दृष्टिक्षेपात ‘आयएनएस विक्रांत’

    13-Sep-2022   
Total Views |
vikrant
 
‘आयएनएस विक्रांत’ ही केवळ युद्धनौका नाही, तर भारताचे अनेक वर्षांचे परिश्रम, कौशल्य, शक्ती आणि कटिबद्धता यांचा मूर्तिमंत आविष्कार आहे. भारताची स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका कोचीन शिपयार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलाच्या ताफ्यात या महिन्यात दाखल झाली आहे. त्यानिमित्ताने...
 
 
भूतकाळातील वसाहतवादी खुणा पुसून टाकत, छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित अशा मुद्रा चिन्हांकित नवीन नौदलाच्या ध्वजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच अनावरण केले. तसेच यावेळी ‘आयएनएस विक्रांत’ ही युद्धनौकाही त्यांनी राष्ट्राला अर्पण केली. आजच्या बदललेल्या भू-राजकीय परिस्थितीविषयी भाष्य करताना पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, “याआधी हिंद-प्रशांत महासागर आणि हिंद महासागराच्या सुरक्षेच्या मुद्द्याकडे कदाचित पूर्ण दुर्लक्ष केले जात असे. मात्र, आज भारतासारख्या देशात, संरक्षण क्षेत्राच्या धोरणात या प्रदेशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक दिशेने, जे शक्य असतील ते प्रयत्न करणार आहोत.”
 
 
 
“दि. २ सप्टेंबर हा दिवस आपल्यासाठी खरोखर ऐतिहासिक ठरला असून, भारताने गुलामीच्या खुणा, गुलामीचे ओझे फेकून दिले आहे,” असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. “आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामीची जी खूण कायम होती, ती आजपासून काढून टाकण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन, तयार करण्यात आलेला हा नौदलाचा नवा ध्वज, भारताच्या समुद्र परिसरात आणि आकाशात यापुढे दिमाखाने फडकेल,” असे पंतप्रधान म्हणाले.
 
 
 
भारताच्या विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’मुळे नौदलाच्या शक्तीमध्ये खूप वाढ होईल. ही विमानवाहू युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असून चीनच्या वाढत्या नौदल शक्तीला हिंद महासागर क्षेत्रामध्ये ती चोख उत्तर देऊ शकेल.
 
लढाऊ विमानांची माहिती
 
ही युद्धनौका जेव्हा सर्व साहित्यानिशी संपूर्णपणे २०२३ मध्ये कृतिशील होईल, तेव्हा ‘विक्रांत’ युद्धनौकेतील वायू विभागामध्ये ३० विविध प्रकारची हवाई जहाजेही असतील.
 
‘विक्रांत’ युद्धनौकेकरिता भारत सरकार अमेरिकन सरकारच्या संस्थेकडून २६ नवीन लढाऊ विमानांचा ताफा खरेदी करणार आहे. ही लढाऊ विमाने फ्रेंच ‘राफेल-एम’ विमानांच्या तोडीची असतील. हा विमानांचा ताफा फक्त तात्पुरत्या (ीीेिं-सरि) उपयोगाकरिता वापरला जाणार आहे. कायमच्या वापराकरिता स्वदेशी दुहेरी इंजीनमधून तयार होणारी लढाऊ विमाने काही वर्षात तयार होणार आहेत, तीच विमाने युद्धनौकेत समाविष्ट आहेत.
 
 
हवाई विभागांतील विमानांच्या, पुढील नोव्हेंबरपासून अगदी बारकाईने उड्डाण-चाचण्या घेतल्या जातील व ही नौदलातील ‘विक्रांत’ युद्धनौका हवाई विभागांसह व इतर सर्व लढाऊ साहित्यानिशी पुढील वर्षापासून पूर्णपणे कार्यसिद्ध बनविली जाईल.
भारतीय नौदल ‘विक्रांत’सारखी दुसरी स्वदेशी युद्धनौका बांधण्याच्या देखील विचारात आहे. पहिल्या युद्धनौकेच्या बांधणीचा आता अनुभव गाठीशी असल्याने त्याचा फायदा नक्की मिळेल व सरकार याबाबतीत सारासार गरजेनुसार अंतिम निर्णय घेईल. चीनकडे सध्या दोन अशा युद्धनौका तयार आहेत, हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.
 
 
’विक्रांत’च्या रचनेची माहिती
 
कोचीनच्या गोदीमध्ये ही नौका बांधण्यात आली. या अवाढव्य नौकेमध्ये ३० लढाऊ विमाने - (रशियन बनावटीचे ’मिग २९ के’, रशियन बनावटीचे ‘कामोव-३१ चॉपर्स’, अमेरिकन बनावटीचे ‘एमएच-६० आर मल्टिरोल हेलिकॉप्टर्स’, स्वदेशी आधुनिक ’लाईट रोल हेलिकॉप्टर- ध्रुव’ (एएलएच), ’तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (एलसीए) ) शिवाय २६ लढाऊ विमानांचा ताफा सरकार अमेरिकन सरकारकडून विकत घेणार.
  
 
नौकेवरील एकूण मनुष्यबळ २,२०० इतके असून विविध दालनांकरिता २०० अधिकार्यांसह १६०० कामगार तसेच महिलांकरिता विशेष केबिन सज्ज आहेत. नौकेमध्ये रोज पाच हजार व्यक्तींचे जेवण तयार करण्यासाठी तब्बल ५० आचारी सेवेत असून त्यांना सांगणारा रेशन साठा १०० टन इतका आहे.
 
 
नौकेवर १६ खाटांचे रुग्णालय देखील सज्ज असेल. यामध्ये डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आयसीयु, प्रयोगशाळा, विलगीकरण वॉर्ड, मानसोपचार क्लिनीक यांच्या सुविधा या नौकेवर राहणार आहेत.
नौकेबरोबर क्षेपणास्त्रे - पृष्ठभागावरून हवाई हल्ल्यांकरिता, जवळच्या व दूरच्या क्षेपण हल्ल्यांकरिता विविध प्रणाली असणार आहेत.
 
 
स्वबचावाकरिता - ‘टॉर्पेडो डेकॉय’ आणि ‘चाफ डेकॉय’ प्रणाली आहे.
 
नौकेची व्याप्त जागा - १२,५०० चौमी हे दोन फुटबॉल सामने खेळण्याच्या क्षेत्राएवढे आहे. एकूण खर्च -२० हजार कोटी, एकूण काळ जहाज बांधणीला - १३ वर्षे, नौदलाचे कोचीन शिपयार्डमध्ये ते बांधले. संपूर्ण बनावट - स्वदेशी. यातील साहित्य - ७६ टक्के स्वदेशी. छोटे व लघु उद्योगधंदे संबंधित - १०० च्या वर आहेत. ४० हजार टनांहून अधिक वजनाच्या युद्धनौका बनविणारे सध्याचे पाच देश म्हणजे अमेरिका, ’युके’, रशिया, फ्रान्स व चीन आणि आता 42 हजार टन वजनाची नौका असलेला भारत सहावा, या समूहात सामील होईल.
  
 
प्रचंड व विशाल अशा या ’विक्रांत’ नौकेची व्याप्ती - लांबी २६२.५ मी, रुंदी ६१.६ मी. व उंची 59 मी. (सुमारे १८ माळ्याची).
आपत्काळासाठी - ७५० फ्लड सेन्सॉर्स व तीन हजार फायर सेन्सॉर्स; एकूण केबलिंग लांबी २४०० किमी.
देशातील पूर्वीच्या विमानवाहू युद्धनौका
 
‘आयएनएस विक्रांत-१’ (हिची लांबी ५० मीटरने कमी होती) १९५७ मध्ये ’युके’ देशाकडून खरेदी केली व नौदलात 1961 मध्ये दाखल झाली व १९७१ मधील बांगलादेशच्या युद्धात तिने महत्त्वाची भूमिका घेतली होती. १९९७ मध्ये ती निवृत्त झाली.
 
‘विक्रांत’ म्हणजे संस्कृतमध्ये धैर्यशील.
 
दुसरी युद्धनौका ’विराट’ (दिलदार) ही पण निवृत्त झाली. १९८७ मध्ये युकेकडूनच खरेदी केली होती. ती २०१७ मध्ये निवृत्त झाली. रशियाकडून नोव्हेंबर २०१३ मध्ये मिळालेल्या ‘अॅडमिरल गोर्शकाव्ह’ या नौकेची पुनर्बांधणी झाली व तिचे नाव ‘आयएनएस विक्रमादित्य’ असे करण्यात आले. आताच्या ‘विक्रांत’ युद्धनौकेकरिता खाली दाखविलेले आठ अधिकारी ‘विक्रांत’वर कार्यशील राहून महत्त्वाची जबाबदारी घेणार आहेत.
 
 
१. कमाडिंग ऑफिसर - कॅ. विद्याधर हरके हे हवाई खात्याचे ‘इनचार्ज’ आहेत. संपूर्ण हवाई खाते, त्यांच्या हालचालींवर व उड्डाणाची सुरक्षितता बघण्याची जबाबदारी आहे.
 
२. ’एक्झिक्युटिव्ह ऑफिसर’ (सेकंड-इन-कमांड) कॅ. रजत कुमार आहेत. दिवसभरातील सर्व उड्डाणांच्या कामावर निरीक्षण व नियंत्रण ठेवण्याचे त्यांचे काम आहे.
 
३. ’एक्झिक्युटिव्ह ऑफिसर’ कॅ. गुरुदीप बाला असून सर्व उड्डाणाच्या कामावर निरीक्षण व नियंत्रण ठेवणार आहेत.
 
४. ‘मेडिकल ऑफिसर’ सर्जन कमांडर योगेश्वर सुरसे आहेत. मेडिकल कामे व सर्वांच्या आरोग्याची व रुग्णालयाची देखभाल करण्याची त्यांची जबाबदारी आहे.
 
५. ‘लॉजिस्टिक ऑफिसर’ कमांडर शिबु फिलीप हे असून सर्व कामगारांची व अधिकार्यांच्या कामामध्ये निरीक्षण व देखभाल करणे, हे काम ते बघतील.
 
६. ‘इलेक्ट्रिकल ऑफिसर’ कमांडर विनीत कुमार आहेत. सर्व ‘इलेक्ट्रिकल’ कामांवर निरीक्षण व नियंत्रण ठेवणे, वितरण व देखभाल बघणे आणि सेन्सॉर व क्षेपणास्त्रावर नजर ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
 
७. ‘इंजिनिअर ऑफिसर’ कमांडर देविंदर ग्रोव्हर. अभियांत्रिकी कामाचे निरीक्षण करून देखभाल व नियंत्रण ठेवण्याचे काम ते बघतील.
 
८. ’मिटीओरोलॉजिकल ऑफिसर’ कमांडर हरीक्रिष्णन आहेत. उड्डाणाच्या वेळच्या हवेबद्दल निरीक्षण व देखभाल करणे, हे त्यांचे काम असेल.
 
छ. शिवाजी महाराजांनी १७व्या शतकात स्थापिलेल्या नौदलाकडून भारताच्या संरक्षण यंत्रणेला प्रेरणा
 
छत्रपती शिवाजी महाराजांची पश्चिम किनार्यावरील कोकणकडे १६५६-५७ मध्ये दृष्टी गेली व ते कल्याणला पोहोचले. त्याच वर्षी त्यांनी सिद्दीकडे नजर बाळगून सागरी सुरक्षेकरिता नौदल उभारणी केली. कारण, ’जलमेव यस्य बलमेव तस्य’ या बोधवाक्यानुसार जो सागरावर सत्ता स्थापतो, तोच बलवान बनतो, हे शिवरायांना ठाऊक होते. शिवाजी महाराजांनी छोट्या व मध्यम आकाराच्या दहा ते १५ जहाजांनी सुरुवात करून त्यापुढील १५ वर्षांत त्यांच्या नौदलाकरिता फ्लोटिलांसारखी ३५० जहाजे बनविली. त्यातील एक विशेष जहाज म्हणजे, संगमेश्वरी होते. ही जहाजे उथळ पाण्यातूनसुद्धा प्रवास करू शकत होती व परदेशी शत्रूंमध्ये त्यांची दहशत होती.
 
 
छ. शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने सागरी सुरक्षा व नौदलाची निर्मिती करून भक्कम व मजबूत असे त्याकाळचे नौदल साकारले होते. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी व राजाराम यांनी राज्य कारभार व नौदल सांभाळून मराठ्यांची सत्ता दिल्लीपर्यंत पोहोचविली. नौदलाच्या कामावर कान्होजी आंग्रे होते. त्यांनी सतराव्या व अठराव्या शतकात उत्तम कामगिरी करून डच व इंग्रजांना पराभूत करून धडा शिकविला. मुंबई पोर्ट ट्रस्टला० विनोदाने ’कान्होजी आंग्रे ट्रस्ट’ म्हटले जायचे.
पंतप्रधान नरेद्र मोदींनी म्हटले आहे की, “ ‘विक्रांत-२’ ही युद्धनौका चीनच्या भारताविरुद्धच्या कारस्थानांवर नजर ठेवून त्याविरुद्ध भारताची उत्तम सुरक्षा निर्माण करेल.’
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.