ब्रिटनमध्ये शिळ्या कढीला पुन्हा उत, पंतप्रधान सुनक यांची मात्र भूमिका स्पष्ट

मोदीविरोध बीबीसीच्या अंगलट !

    19-Jan-2023   
Total Views |
नरेंद्र मोदी

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हिंदूविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्या बीबीसी या ब्रिटनच्या राष्ट्रीय वाहिनीस यावेळी मोदीविरोध चांगलाच महागात पडला आहे. युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या माहितीपटाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे बीबीसीचा गुजरात दंगलविषयक माहितीपट म्हणजे वसाहतवादी मानसिकता असल्याचा सणसणीत टोला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगाविला आहे.

बीबीसी हा ब्रिटीश माध्यमसमुह अनेकदा भारतविरोधी आणि हिंदूविरोधी अजेंडा चालवत असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात येतात. त्याचप्रमाणे या माध्यमसमुहाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील लक्ष्य करण्यात येत असते. यावेळी बीबीसीने विद्यमान पंतप्रधान आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी गुजरात दंगलविषयक इंडिया – द मोदी क्वेश्चन असा दोन भागांचा माहितीपट प्रसारित केला होता. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर २००२ सालच्या गुजरात दंगलीविषयी खोटे आरोप केले होते. विशेष म्हणजे ही माहितीपट केवळ युकेमध्येच प्रसारित करण्यात आला होता.

मात्र, यावेळी बीबीसीला मोदीविरोधी चांगलाच महागात पडला आहे. कारण, याविषयी युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या संसदेमध्ये स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तेथील संसदेमध्ये पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसेन यांनी या माहितीपटाचा मुद्दा उपस्थित करून युकेची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती.त्यास युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, अशाप्रकारच्या घटनांविषयी युकेची भूमिका दीर्घकाळपासून एकच असून ती बदललेली नाही. जेथे कोठे अन्याय होतो, त्याचे समर्थन युके कधीही करत नाही. मात्र, सदस्यांनी जो मुद्दा मांडला आहे त्या प्रकारच्या व्यक्तीचित्रणाशी (कॅरेक्टरायझेशन) मी सहमत नाही, असे पंतप्रधान सुनक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बीबीसीला त्यांच्याच पंतप्रधानांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

बीबीसीच्या वसाहतवादी मानसिकतेवर परराष्ट्र मंत्रालयाचा प्रहार


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, हा विशिष्ट प्रपोगंडाचा भाग असल्याचे स्पष्ट आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची वस्तुनिष्ठता नसून त्यामध्ये जाणीवपूर्वक एकांगी चित्रण करण्यात आले आहे. हा माहितीपट भारतात प्रसारित करण्यात आलेला नाही, यातूनच त्यामागील अजेंडा लक्षात येतो. त्याचप्रमाणे या विषयावर विशिष्ट उद्देशाने हा माहितीपट तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे या माहितीपटाशी संबंधित लोक आणि त्यांच्या संस्थेची एक विशिष्ट विचारसरणी असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे याविषयी तेथील नेत्यांच्या तोंडी चौकशी आणि तपास असे शब्द होते. मात्र, अशाप्रकारचे शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरायचे असतात. अशा प्रकारची भाषा करण्यासाठी ते आता येथे राज्य करतात का, असा खोचक टोलाही बागची यांनी लगाविला आहे.

पक्षपाती अहवालाचा निषेध – लॉर्ड रामी रेंजर


युकेमधील उद्योजक आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड रामी रेंजर यांनी बीबीसीच्या पक्षपाती माहितीपटावर कठोर शब्दात टिका केली आहे. ते म्हणाले, बीबीसीने एक अब्जाहून अधिक भारतीयांना दुखावले आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय पोलिस आणि भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आहे. युके दंगल, त्यात झालेली जिवीतहानी आणि बीबीसीच्या पक्षपाती अहवाल निषेधार्ह आहे. माहितीपटामुळे जगातील सर्वांत मोठी लोकशाही आणि जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा अपमान झाला आहे. ब्रिटीश हिंदू – मुस्लिम यांच्यातील द्वेषास उत्तेजन मिळून ब्रिटनमधील सामाजिक सामंजस्य बिघडवण्याचा प्रयत्न बीबीसीने केल्याचे रेंजर यांनी म्हटले आहे.










आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.