पाकफुटी...

    20-Jan-2023   
Total Views |
pakistan food crisis



लड़ के लिया है पाकिस्तान;
हंस के लेंगे हिंदुस्तान...


अशा वल्गना करणारा पाकिस्तान आता अन्नाच्या दाण्या दाण्याला वंचित होण्याची चिन्हे दिसत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, म्हणे आता पाकिस्तान्यांची नवी घोषणा आहे-
 
लड़ के लिया है पाकिस्तान;
मरमर के लेंगे आटा दाल



असो. पाकिस्तान एक अत्यंत विद्वेषी राष्ट्र. ‘कणभर वजन आणि मणभर चरबी’ अशी एक ग्रामीण म्हण आहे किंवा स्वत:चे नाक कापून समोरच्याला अपशकून करायचे ही म्हण असेल; ही केवळ आणि केवळ पाकिस्तान या देशासाठीच निर्माण झाली की काय, असे या देशाचे जन्मापासूनच विवेकशून्य आणि विघातक कृत्य. पाकिस्तानवाल्यांच्या श्रद्धेनुसार कयामतच्या दिनी कर्माचा हिसाब होतो म्हणे! या त्यांच्या विश्वासाला खरे मानायचे, तर पाकिस्तानचा कयामतचा दिन आलेला दिसतोय. भारत ‘विश्वगुरू’च्या नामावलीत असताना पाकिस्तान मात्र ‘भिकीस्तान’च्या नावाने प्रसिद्ध झाला.

अनेक अंतर्गत आणि बाह्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या पाकिस्तान सध्या त्राहिमाम झाले आहे. पण, पाकिस्तानच्या अशा परिस्थितीबद्दल कुणालाही दया येत नाही. कारण, पुन्हा आधी सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानचे अत्यंत विश्वासघातकी कृत्य. जसे अमेरिकेने कधी काळी पाकिस्तानला मित्रराष्ट्र समजून सर्वार्थाने मदत केली होती. मात्र, अमेरिकेने शत्रू ठरवलेल्या अतिरेक्यांना सहारा कुणी दिला, तर पाकिस्तानने! अमेरिकेने पाकिस्तानचा विकास व्हावा म्हणून या देशाला आर्थिक मदत केली. मात्र, पाकिस्तानने या मदतीचा गैरवापरच केला. अमेरिकेने दिलेल्या पैशांचा वापर पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसण्यासाठी केला. भरीसभर अमेरिकेचा विरोधक असलेल्या चीनलाही पाकिस्तानने आपला आका बनवले.

पाकिस्तानला अमेरिका सहकार्य करू इच्छित नाही. त्यामुळेच की काय, अमेरिका अफगाणिस्ताननंतर गैर-‘नाटो’ सहयोगीचा दर्जा परत घेण्याचा विचार करत आहे. यासाठी अमेरिकेचे सांसद एंडी बिग्स यांनी त्या आशयाचे विधेयकही मांडले. या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची सही होण्याआधी हे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये मांडले जाणार आहे. याचाच अर्थ, अमेरिकने हे स्वीकारले आहे की, पाकिस्तान आता अफगाणिस्तानच्या पातळीवर उतरलेला देश आहे आणि अफगाणिस्तान जगाच्या काळ्या यादीत आहे.

दुसरीकडे अफगाणिस्ताननेही पाकिस्तानची साथ सोडली. अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकार तसेच अन्य दहशतवादी पाकिस्तानी सीमेवर सातत्याने हल्ले चढवत आहे. सौदी अरेबियाने तर जाहीरच केले की, विनाअटीशर्तींशिवाय पाकिस्तानला कर्ज देणार नाही, तर चीनचे स्वतःचेच धाबे दणाणले आहेत. कोरोनामुळे चीनमधली अंतर्गत व्यवस्था ढासळली आहे. थोडक्यात, पाकिस्तानला ज्यांच्या ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या सगळ्यांनी पाकिस्तानला टाटा बायबाय केले.पाकिस्तानला तर १०० अरब डॉलर्स कर्ज म्हणून हवे आहेत. हे कर्ज मिळाले की, देशाची व्यवस्था पूर्ववत होईल, असे पाकिस्तानला वाटते.

मात्र, सध्या तरी अशी काही मदत विनासयास उपलब्ध होईल, असे काही वाटत नाही. तसेही पाकिस्तानमधील पंजाब प्रांत सोडला, तर सगळ्याच प्रांतांनी पाकिस्तानपासून फुटून निघण्याचे प्रयत्न केले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानेही स्वत:ला कधीही पाकस्तानचा भाग समजले नाही. पाकिस्तानमध्ये आर्थिक परिस्थिती रसातळाला गेली असताना, आता या प्रातांमध्ये गेले सात दिवस आंदोलन सुरू आहे. या प्रांतातील नागरिकांच्या मागण्या आहेत की, गहू आणि अन्य खाद्यसामग्रीवर पाकिस्तानने ‘सबसिडी’ द्यावी, ‘लोडशेडिंग’ बदं करावे, पाकिस्तानी सैन्याचा जमिनीवर आणि संसाधनांवर कब्जा सोडावा आणि सगळ्यात मोठी मागणी आहे की, गिलगिट ते कारगील रस्ता खुला करावा, गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताच्या कारगीलमध्ये समाविष्ट व्हावा.

अर्थात, गिलगिट-बाल्टिस्तानच्या नागरिकांनी या मागण्या करत कितीही आंदोलन केली तरी पाकिस्तान त्यांची एकही मागणी पूर्ण करू शकत नाही. मात्र, याच आयामात एक सिद्ध झाले की ‘हस के लेंगे हिंदुस्तान’ म्हणणार्‍या पाकिस्तानमधली नागरिकच रोते रोते भारताशी जोडण्याची मागणी करत आहेत. जगाच्या पटलावर पाकिस्तानकडे आता काय उत्तर आहे?









आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.