‘हमास’च्या दहशतवादाविरूद्ध इस्रायलचे युद्ध!

    10-Oct-2023   
Total Views |
Rockets fired from Gaza sirens heard in Israel

या हल्ल्यामुळे इस्रायलची खपली काढली असून, जगभरातील ज्यू लोकांच्या मनात दुसर्‍या महायुद्धादरम्यान करण्यात आलेल्या नरसंहाराच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. इस्रायलमध्ये हल्ल्यात सुमारे एक हजार माणसं मारली जाणं म्हणजे भारतात सव्वा लाख माणसं मारली जाण्यासारखं आहे. त्यामुळे इस्रायलने या हल्ल्याकडे दहशतवाद म्हणून न पाहता युद्धाची घोषणा केली.

इस्रायलने ‘हमास’ हा दहशतवादी संघटनेविरूद्ध युद्धाची घोषणा केली असून त्यासाठी तीन लाखांहून अधिक राखीव सैनिकांना सेनेत रुजू केले आहे. शनिवार, दि. ७ ऑक्टोबरच्या सकाळी इस्रायलवर आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला. एक अब्ज डॉलरहून जास्त खर्च करून उभारलेल्या, अत्याधुनिक कॅमेरे आणि सेन्सर बसवलेल्या कुंपणाला २२ ठिकाणी भेदून शेकडो आत्मघाती दहशतवादी इस्रायलमध्ये शिरले. इस्रायलला चकवा देण्यासाठी गाझा पट्टीतून सुमारे तीन हजार रॉकेट्सचा मारा करण्यात आला. एकाच वेळेस ‘हमास’ने समुद्रमार्गे मोटरबोटच्या साहाय्याने, इस्रायलच्या सीमेपर्यंत खणलेल्या भुयारांतून, पॅराग्लायडर्सच्या माध्यमातून आणि बुलडोझरच्या साहाय्याने कुंपण उद्ध्वस्त करून हल्ले करण्यात आले.

इस्रायलमध्ये सणासुदीचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर संगीत महोत्सव आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सीमेजवळ आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दोन हजारांहून अधिक तरुण-तरुणी गोळा झाले होते. या एका ठिकाणी २५०हून अधिक लोक मारले गेले. या हल्ल्यात सुमारे एक हजार लोक मारले गेले असून अडीच हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. १०० हून अधिक लोकांना बंधक बनवून गाझा पट्टीत नेण्यात आले. या हल्याच्या व्हिडिओंनी केवळ इस्रायलच नाही, तर जगभरात थरकाप उडाला. महिलांना विवस्त्र करून त्यांच्या मृतदेहांवर उभे असलेले, लहान मुलीला मारल्यावर तिच्या आई-वडिलांना आणि लहान भावंडांना जमिनीवर झोपण्यास सांगणारे, इस्रायलच्या सैनिकांना बंधक बनवून त्यांची गाझा शहरात मिरवणूक काढणारे दहशतवादी बघितल्यावर यांना पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यापेक्षा आयसिससारखे इस्लामिक मुलतत्ववादी राज्य बनवायचे आहे, हे सर्व जगाला समजले.

दि. ६ ऑक्टोबर, १९७३ रोजी अरब देशांनी एकत्रितपणे इस्रायलवर हल्ला केला होता. ज्यू लोकांसाठी वर्षातील सर्वात पवित्र दिवशी या युद्धाला सुरुवात झाल्यामुळे त्याला ‘यॉम किप्पुर युद्ध’ म्हणून ओळखण्यात येते. या युद्धात इस्रायल निर्णायकरित्या विजयी झाले असले, तरी सुरुवातीला इस्रायलला प्रचंड प्राणहानी आणि नुकसान सोसावे लागले. या युद्धाला ५० वर्षं पूर्ण होत असताना ‘हमास’ने इस्रायलवर हल्ला केला. यॉम किप्पुर युद्धामध्ये अरब देशांची सैन्यदलं लढत होती आणि त्यात सामान्य इस्रायली लोकांना, त्यांच्या वस्त्यांना लक्ष्य करण्यात आले नव्हते. या युद्धात इस्रायली नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आले. गाझा पट्टीजवळच्या एका किबुत्झमधील १०० लोकांना मारण्यात आले. या युद्धामध्ये ‘हमास’ची रॉकेट्स तेल अवीव आणि जेरुसलेम या शहरांपर्यंत पोहोचली. इस्रायलची सुमारे ७० टक्के जनता या रॉकेटच्या हल्ल्यांमुळे प्रभावित झाली. इस्रायलने विकसित केलेल्या आयर्न डोम प्रणालीमुळे बहुतांशी रॉकेट हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करण्यात आली असली, तरी सातत्याने सायरन वाजत असल्यामुळे सामान्य लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.

इस्रायलच्या कारवाईचे तीन भाग आहेत. इस्रायलमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून त्यांच्या तावडीतून बंधकांना सोडवणे, सीमेवरील कुंपणाची डागडुजी करून तिथे सैन्याची गस्त वाढवणे, तिसरा भाग म्हणजे गाझा पट्टीत कारवाई करून ‘हमास’ वापरत असलेल्या इमारती आणि शस्त्रास्त्रं उद्ध्वस्त करणे आणि इस्रायली बंधकांची सुटका करणे. ‘हमास’ ही संघटना इराणच्या आदेशावरून काम करते. इराणकडून ‘हमास’ला गुप्तवार्ता आणि शस्त्रास्त्रं पुरवली जातात. कतार हा अरब देश मानवतेच्या दृष्टिकोनातून गाझापट्टीला मदत करतो. गेल्या काही वर्षांमध्ये कतारने ‘हमास’ला एक अब्ज डॉलरहून जास्त मदत केली आहे.

गाझामध्ये शिक्षण, रोजगार आणि घरबांधणीसाठी पाठवलेल्या पैशांतील मोठा हिस्सा ‘हमास’कडून दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येतो. गाझा पट्टीची लांबी सुमारे ४० किमी असून रुंदी अवघी सहा ते १२ किमी आहे. १९६७ ते २००५ सालापर्यंत गाझा पट्टी इस्रायलच्या ताब्यात असल्याने तिथे आधुनिक शेती आणि इमारतींची निर्मिती करण्यात आली होती. गाझातील सुमारे ३६५ चौ. किमी भूभागात २० लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. ‘हमास’कडून मशिदी, रुग्णालय आणि शाळांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केला जातो. शाळांमधून इस्रायलच्या नागरी वस्तीमध्ये रॉकेट डागण्यात येतात. इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात लहान मुलं मारली गेल्यास ‘हमास’ त्याचा फायदा घेते. दुर्दैवाने जगभरातील स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोक या परिस्थितीची कल्पना नसल्याने किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून ‘हमास’बद्दल सहानुभूती दाखवतात.

या हल्ल्यामुळे इस्रायलची खपली काढली असून, जगभरातील ज्यू लोकांच्या मनात दुसर्‍या महायुद्धादरम्यान करण्यात आलेल्या नरसंहाराच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. इस्रायलमध्ये हल्ल्यात सुमारे एक हजार माणसं मारली जाणं म्हणजे भारतात सव्वा लाख माणसं मारली जाण्यासारखं आहे. त्यामुळे इस्रायलने या हल्ल्याकडे दहशतवाद म्हणून न पाहता युद्धाची घोषणा केली. गाझा पट्टीला इस्रायलकडून करण्यात येणारा वीज, इंधन आणि अन्नपुरवठा बंद करण्यात आला आहे. ज्या इमारतींचा ‘हमास’ने रॉकेट डागण्यासाठी किंवा हल्ल्याचे नियोजन करण्यासाठी वापर केला, त्या इमारती हवाई हल्ल्यांद्वारे जमीनदोस्त करण्यात येत आहेत.

या युद्धाची व्याप्ती वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ‘हमास’ला लेबनॉनमधील ‘हिजबुल्ला’ची आणि या दोघांनाही इराणची सक्रिय मदत आहे. या युद्धामध्ये ‘हिजबुल्ला’नेही सहभागी व्हावे. तसेच, इस्रायलमधील अरबांनी आणि जॉर्डन नदीच्या पश्चिम खोर्‍यातील पॅलेस्टिनी लोकांनी सहभागी व्हावे, यासाठी आवाहन करण्यात येत आहे. लेबनॉनमधून होणार्‍या घुसखोरीच्या प्रयत्नांना इस्रायलने हाणून पाडले आहे. ‘हिजबुल्ला’ने इस्रायलमध्ये तोफगोळ्यांचा वर्षाव केला असला, तरी अजूनही क्षेपणास्त्रांचा वापर केला नाही. अमेरिकेने इस्रायलच्या समर्थनासाठी भूमध्य समुद्रात विमानवाहू नौका पाठवली असून, त्याद्वारे इराण आणि ‘हिजबुल्ला’ला या युद्धापासून चार हात अंतर राखायचा इशारा दिला आहे. एरवी इस्रायलकडून एकतर्फी अपेक्षा करणार्‍या युरोपीय देशांनीही या प्रसंगात ठाम भूमिका घेतली आहे.

या युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ल्याच्या दिवशी ट्विट करून आपल्याला धक्का बसल्याचे आणि या कठीण प्रसंगी आपण इस्रायलसोबत असल्याचे जाहीर केले. मंगळवार, दि. १० ऑक्टोबर रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी मोदींना फोन करून इस्रायलकडून केल्या जात असलेल्या कारवाईची माहिती दिली. तेव्हाही मोदींनी भारतीय जनता इस्रायलच्यासोबत असल्याचे सांगून भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करत असल्याचे सांगितले. १९९२ साली भारत आणि इस्रायल यांच्यात पूर्ण राजनयिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर ते सातत्याने सुधारत असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात आणखी झपाट्याने वाढ झाली.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात समतोल साधण्याची कसरत न करता भारताने दोन्ही देशांशी आपल्या राष्ट्रीय हिताच्या तराजूत तोलायला सुरुवात केली. दोन्ही देशांमध्ये दहशतवादाविरूद्धच्या युद्धात भरीव सहकार्य असले तरी यापूर्वी इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून इस्रायलला उघडपणे पाठिंबा देण्यात आला नव्हता. पण, मोदींच्या ट्विटमुळे ‘हमास’च्या दहशतवादाचा पॅलेस्टिनी लोकांच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेशी काहीही संबंध नसल्याची भारताची भूमिका अधोरेखित झाली. आज सभोवताली नजर टाकली असता युक्रेन, आर्मेनिया, नायजर, सुदान, बुर्किना फासो, माली, गिनिया आणि अफगाणिस्तानात युद्ध किंवा यादवी युद्ध झाल्याचे दिसून आले. इस्रायल आणि ‘हमास’मधील युद्धाची व्याप्ती वाढल्यास त्यात पश्चिम अशिया होरपळून निघण्याची शक्यता आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.