फाटके तोंड, दुर्गंधी शब्द

    01-Jan-2023   
Total Views |
 people defaming great men


सत्तेच्या राजकारणासाठी महापुरुषांच्या बदनामीची ही मोहीम चालू आहे. आपणच खरे हिंदुत्ववादी आहोत, असे काही लोकांना वाटते, तर काही लोकांना असे वाटते की, आपणच खरे धर्मनिरपेक्षवादी आहोत. आणखी काही जणांना वाटते की, आपणच खरे बुद्धिवादी आहोत, डोळस श्रद्धावादी आहोत.


सध्या महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान होत आहे, याची खूप ओरड चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांची बदनामी, महाराष्ट्राचे ‘थोर’ नेते शरदराव पवार यांची बदनामी, असे अनेक विषय चालू असतात. फाटक्या तोंडाचे आणि दुर्गंधी वाणीचे काही स्त्री-पुरुष नेते महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या जिभेला हाड नाही. (तसे ते कोणाच्याही जिभेला नसते) पण या दोघांची जीभ जरा जास्तच सैल सुटते. म्हणून जिभेला हाड नसते, ही म्हण त्यांना तंतोतंत लागू पडते.

विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली. चर्चा म्हणजे आरोप-प्रत्यारोप झाले. देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिले. फडणवीस उत्तम वक्ते आहेत आणि अभ्यास करून ते बोलतात. त्यामुळे त्यांचे भाषण जिभेला हाड नसलेल्यांचे भाषण होत नाही. ते म्हणाले की, “राज्यात महापुरुषांचा अपमान होत असल्यामुळे त्यावरील नियंत्रणासाठी विधेयक आणावे, यासाठी उदयनराजे यांनी माझी भेट घेतली, तसे पत्रही लिहिले, याविषयावर एकतर्फी चर्चा होत असून दुसरी बाजूदेखील सांगण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगवान श्रीराम आणि सीतामाई यांच्याबाबत वक्तव्य करण्यात येते, यावेळी अपमान होत नाही का?”

महापुरुषांच्या बदनामीच्या यादीत केवळ वारकरी संप्रदायालाच नव्हे तर महाराष्ट्राला श्रद्धास्थानी असलेले संत ज्ञानेश्वरदेखील सुटलेले नाहीत. सत्तेच्या राजकारणासाठी महापुरुषांच्या बदनामीची ही मोहीम चालू आहे. आपणच खरे हिंदुत्ववादी आहोत, असे काही लोकांना वाटते, तर काही लोकांना असे वाटते की, आपणच खरे धर्मनिरपेक्षवादी आहोत. आणखी काही जणांना वाटते की, आपणच खरे बुद्धिवादी आहोत, डोळस श्रद्धावादी आहोत. हा राजकीय तमाशा विधानसभेच्या निवडणुका येईपर्यंत चालू राहणार आहे. कोणी कितीही सांगितले की, जिभेवर नियंत्रण ठेवा, त्याचे पालन केले जाणार नाही.
ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर मला माझ्या सवयीप्रमाणे भगवान गौतम बुद्धांची आठवण झाली आणि अष्टांग मार्गातील त्यांचा दुसरा विषय ‘सम्यक् वाणी’ याची आठवण झाली. वाणी ही शक्ती आहे आणि तिचा वापर फार जपून करावा लागतो, याचे सर्वश्रेष्ठ ज्ञान झालेल्या महापुरुषांत भगवान गौतम बुद्धांची गणना करावी लागते. त्यांचा ‘सम्यक् वाणी’चा विषय अष्टांग मार्गापुरता मर्यादित राहत नाही.

‘संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, मझ्झिम निकाय’ या सुक्त पीठकातील विभागात वाणी संबंधी अनेक सूक्ते आहेत. २६०० वर्षांपूर्वी भगवंत काय सांगून गेले, हे खूपच महत्त्वाचे आहे.‘संयुक्त निकाया’तील एका सूक्तात भगवंतांनी ‘सम्यक् भाषण’ म्हणजे काय? याची व्याख्या केली आहे. ती अशी असत्य भाषणापासून दूर राहणे, दरी निर्माण करणार्‍या भाषणापासून दूर राहणे, शिवीगाळ करणार्‍या भाषणापासून दूर राहणे आणि निरर्थक भाषणापासून दूर राहणे. या चार गोष्टी म्हणजे सम्यक-यथोचित भाषण होय. असे भाषण आपल्या महाराष्ट्रातील आपले लाडके नेते महिन्यातून कितीवेळा करतात, याचा शोध त्या त्या नेत्यांच्या अनुयायांनी केला पाहिजे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफिवीर आहेत, हे झाले असत्य भाषण. हे बदनामी करणारे भाषण आहे. इंग्रजांना सावरकरांनी लिहिलेली पत्रे शब्दार्थाने वाचायची नसतात, हे न समजण्याची अक्कल दर्शविणारे हे भाषण आहे. असे भाषण करू नये, असा उपदेश भगवंतांनी ‘राहुल सूक्ता’त आपला पुत्र राहुल याला केलेला आहे. त्याच राहुलचे नाव घेऊन हे दुसरे राहुल फिरत आहेत, त्यांनी राहुलला कोणता उपदेश केला होता, याचे वाचन करायला पाहिजे.
 
 
यानंतर भगवंत सांगतात, “चांगल्या भाषणाचे पाच गुणधर्म आहेत.” हे पाच कोणते?

१) योग्यवेळी योग्य भाषण केले पाहिजे.

२) सत्य बोलले पाहिजे.

३) भाषा मृदू आणि मुलायम असायला पाहिजे.

४) या भाषणातून सर्वांचे कल्याण झाले पाहिजे.

५) मानसिक सद्भावनेने भाषण केले पाहिजे.

आपल्या महाराष्ट्रात महापुरुषांच्या अवमानाचा जो विषय चालू आहे आणि जी भाषणे केली जात आहेत, त्याला आपण या पाच कसोट्या लावाव्यात. त्यानंतर आपण या भाषणांची चिरफाड करू शकतो.भगवंत येथेच थांबत नाहीत, ते पुढे जाऊन आणखी असे सांगतात की, “जाणीवपूर्वक असत्य बोलणे हा असा दोष आहे की, ज्यामुळे अनेक वाईट गोष्टींचा एकापाठोपाठ एक जन्म होत जातो. कोणतेही दुष्कर्म करण्यास असा माणूस सहजपणे धजावतो. म्हणून दुसर्‍याला इजा पोहोचणार नाही, अशा वाणीचाच उपयोग केला पाहिजे.” कानाला गोड वाटणार्‍या शब्दांतच बोलले पाहिजे, असे शब्द दुसरे स्वीकारतात.

 दुसर्‍यावर वाईट परिणाम न करणारे भाषणच चांगले भाषण असते. अंगुत्तर निकायातील एका सुक्तात भगवंतांनी जे सांगितले आहे, त्याचा सारांश असा. ‘जी व्यक्ती असत्य भाषण करीत नाही, अशी व्यक्ती नगरसभेत गेली असता किंवा नातेवाईकांच्या मेळाव्यात गेली असता त्याला जर विचारले, तुला काय माहिती आहे, ते आम्हाला सांग. आपण जे पाहिले नाही, त्याबद्दल तो काही बोलत नाही. दुसर्‍यांना फसविण्यासाठी तो गोड बोलत नाही. चुकीचे संभाषण तो अजिबात करीत नाही. त्याची वाणी सत्यच असते आणि सत्यालाच धरून तो राहतो. निरर्थक गावगप्पांमध्ये तो भाग घेत नाही. या गावगप्पा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवितात. त्यापासून तो दूर राहातो. या प्रमाणे वर्तणूक केली असता, वाणी शुद्धता प्राप्त होते.’
भगवंतांना सांगायचे आहे की, वाणी शुद्धता ही एक शक्ती आहे. ही सरस्वती शक्ती आहे. सरस्वतीचाच अपमान करणार्‍यांना या वाणीशक्तीचा काय प्रभाव असतो, हे कसे समजणार?

स्वामी विवेकानंदांची वाणी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत गरजली. तिने धार्मिक क्रांतीची लाट निर्माण केली. महात्मा गांधीजींची वाणी ऑगस्ट क्रांती मैदानावर गरजली तिथून ‘चले जाव’चे आंदोलन उभे राहिले आणि इंग्रजांना भारत सोडावा लागला. शुद्ध, सात्विक, सत्य वाणीची ही शक्ती असते. फाटक्या तोंडाच्या आणि दुर्गंधी शब्दांच्या स्त्री-पुरुष नेत्यांना हे कसे काय समजणार? मझ्झिम निकायातील एका सूक्तात आपला पुत्र राहुल याला भगवंत सांगतात, “राहुल जेव्हा जेव्हा तुला वाणीक्रिया (बोलायचे) असेल तत्पूर्वी तू विचार कर, जी वाणीक्रिया मी करणार आहे, त्यामुळे मला दु:ख होणार आहे का, ऐकणार्‍याला दु:ख होणार आहे का, विचारांती तुला असे वाटले की, माझी वाणीक्रिया मला दु:खदायी होणार आहे, ऐकणार्‍यालादेखील दु:खदायी होणार आहे तेव्हा ही वाणीक्रिया तुझ्यासाठी पूर्णपणे अयोग्य आहे, असे समजले पाहिजे. परंतु, याच्या उलट जर होणार असेल, तर म्हणजे स्वत:ला सुख देणारे असेल, अन्यांना सुख देणारे असेल तर ती वाणीक्रिया उत्तम समजली पाहिजे.”

 भगवंत राहुलला पुढे म्हणतात की, “वाणीक्रिया म्हणजे संभाषण हे मला आणि इतरांना दु:खदायक आहे, असे जर तुझ्या लक्षात आले, तर तू तुझ्या शिक्षकांना तसे सांग. आपली चूक मान्य कर. भविष्यात वाणीवर संयम ठेवण्याचा प्रयत्न कर.” आपला मुलगा आहे म्हणून भगवंत राहुलकडे वेगळ्या दृष्टीने पाहात नाहीत. जो उपदेश सर्वांना तोच उपदेश राहुललादेखील. राहुलने या उपदेशाचे पालन आपल्या जीवनात केल्याचे दिसते. त्यामुळे त्याचे नाव २६०० वर्षांनंतरही आदराने घेतले जाते. हा आपला इतिहास लक्षात ठेवावा. राहुल आणि त्यांचे नवहिंदुत्ववादी संयोगी आणि त्यांना मिळालेले फाटक्या तोंडाचे नेते याचे स्मरण अडीच हजार वर्षांची गोष्ट सोडा पुढील अडीच वर्षांने तरी कोणी करेल की नाही, याचा विचार त्यांनीच करावा. आपल्याकडे असे सांगितले जाते की, जे आरंभी सुखकारक असते, ते अंतिमत: दु:खकारक होते. फाटक्या तोंडाच्या भाषणांना टाळ्या पडतात, त्याचे व्हिडिओ प्रसारित होता, टाळ्या ऐकून आणि व्हिडिओ बघून मनाला सुख होते, हे क्षणिक सुख असते. जीवनप्रवाहात त्याला काही किंमत नसते.






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.