तेल, तूप अन् तांबेही गेले!

    14-Jan-2023   
Total Views |
 
satyajeet tambe
 
 
 
 
तेल गेले, तूप गेले, हाती आली धुपाटणे या म्हणीप्रमाणेच तेल, तूप अन् ‘हात’चे तांबेही गेले, अशीच सध्या काँग्रेसची गत! त्याचे कारण म्हणजे, विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत भाजपकडून पाळण्यात आलेली कमालीची गुप्तता. आधी या जागेसाठी भाजपकडून राजेंद्र विखे पाटील यांचे चर्चेत होते. त्यानंतर भाजपने एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या. मग सत्यजित तांबे यांना भाजप उमेदवारी देणार किंवा तांबे भाजपमध्ये येणार, या चर्चांनाही उधाण आले. पण, घडलं यापैकी काहीही नाही. सत्तांतराला कारणीभूत ठरलेल्या गेल्या वर्षीच्या जून महिन्यातील विधान परिषद निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत भाजपने सूचक संदेश देत रणनीती आखली. सरतेशेवटी अखेरीस नाट्यमय घडामोडीनंतर सत्यजित तांबेंचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी त्यांचे वडील आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेतली आणि नाशिकचा उमेदवार कोण असणार, या प्रश्नाचं उत्तर समोर आलं. अलीकडेच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात यांना “सत्यजित तांबे यांना असं किती दिवस बाहेर ठेवणार? चांगल्या माणसांवर आमचा डोळा आहे,” असे एक सूचक विधानही केले होते. पण, तरीही काँग्रेसने सत्यजित तांबे यांना उमेदवारी डावलण्याचा मूर्खपणा केला आणि त्यातून काँग्रेसवर उमेदवार जाहीर करूनही निवडणुकीतून मात्र माघार घेण्याची नामुष्की ओढवली. याचे कारण म्हणजे, विविध उमेदवारांची नावे चर्चेत ठेवून देवेंद्र फडणवीसांनी अखेरपर्यंत काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला गाफील ठेवले आणि उमेदवार जाहीर करूनही काँग्रेस निवडणुकीतून आपसुकच बाहेर पडली. भाजपकडे उमेदवार नव्हता म्हणून भाजप या प्रक्रियेपासून अलिप्त होती आणि त्यातून त्यांना उमेदवार मिळाला नाही, अशी आवई अनेक माध्यमकर्मींनी उठवली खरी. पण, यात खरा ‘गेम’ कुणाचा झाला, हा प्रश्न उपस्थित झाला, तर त्याचं उत्तर काँग्रेसचा असंच आहे! हक्काचा मतदारसंघ, हक्काचे उमेदवार आणि प्रबळ दावेदार असूनही केवळ अंतर्गत लाथाळ्यांमुळे काँग्रेसला ही जागा गमवावी लागली, हेच खरे!
 
फडणवीसांचे सूचक मौन समजेचीना!
 
 
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जन्माला घातलेल्या सरकारची नौका प्रत्यक्षात बुडायला ज्या दिवशी सुरू झाली होती, तो दिवस होता 21 जून 2022 - विधान परिषद निवडणुकीचा दिवस. भाजपने आपल्याकडे असलेल्या संख्याबळापेक्षाही अधिक कोटा आवश्यक असलेले उमेदवार रिंगणात उतरवले. त्यांच्या विजयाबाबत विचारल्या जाणार्‍या प्रश्नांवर उत्तर देताना सूचक मौनही बाळगले. महाविकास आघाडीतील असंतुष्ट घटक आम्हाला मदत करतील, असा इशारा सातत्याने तत्कालीन सत्ताधार्‍यांना विरोधकांनी दिला. पण, फडणवीसांचे हे सूचक बोल आणि त्याहूनही त्यांचे ते सूचक मौन मविआला तेव्हाही कळले नाही आणि अखेरीस विधान परिषदेतील पराभवासोबतच सरकारही हातून घालवण्याची नामुष्की महाविकास आघाडीवर ओढवली, हा इतिहासच. कारण, सत्यजित तांबेंच्या बाबतीत फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत इशारे देऊनही पडद्याआड नक्की काय चाललंय, हे काँग्रेस आणि बाळासाहेब थोरातांसारख्या मुरलेल्या राजकारण्यांच्या लक्षात आलं नाही का, हाच मूळ प्रश्न आहे. भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघाबाबत उशिरा निर्णय घेऊनही नाशिकचा उमेदवार जाहीर केला नव्हता आणि शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आपले पत्ते उघड करत नव्हता, यातून भाजपच्या कृतीचा साधा संशयही काँग्रेसला आला नसेल का?
’मविआचे सरकार अंतर्विरोधातून पडेल, ते पाडण्यासाठी भाजपला काहीही करावे लागणार नाही,’ हे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सूचक पद्धतीने सांगूनही मविआ आणि विशेष म्हणजे कथित थोर नेते पवार साहेबही त्याचा अंदाज लावू शकले नाहीत अन् अखेरीस मविआ सरकार खालसा झाले. मागील आठ वर्षांत फडणवीसांनी असे अनेक सूचक इशारे विरोधकांना वेळोवेळी दिले. पण, त्याचे गांभीर्य ओळखून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यावर कुणीही लक्ष दिले नाही आणि फडणवीसांनी आपल्या खेळी यशस्वी करून दाखवल्या, हा आठ वर्षांचा इतिहास सांगतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आलेले निकाल, त्या पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद अन् राज्यसभेत फडणवीसांनी दिलेले इशारे न ओळखल्यानेच आज मविआची स्थिती इतकी केविलवाणी झाली आहे. असो. आपणच मुरब्बी राजकारणी, आपल्याला सगळे कळते, या भ्रमात असलेल्या काँग्रेसच्या राजकीय गर्वाचा फुगा यानिमित्ताने पुन्हा एकदा जोरदार फुटला आणि या पक्षातील कुरबुरी पुन्हा चव्हाट्यावर आल्या.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.