कॅनडातील ८ शहरांमध्ये खलिस्तानी दहशतवादी सक्रीय - गुप्तचर यंत्रणांचा अहवाल

    30-Oct-2023
Total Views |
 KHALISTANI
 
नवी दिल्ली : पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ पुन्हा सुरु करण्यासाठी कॅनडातील आठ शहरांतून कट रचला जात आहे. कॅनडातील काही गुरुद्वारांचाही यासाठी वापर केला जात आहे. अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी पंजाब सरकारला दिली आहे. त्यासोबतच खलिस्तान समर्थक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला आहे.
 
कॅनडातील काही शहरांमध्ये भारतविरोधी पोस्टर्स लावण्यात आले आहेत.गुप्तचर यंत्रणांनी आपल्या अहवालात सांगितले आहे की, "कॅनडातील आठ शहरांमध्ये दहशतवादी आणि खलिस्तान समर्थक भारतविरोधी कारवाया करत आहेत. काही धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समित्याही त्यांना मदत करत आहेत. एजन्सींनी अशा गुरुद्वारा व्यवस्थापकांची यादीही तयार केली आहे. भारतातील त्यांच्या नातेवाईकांवर लक्ष ठेवण्यासाठी ही यादी पंजाब सरकारसोबत शेअर करण्यात आली आहे."
 
याशिवाय पंजाबमधील अमृतपाल सिंगच्या अटकेबाबत कॅनडामध्ये धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे. या भारत विरोधी अपप्रचाराला कॅनडातील काही राजकीय पक्षांचा पण पाठिंबा आहे. मतपेढीच्या राजकारणासाठी कॅनडातील काही राजकीय पक्ष खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा देतात.