लोकमान्यांची तत्वे जागवणारा ‘ल्युटन्स दिल्ली’तला ‘समरसता श्रीगणेश’

सुनील देवधर यांच्या गणेशोत्सवाचे दुसरे वर्ष

    10-Sep-2022   
Total Views |

adsd
 
 
लोकमान्यांची भूमिका म्हणजे सामाजिक भेदभाव नसलेला आणि सर्वांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करणे. त्यांच्या भूमिकेनुसारच आपल्या येथील गणेशोत्सव साजरा केला जातो. म्हटले तर तो घरगुती गणेशोत्सव आणि म्हटले तर सार्वजनिकही आहे. मात्र, त्याच्या मुळाशी आहे ते समरसतेचे तत्त्व! भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेश सहप्रभारी सुनील देवधर यांच्या दिल्लीतील ‘समरसता श्रीगणेशा’विषयी विशेष...
 
 
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील ‘ल्युटन्स झोन’ म्हणजे सत्तावर्तुळ. त्यातही ‘नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू’चे स्थान अधिक महत्त्वाचे. कारण, हाकेच्या अंतरावर राष्ट्रपती भवनाची भव्य वास्तू आणि त्याच्याजोडीला संसद भवनाची धीरगंभीर वास्तू आणि देशाच्या कारभार करणार्‍या ‘साऊथ’ आणि ‘नॉर्थ ब्लॉक’च्या शानदार इमारती. त्यामुळे या परिसरात गेल्यानंतर काहीसा ताण मनावर येतोच. मात्र, हा ‘नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू’चा धीरगंभीर परिसर गेले दहा दिवस एका वेगळ्याच उत्साहात होता. निमित्त होते ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सहप्रभारी सुनील देवधर यांच्या ‘211, नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू’ या निवासस्थानच्या समरसता गणेशोत्सवाचे...
 
 
तसे पाहिले तर देशाच्या राजधानीत आणि राजधानी परिसरामध्ये आता भरपूर मराठीजन राहतात. त्यामुळे साहजिकच तेही आता दिल्लीच्या विविध भागांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. अनेक अमराठी लोकदेखील दिल्लीत उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. त्यावर अर्थातच दिल्लीची म्हणावी अशी झाक असतेच आणि सत्तावर्तुळ असलेल्या ‘ल्युटन्स झोन’पासूनही ते काहीसे दूरच असतात. मात्र, देशाच्या सत्तेचे प्रमुख स्थान असलेल्या ‘ल्युटन्स’ परिसरात गेल्या दोन वर्षांपासून भाजपचे नेते सुनील देवधर हे गणेशोत्सव साजरा करत आहेत.
 
 
कुशल संघटक असलेल्या सुनील देवधर यांचे निवासस्थान एरवीही कार्यकर्ते आणि अभ्यागतांनी गजबजलेले असते. मात्र, गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये त्यांचे निवासस्थान एका वेगळ्याच ऊर्जेने भारलेले असते. महाराष्ट्रापासून दूर दिल्लीत कामानिमित्त अथवा शिक्षणानिमित्त राहणार्‍या मराठीजनांसाठी तर या दहा दिवसांमध्ये सुनील देवधर यांचे निवासस्थान हा अगदी हक्काचा थांबा असतो.
 
 
यंदाच्या वर्षी सुनील देवधर यांनी आपल्या निवासस्थानी समरसता गणेशोत्सवाची स्थापना केली होती. त्याविषयी देवधर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “दिल्लीतील अतिशय महत्त्वाच्या अशा ‘ल्युटन्स झोन’मध्ये अनेक वर्षांपासून पारंपरिक असे गणेशपूजन अथवा गणेशोत्सव साजरा होत नव्हता. त्यामुळे गतवर्षी ‘North Avenue’ येथे राहायला आल्यापासून मी त्याची सुरुवात केली. अर्थात, गणेशोत्सव साजरा करायचा म्हणजे लोकमान्य टिळकांच्या भूमिकेनुसारच, असे माझे स्पष्ट मत आहे. लोकमान्यांची भूमिका म्हणजे सामाजिक भेदभाव नसलेला आणि सर्वांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करणे. त्यांच्या भूमिकेनुसारच आपल्या येथील गणेशोत्सव साजरा केला जातो. म्हटले तर तो घरगुती गणेशोत्सव आणि म्हटले तर सार्वजनिकही आहे. मात्र, त्याच्या मुळाशी आहे ते समरसतेचे तत्त्व!”
 
 

सुनील देवधर हे हाडाचे कार्यकर्ते! त्यामुळे गणेशोत्सवाचे सर्व नियोजनही ते आपल्या खास पद्धतीने करतात. गणेशाची प्रतिमा, त्यासाठीचे मखर, सजावट, येणार्‍या भाविकांचे स्वागत, त्यांना उकडीच्या मोदकांच्या रुपात खास मराठमोळा प्रसाद देणे, सर्व मराठी आरत्या म्हणणे, सायंकाळी सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणे हे सर्व देवधर विशेष लक्ष घालून करतात. त्यामुळे गणेशाच्या दर्शनास येणार्‍या मराठीजनांना समाधान वाटतेच, मात्र अमराठी भाविकांनादेखील गणेशोत्सवाचे मूळ स्वरूप बघावयास मिळते. विशेष म्हणजे गणेशाच्या दर्शनास येणार्‍या प्रत्येक भाविकास पुस्तकाच्या रुपातही विशेष प्रसाद मिळतो. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरयांच्याविषयीची पुस्तके जास्तीत जास्त भाविकांना दिल्याचे देवधर यांनी सांगितले.
 
 
 
लोकमान्य टिळकांच्या याच समरसतेच्या तत्त्वानुसार सुनील देवधर यांच्या ‘समरसता श्रीगणेशा’च्या स्थापनेपासूनच समाजातील सर्व घटकांचा त्यामध्ये सक्रिय सहभाग होता. समरसता प्रत्यक्षात उतरवून दररोज समाजातील उपेक्षित, गरीब, वंचित आणि दलितांना गणेशाच्या पूजेचा मान सुनील देवधर यांनी दिला. त्याविषयी बोलताना देवधर म्हणाले की, “गणेशाच्या आरतीमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो. मात्र, गणेशाच्या पूजेचा मानही मोठा असतो. तो मान समाजातील वंचित घटकांना देण्याची माझी भूमिका आहे. त्याअंतर्गत ‘ल्युटन्स’ परिसराची साफसफाई करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांच्या हस्ते एक दिवस गणेशाची पूजा करण्यात आली. आणखी एक दिवस गरीब कुटुंबातील दिव्यांग युवक आणि युवतींच्या हस्ते गणेशाची पूजा आणि आरती करण्यात आली. आपलेच असणार्‍या तृतीयपंथीयांनीदेखील समरसता गणेशाची पूजा आणि आरती केली.”
 
 
वनवासी समुदायदेखील आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे, त्यामुळे एक दिवस ईशान्य भारतातील वनवासी बांधवांच्या हस्ते पूजा आणि आरती झाली. यावेळी केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू आवर्जून उपस्थित होते. विशेष म्हणजे, या वनवासी बांधवांमध्ये हिंदू होते, निसर्गपूजक होते, बौद्ध होते आणि ख्रिश्चनही होते. मात्र, त्या सर्वांनीही गणेशाचे मनोभावे पूजन केले. यातून हिंदुत्वाचा भव्य अवकाश अधिकच अधोरेखित झाल्याचे मत देवधर यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे हिंदू आणि हिंदुत्वाविषयी कोणतीही अडचण नसलेल्या मुस्लीम बांधवांनीदेखील गणेशाचे पूजन केले, टिळा लावून घेतला आणि मनोभावे आरतीही केली. हिंदी पत्रकार रुबिका लियाकत यांनी तर गणेशाच्या पूजेसाठी खास जास्वंदीची फुले आणल्याचे देवधर यांनी यावेळी नमूद केले. लियाकत यांच्यासह जावेद इक्बाल शाह, यासर जिलानी, आतिफ असे विविध क्षेत्रातील लोकही उपस्थित होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही प्राध्यापकांनीही गणेशाची पूजा केली.
 
 
 
 
adsd
 
 
 
लोकमान्य टिळकांनी समाजात समरसता निर्माण होणे आणि एकोप्याची भावना वाढीस लागणे, यासाठी सार्वजनिक गणेशोत्वास प्रारंभ केला होता. दीर्घकाळ रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या सुनील देवधर यांनीही सामाजिक समरसतेस आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच त्यांच्या ‘समरसता श्रीगणेशा’चे दर्शन घेण्यासाठी सर्व जाती आणि धर्मांचे लोक आवर्जून येतात. अगदी अमराठी लोकदेखील अगदी तल्लीनतेने मराठी आरत्या, मंत्रपुष्पांजली म्हणतात, विविध राज्यांतील लोक गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात. दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीच्या शहरामध्ये सुनील देवधर यांनी खर्‍या अर्थाने सामाजिक समरसता साधण्यासाठी गणेशोत्सवास प्रारंभ करून एक नवे आणि आदर्श असे उदाहरण घालून दिले आहे.
  

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये राजकीय, सामाजिक आणि कलाक्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव, किरेन रिजिजू, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा, माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, जेएनयुच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित, पत्रकार नाविका कुमार, आरती टिकू, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती बबिता फोगट, माहिती आयुक्त उदय माहुरकर, गायिका अनिराधा पौडवाल, ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रशांत दामले आदींचा त्यात समावेश होता.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.