जपानची मैत्री, चीनला धडकी

    19-Nov-2023   
Total Views |
Asia-Pacific Ocean Region Diplomatic Battle

शत्रूचा शत्रू हा मित्र असतो, याच पद्धतीने सध्याचे जागतिक राजकारण सुरू आहे. आशिया-प्रशांत महासागर क्षेत्र एक महत्त्वपूर्ण भूभाग म्हणून समोर येत आहे. या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. या क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावामुळे दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्री क्षेत्रातील अनेक देश चिंतेत आहे. वाढत्या चिनी प्रभावाला पायबंद घालण्यासाठी, येथील क्षेत्रीय देशांनी आपल्या समुद्री हितांच्या संरक्षणासाठी सैन्य शक्ती मजबूत आणि रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे. आशियाई प्रशांत क्षेत्रात सध्या जपान आणि फिलीपाईन्स समुद्री संरक्षणाच्या मुद्द्यावर चिंतेत आहे.

दक्षिण चिनी सागरी क्षेत्र अनेक वर्षांपासून विवादित क्षेत्र राहिले आहे. त्याचप्रमाणे पूर्व चिनी सागरी क्षेत्रात जपानचा चीनसोबत वाद आहे. हा मुद्दा जपान-चीनमधील तणावाचे मुख्य कारण बनला आहे. जपान आणि फिलीपाईन्स एकत्र आल्याने या क्षेत्रातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर संरक्षण, विकासात दोन्ही देशांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. शांतिप्रिय संविधान असलेल्या जपानने शिंजो आबे आणि फुमिओ किशीदा यांच्या कार्यकाळात सैन्य शक्ती अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. दुसरीकडे फिलीपाईन्सने संयुक्त राज्य अमेरिकेसोबत संरक्षण सहकार्यात विविधता आणण्याची मागणी केली आहे. ज्यात क्षेत्रीय धोका आणि सागरी क्षेत्रातील असुरक्षेचाही संदर्भ दिला आहे. अशाप्रकारे दुसर्‍या देशांकडे मदत मागणारे हे दोन्ही देश सोबत आले आहे.

सध्या जपान आणि फिलीपाईन्समध्ये ‘आरएए’ म्हणजेच ‘रेसिप्रोकल अ‍ॅक्सिस अ‍ॅग्रीमेंट’ संदर्भात चर्चा सुरू आहे. हा प्रस्तावित करार दोन्ही देशांतील वाढते संरक्षण संबंध अधोरेखित करतात. ‘आरएए’ करार दोन्ही देशांच्या सैन्य दलाला एकमेकांच्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्याची परवानगी देणार आहे. मागील वर्षी दोन्ही देशांनी संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांसोबत पहिली सर्वंकष संरक्षण चर्चा केली आणि आपल्या संरक्षण संबंधांना मजबूत करण्यावर सहमती दर्शविली. जागतिक स्तरावर या कराराकडे चीनच्या वाढत्या आक्रमकतेला संतुलित करण्यासाठी उचललेले एक रणनीतिक पाऊल म्हणून पाहिले जात आहे. यासोबतच मानवी आणि आपत्तीकाळात सहकार्य करण्यावरही दोन्ही देशांत सहमती झाली आहे. ’आरएए’ करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध मजबूत होणार आहेतच. परंतु, दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये सद्भावना आणि विश्वासही निर्माण होणार आहे.

जपानने हवाई देखरेखीसाठी तीन रडार आणि एक मोबाईल रडार प्रणालीच्या निर्यातीसाठी ऑगस्ट २०२० मध्ये फिलीपाईन्स संरक्षण विभागासोबत जवळपास १०० दशलक्ष डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केल्या. जपानकडून फिलीपाईन्सला अनेक संरक्षण साहित्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे. फिलीपाईन्सला सैन्य आणि संरक्षण क्षेत्रात मजबूत करण्याचा जपानचा प्रयत्न आहे. ज्यामुळे क्षेत्रीय संरक्षण आणि विवादित समुद्री क्षेत्रात देखरेख करणे, जपानला अधिक सोपे जाणार आहे. जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२३ साठी फिलीपाईन्स, मलेशिया, बांगलादेश आणि फिजीला ’ओएसए’ प्राप्तकर्त्यांच्या रुपात निवडले आहे. जपानहून फिलीपाईन्समध्ये संरक्षण साहित्याचे स्थानांतरण हा दोन्ही देशांतील मैत्रीचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. दक्षिण चिनी समुद्र हा एक सामरिकदृष्ट्या प्रमुख मार्ग आहे. व्यापाराच्या दृष्टीनेही त्याला विशेष महत्त्व आहे.

मात्र, तितकाच तो वादादीतदेखील राहिलेला आहे. हा भाग एकेकाळी अमेरिकन नौसैनिकांचा गडदेखील होता. फिलीपाईन्सला आर्थिक आणि सैन्य शक्तीत ताकद देण्याचा जपानचा प्रयत्न आहे. जपानने बदललेली संरक्षण नीती याकडे चीनच्या वाढत्या प्रभावाला विरोध म्हणून पाहिले जात आहे. जपानने मार्च २०२४ पर्यंत फिलीपाईन्सला ४.६ अब्ज डॉलर्सची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यतः कम्प्युटर रेल्वे, संरक्षण आणि आपत्ती काळात मदत यांसाठी हा निधी देण्याचा निर्णय झाला आहे. आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात जपान आणि फिलीपाईन्सच्या वाढत्या संबंधांमुळे चीनच्या दादागिरीविरोधात मोर्चा उघडला गेला आहे, हेच जपानच्या आणि फिलीपाईन्सच्या जवळीकतेने अधोरेखित होते.

 ७०५८५८९७६७
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.