गांधी कुटुंबास मतदार यादीही एकनिष्ठ!

    01-Sep-2022   
Total Views |

congress
 
 
 
 
...तर अशी कुटुंबास एकनिष्ठ मतदार यादी आणि त्याद्वारे होणार्‍या निवडणुका काँग्रेसच्या पुढील वाटचालीमध्ये अतिशय महत्त्वाचा ठरणार आहेत. कारण, आझाद म्हणतात त्याप्रमाणे लबाडी करून संघटनात्मक निवडणूक होत असल्याने त्यानंतर काँग्रेसमधून अनेक ज्येष्ठ नेते ‘आझाद’ होण्याची शक्यता आहे. अशा अनेक ‘आझादां’नी तूर्त गुलाम नबींचे नेतृत्व स्वीकारल्यास उर्वरित काँग्रेस पक्षाची अवस्था आणखीनच केविलवाणी होऊ शकते, यात शंका नाही.
 
 
 
काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षातील गांधी कुटुंब दीर्घकाळपर्यंत स्वत:ला लोकशाहीचा एकमेव तारणहार मानत आले. त्यामुळे देशात लोकशाही आहे, ती केवळ काँग्रेस पक्षामुळेच, असा समज काँग्रेस आणि गांधी कुटुंबाच्या भाटांनी मोठ्या आनंदाने पसरविला होता. त्यामुळेच देशात सलग दोनदा स्पष्ट बहुमताने निवडून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर ते ‘इव्हीएम हॅकिंग’ करून निवडून आले, असा तद्दन बालिश आरोप काँग्रेस पक्षाकडून दरवेळी पराभव झाल्यानंतर करण्यात येतो. हा आरोप करताना काँग्रेस पक्षाचा आव असा असतो की, जणूकाही ‘इव्हीएम’ हेच देशातील लोकशाहीचे मारेकरी आहे. मात्र, हा बालिश आरोप करताना देशातील जनता आपल्याला सपशेल का नाकारते, हा विचार गांधी कुटुंबाने कधीही केला नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष आज अभूतपूर्व अशा वाईट स्थितीत आहे.
 
 
 
पक्षाला जवळपास दोन वर्षांपासून पूर्णवेळ अध्यक्ष नाही. पक्षातील हंगामी अध्यक्षांना आता वाढत्या वयामुळे मर्यादा आल्या आहेत. पक्षाचे माजी अध्यक्ष अद्याप पूर्णवेळ राजकारणी होऊ शकलेले नाहीत (होण्याची शक्यताही धूसरच!) आणि पक्षाच्या महासचिव असलेल्यांना नेतृत्व देण्यास पक्षातूनच विरोध आहे. अर्थात, अशी निर्नायकी निर्माण होण्यास पक्षाचे नेतृत्वच कारणीभूत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.नाही म्हणायला दीर्घकाळपर्यंत कुटुंबाच्या जवळ राहून सत्तापदे भोगणार्‍या ज्येष्ठ नेत्यांना आता कदाचित स्वत:चे भविष्य अंध:कारमय दिसायला लागले असावे, म्हणून आता गांधी कुटुंबाच्या पक्षातील एकाधिकारशाहीविरोधात आवाज उठविण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. त्यामध्ये गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी, आनंद शर्मा आदींसह अन्य ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. त्यापैकी आझाद यांनी तर पक्षाचा राजीनामा देऊन आपल्या पत्रात प्रामुख्याने राहुल गांधी यांच्या बेजबाबदार राजकारणाचे चांगलेच वाभाडे काढले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना “आम्ही यापूर्वीच या प्रकाराविषयी बोलायला हवे होते,” अशी जाहीर खंतही व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे मनीष तिवारी यांनीदेखील “आम्ही काँग्रेसमधील भाडेकरू नसून सदस्य आहोत,” अशा शब्दांत एकाधिकारशाहीस आव्हान दिले आहे.
 
 
 
  
मात्र, या नेत्यांच्या वक्तव्यांपेक्षाही अन्य एक ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी अधिक महत्त्वाच्या मुद्द्यास ऐरणीवर आणले आहे. तो मुद्दा म्हणजे, काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदारांचा. अर्थात, सध्या काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या संघटनात्मक निवडणुका म्हणजे निव्वळ लबाडी असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी आपल्या दीर्घ पत्रामध्ये नमूद केले आहेच. त्यानंतर शर्मा यांनी मतदारयादीचा मुद्दा उपस्थित करून गांधी कुटुंबास पुन्हा एकदा अडचणीत आणून आझाद यांच्या आरोपास दुजोरा देण्याचेच काम केले आहे. हा मतदारयादीचा घोटाळा नेमका काय आहे, हे समजून घेण्यासाठी काँग्रेसमध्ये अध्यक्षाची निवडणूक नेमकी कशी होते, हे प्रथम समजून घेणे महत्त्वाचे आहे.
 
 
 
काँग्रेस पक्षात ‘ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’ (एआयसीसी), ‘काँग्रेस वर्किंग’ (सीडब्ल्यूसी), ‘प्रदेश काँग्रेस कमिटी’ (पीसीसी), ‘डिस्ट्रीक्ट/सिटी काँग्रेस कमिटी’ आणि ‘ब्लॉक कमिटी’ या महत्त्वाच्या संस्था मानल्या जातात. यातील सर्वात खालच्या पातळीवर ‘ब्लॉक कमिटी’ आहे. याच्यावर जिल्हा स्तरावरील जिल्हा काँग्रेस समित्या आहेत. त्याच्या वर प्रदेश ‘काँग्रेस कमिटी’ (पीसीसी) आहे, ही राज्यस्तरीय संघटना आहे. काँग्रेस घटनेच्या ‘कलम ११’ नुसार, प्रत्येक ‘ब्लॉक काँग्रेस कमिटी’ गुप्त मतपत्रिकेद्वारे आपला प्रतिनिधी ‘पीसीसी’कडे पाठवते. असे सर्व प्रतिनिधी ‘पीसीसी’चे सदस्य आहेत. सध्या काँग्रेसच्या सर्व प्रदेश काँग्रेस समित्यांमध्ये म्हणजे ‘पीसीसी’मध्ये नऊ ते दहा हजार सदस्य आहेत.
 
 
 
काँग्रेसच्या घटनेच्या ‘कलम १३’नुसार, सर्व ‘पीसीसी’ सदस्य त्यांच्यापैकी १/८ सदस्यांना ‘एआयसीसी’साठी प्रस्तावित प्रतिनिधित्व प्रणालीच्या एकल हस्तांतरणीय मताद्वारे निवडतात. ‘एआयसीसी’ ही काँग्रेसची राष्ट्रीय संघटना आहे, तिचे सध्या सुमारे १५०० सदस्य आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे ‘एआयसीसी’चेही प्रमुख आहेत. ‘एआयसीसी’ आणि ‘पीसीसी’मधील काँग्रेस संघटनेचा एक विशेष भाग म्हणजे ‘सीडब्ल्यूसी’ म्हणजेच काँग्रेस कार्यकारिणी. यामध्ये २५ सदस्य असतात. काँग्रेस अध्यक्ष हे ‘सीडब्ल्यूसी’चे प्रमुखदेखील आहेत. याशिवाय, काँग्रेस संसदीय पक्षाचे प्रमुख हे ‘सीडब्ल्यूसी’चे दुसरे पदसिद्ध सदस्य आहेत. उर्वरित २३ जागांपैकी १२जागांवर ‘एआयसीसी’ सदस्य निवडून देतात आणि उर्वरित ११ जागांवर काँग्रेस अध्यक्ष नामनिर्देशित करतात.
 
  
 
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची भूमिका काँग्रेसच्या प्रदेश काँग्रेस समित्यांची असते. ‘पीसीसी’च्या सर्व सदस्यांना ‘प्रतिनिधी’ म्हणतात. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे प्रतिनिधी मतदान करतात. काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवार होण्यासाठी ‘पीसीसी’च्या दहा सदस्यांची शिफारस आवश्यक आहे. काँग्रेसच्या घटनेच्या ‘कलम १८’ नुसार, कोणतेही दहा प्रतिनिधी म्हणजे ‘पीसीसी’चे सदस्य कोणत्याही प्रतिनिधीला काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवार बनवू शकतात. काँग्रेस कार्यकारिणीद्वारे ‘सीडब्ल्यूसी’ अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना केली जाते. सध्या काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री त्याचे अध्यक्ष आहेत.
 
 
 
अध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास मतदान होते. यापूर्वी जेव्हाही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची वेळ आली, तेव्हा उमेदवारांची संख्या दोनच होती. अशा परिस्थितीत सर्व ‘पीसीसी’ सदस्य मतपत्रिकेवरील उमेदवारांना प्राधान्य देऊन प्रस्तावित प्रतिनिधित्व प्रणालीच्या एकल हस्तांतरणीय मतानुसार मतदान करतात. दोन उमेदवारांच्या बाबतीत, ज्याला पहिल्या पसंतीच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळतील, त्यास विजयी घोषित केले जाते. दोनपेक्षा जास्त उमेदवार असल्यास, विजयी कोटा त्यानुसार कमी होतो आणि ज्या उमेदवारास त्या कोट्याइतकीच मते मिळतील, तो निवडणूक जिंकतो.
 
 
 
काँग्रेस पक्षातील अंतर्गत निवडणुकीची ही प्रक्रिया कागदोपत्री तरी अतिशय आदर्श आणि पारदर्शक अशीच आहे. मात्र, प्रत्यक्षात हा सर्व प्रकार सध्या तरी काँग्रेस पक्षात केवळ दाखविण्यापुरताच उरल्याचे काँग्रेसच्याच नेत्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात रविवारी म्हणजे दि. २८ ऑगस्ट रोजी काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली आणि त्यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी निवडणुकीसाठीची मतदार यादी तयार करताना नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवला. मतदानासाठीची मतदार यादी तयार करताना त्यामध्ये अनेक घोळ झाले असून, त्यासाठी नेत्यांना विश्वासात न घेतल्याचाही आरोप शर्मा यांनी केला आहे. त्याचप्रमाणे शर्मा यांनी ही मतदार यादी सार्वजनिक करण्याचीही मागणी केली आहे. ही मागणी करणारे शर्मा एकटेच नसून त्यामध्ये मनीष तिवारी, शशी थरूर, कार्ति चिदंबरम यांचाही समावेश आहे.
 
 
 
या नेत्यांनी मतदार यादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावरही प्रकाशित करण्याची मागणी केला आहे. अर्थात, त्यांची ही मागणी मधुसूदन मिस्त्री आणि जयराम रमेश यांनी फेटाळून लावली आहे.निवडणुकीत मतदान करणार्‍या नऊ ते दहा हजार सदस्यांची मतदारयादी सर्व नेत्यांना उपलब्ध करून न देण्याचे कारण अगदी सरळ आहे. ते म्हणजे गांधी कुटुंबास किंवा त्यांच्या मर्जीतील उमेदवारास कोणी आव्हान देऊ नये. कारण, गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अन्य कोणी किंवा त्यांच्या जवळच्या उमेदवाराने निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केल्यास तांत्रिक कारणास्तव उमेदवारी नाकारली जाऊ शकते. त्यासाठी ज्या प्रस्तावकाने संबंधित उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव दिला असेल, त्याचे नावच मतदार यादीत नसल्याचे कारण दाखविले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याचा अर्थ असा की, दहा प्रस्तावकांपैकी कोणत्याही एकास ‘पीसीसी’च्या बाहेरचा ठरवून उमेदवारी नाकारली जाऊ शकते.
 
 
 
म्हणजेच काँग्रेस अध्यक्षपदासाठी लोकलाजेस्तव निवडणूक घेण्याची वेळ आली, तरीही त्यात गांधी कुटुंबाचाच विजय कसा होईल, यासाठी अतिशय चातुर्याने मेख मारून ठेवली आहे. त्यामुळेच आनंद शर्मा, शशी थरूर, मनीष तिवारी यांनी ऐरणीवर आणलेला मतदार यादी घोटाळा काँग्रेसच्या पुढील वाटचालीमध्ये अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, आझाद म्हणतात त्याप्रमाणे लबाडी करून संघटनात्मक निवडणूक होत असल्याने त्यानंतर काँग्रेसमधून अनेक ज्येष्ठ नेते ‘आझाद’ होण्याची शक्यता आहे. अशा अनेक ‘आझादां’नी तूर्त गुलाम नबींचे नेतृत्व स्वीकारल्यास उर्वरित काँग्रेस पक्षाची अवस्था आणखीनच केविलवाणी होऊ शकते, यात शंका नाही.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.