी या गुरूद्वाराचे महत्त्व खूप मोठे आहे.

या गुरुद्वारामध्ये समाजाच्या आशा, श्रद्धा, निष्ठा सामावलेल्या असताना या गुरूद्वारामध्ये हे असे कृत्य का व्हावे? जिथे ’गुरुग्रंथसाहिब’चे पठन होते, पूजन होते, श्रद्धाळूंसाठी लंगर लागतो, तिथे दारू आणि मांसाहाराच्या पार्टी? कशासाठी आणि का? या गुरूद्वाराचे पावित्र्य आणि माहात्म्य पाकिस्तानच्या लोकांना माहिती नाही का, तर यासाठी एक लक्षात घ्यायला हवे की, करतारपूर साहिब गुरुद्वारामध्ये पार्टीचे आयोजन सैय्यद अबू बकर कुरेशीने केली होते. हा सैय्यद कोण, तर तो करतारपूर कॉरिडोरचा प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या युनिटचा सीईओ. २०१९ साली करतारपूर साहिब गुरूद्वारामध्ये भारतीय श्रद्धाळूंना जाता यावे, यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्तपणे निर्णय घेत, पाकिस्तानस्थित करतारपूर साहिब गुरुद्वारामध्ये भारतीयांना प्रवेश खुला केला.

दोन्ही देशांमध्ये तणाव असल्याने दोन्ही देशांतील नागरिकांना या दोन देशांत प्रवेश आणि इतर कामांसाठी प्रवेश सोपा नव्हता. मात्र, २०१९ साली भारतीय शिखांना करतारपूर साहिब गुरुद्वारा खुला झाला. त्यानुसार करतारपूर कॉरिडोर निर्माण झाले. पाकिस्तानने या कॉरिडोरच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सीईओ कुणाही शीख व्यक्तीला न बनवता, सैय्यद अबू बकर कुरेशीला बनवले. कुरेशी पाकिस्तानमध्ये असून, पॅलेस्टाईनच्या अल अक्साबद्दल किंवा त्याच्या गल्लीतल्या मशिदीबद्दलही जितकी निष्ठा, प्रेम आदर आहे, तितके प्रेम, आदर, निष्ठा त्याला करतारपूर साहिब गुरूद्वाराबद्दल असेल का? याचे उत्तर कुणीही सांगेल. त्याच्या श्रद्धा-विचारांमध्ये ‘अस्मानी किताब’ आणि मशीद-नमाज याव्यतिरिक्त काहीच नसणार, हे जगजाहीर. त्यामुळेच करतारपूर साहिब गुरुद्वारामध्ये मांस, मद्य आणि नृत्याची पार्टी आयोजित करताना कुरेशीला काहीच वाटले नाही.

कॅनडातील खलिस्तान समर्थक आज जे काही दहशतवादी कृत्य करत आहेत, त्यांना पाकिस्तानाचे समर्थन आहेच. पंजाबमध्ये नशेचा बाजार पुरवण्यात पाकिस्तानचाच हात. या पार्श्वभूमीवर भारतातले ‘सीएए’विरोधी आंदोलन आठवले. दिल्लीतील शाहीनबाग येथे मुस्लीम समाजातील काही लोक आंदोलन करत होते. या आंदोलनकर्त्यांसाठी लंगर लावण्यात काही शीख बांधव पुढे होते. करतारपूर साहिब गुरूद्वाराच्या पार्टी प्रसंगाने ‘सीएए’ आंदोलनात लंगर लावणार्‍यांचे डोळे उघडले असतील का?

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.