यात्रा सुरू, पण यात्रेकरू गायब

    16-Sep-2022   
Total Views |
RAHUL,ADITYA


 
 
सध्या देशात घराणेशाहीच्या राजकारणाला घरघर लागल्याचे चित्र आहे. पंजाबात बादल परिवाराचे अस्तित्व सत्ता गेल्यानंतर धोक्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ जाताच अब्दुल्ला परिवाराला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे, महाराष्ट्रात ठाकरेंचं पानिपत झालेलं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं, तर राष्ट्रीय पातळीवर दरबारी राजकारणाला कवटाळून बसलेल्या काँग्रेसची वाताहत गांधींच्याच हातून होत आहे. या सार्या घटनाक्रमात दोन युवराज आपली घराणेशाही आणि पर्यायाने आपला कुटुंबकेंद्रित पक्ष वाचविण्यासाठी वेळ निघून गेल्यावर का होईना, पण मैदानात उतरले आहेत. देशात युवकांचे नेतृत्व म्हणवले जाणारे ५२ वर्षीय युवराज राहुल गांधी ‘भारत जोडो’चा नारा घेऊन केरळपासून काश्मीरपर्यंत पायी यात्रा काढत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उरलेली संघटना शाबूत ठेवण्यासाठी आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
 
 
 
पण, विरोधाभास म्हणजे, या दोन्ही यात्रा सुरू असतानाच त्या त्या पक्षातील मंडळी यात्रेतच पक्षाला रामराम ठोकत आहेत. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात ‘शिवसंवाद यात्रा’ काढायला सुरुवात केली आणि ठाकरे गटाचे एकेक पदाधिकारी शिंदेंच्या नेतृत्वात डेरेदाखल झालेले पाहायला मिळाले. आमदार, खासदार, पदाधिकारी आणि युवासेनेतील मंडळी मुंग्यांची रांग लागल्याप्रमाणे शिंदे गटात सहभागी होत असताना आदित्य ठाकरेंची यात्रा नेमकं काय साध्य करत आहे, हे एक कोडंच आहे.
आदित्य पाठोपाठ काँग्रेसचे युवराजही ‘भारत जोडो’ यात्रा करत असताना यात्रेतील यात्रेकरू मात्र आपला भाविकांचा जत्था घेऊन भाजपच्या दिंडीत सहभागी झालेले आहेत.
 
 
 
गोवा काँग्रेसच्या ११ पैकी आठ आमदारांनी ‘कमळा’चा स्वीकार केल्यानंतर राहुल गांधींनी देशाच्या आधी आपला पक्ष का जोडू नये, हा सवाल विचारल्याशिवाय राहवत नाही. आपल्या नाकाखालून गोव्यात आठ आमदार भाजपत जातात, आपण सत्तेत असताना आपले ४० आमदार मंत्र्यांसह बंडखोरी करतात, पण सत्ताधार्यांच्या हे लक्षात येत नाही की, हे युवराजांच्या एकाधिकारशाहीचेच प्रतीक आहे. त्यामुळे युवराजांनी यात्रा जरूर काढाव्यात. पण, त्यात मागे किमान एकनिष्ठ असे यात्रेकरू तरी ठेवावेत अन्यथा संघटनेची आणखी शोभा व्हायला वेळ लागणार नाही.
पोटनिवडणूक- पालिकेची ‘लिटमस टेस्ट’?
मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्या जागेवर आता पोटनिवडणूक होणार, हे निश्चित आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये विजय मिळवलेल्या आणि सलग तीनवेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक राहिलेल्या लटकेंच्या निधनामुळे शिवसेनेसाठी मोठी पोकळी निर्माण झाली. या पोटनिवडणुकीत शिंदे गट आणि भाजपमधून भाजपचाच उमेदवार निवडणूक लढवणार, हे आता अप्रत्यक्षरित्या स्पष्ट झालं असलं तरी ठाकरे गटाची भूमिका अजून निश्चित झालेली नाही. विशेष म्हणजे राज्यात स्वखुशीने म्हणा किंवा बळजबरीने, पण एकमेकांच्या हातात हात घालून असलेल्या महाविकास आघाडीतील बेबंदशाही या निवडणुकीतदेखील दिसणार हे नक्की.
 
 
 
कारण, महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी कुठलीही सल्लामसलत न करता ठाकरे गटाने या जागेवरून रमेश लटकेंच्या पत्नीला उमेदवारी देण्याची घोषणाच करून टाकल्याने काँग्रेस पुन्हा एकदा नाराज झाली आहे. मनसेने महापालिकांसाठी ‘एकला चलो रे’ म्हणत युतीच्या चर्चांना ‘ब्रेक’ लावला असला तरी अंधेरीत मनसे उमेदवार न देता कदाचित युतीला पाठिंबा देईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे. थोडक्यात काय तर अंधेरी पोटनिवडणुकीत नवनव्या राजकीय समीकरणांची खिचडी होणार. त्यामुळे वेगळी चुरस मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. येत्या काही महिन्यांवर मुंबई महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे.
 
 
 
शिंदे गट मुंबईत आपली ताकद वाढवत आहे, भाजपने तर केव्हाच जनाधाराच्या आधारावर मुंबईत आपला खुंटा मजबूत करून ठेवलाय, मनसेसुद्धा राज यांच्या नवहिंदुत्वाच्या भूमिकेतून प्रेरित होऊन नव्या उत्साहाने सक्रिय झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईत कधी प्रभाव नव्हता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे स्वतः राष्ट्रवादी तरी कितपत गांभीर्याने लक्ष देईल हा सवाल आहे. भाई जगताप विधान परिषदेत जरी निवडून आले असले तरी मुंबई काँग्रेसमध्ये त्यांच्या हाती किती अधिकार आहेत आणि निर्णय स्वातंत्र्य आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत जी समीकरणे जुळतील आणि जो निकाल येईल, तो महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा मार्ग ठरवणारा असेल. तेव्हा मुंबई महापालिकेची ‘लिटमस टेस्ट’ कोण जिंकणार, यावर महापालिकेचा संभाव्य निकाल अवलंबून आहे, असे म्हणायला हरकत नाही.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.