नृत्य गणेश

    30-Aug-2022   
Total Views |
 
ganpti
 
 


 
 
आज श्रीगणेश चतुर्थीनिमित्त भारतातील व भारताबाहेरील काही नृत्य गणेशांच्या मूर्ती, परंपरेचा आढावा घेणारा हा लेख...


शिवसुत गणेशाला वडिलांकडून मोठा वारसा मिळाला. तो वारसा आहे - विद्येचा आणि कलेचा. भारतीय विश्वात, शंकरापासून अनेक परंपरांची सुरुवात झाली आहे. महेश्वराच्या डमरूच्या नादातून अक्षरांची, वर्णमालेची निर्मिती झाली. शिवापासून सर्व विद्यांची निर्मिती झाली. नटराजापासून नाट्याची निर्मिती झाली. योगाची सुरुवात शिव-पार्वतीच्या संवादातून झाली. नृत्याची सुरुवात शिव-पार्वतीच्या तांडव व लास्य नृत्यातून झाली. कथा साहित्याची सुरुवात शिव-पार्वतीच्या संवादातून झाली. विविध प्रकारच्या पट-खेळांची (बोर्ड गेम) सुरुवातसुद्धा शिव-पार्वतीच्या खेळातून झाली! असा शिवशंकर गुरु आहे, आदी योगी आहे, आदी कथाकार आहे, आदी नाटककार आहे आणि आदी नर्तकसुद्धा आहे!





ganpti


 
 
ओडिशा येथील खजुराहोच्या मंदिरातील अष्टभुजा नृत्य गणेश. गणेशाच्या भोवती मृदंग आदी वाद्यांचे वादन करणारे गण आहेत. आकाशातून पुष्पवृष्टी करणारे गंधर्व आहेत. हातात नाग घेऊन नृत्यात मग्न झालेला हा गणेश...






श्रीगणेशाला शंकराकडून अनेक गोष्टी वारशाने मिळाल्या. जसे की, डोक्यावरील चंद्रकोर! ज्याच्या डोक्यावर चंद्राचे मुकुट आहे, अशा चंद्रशेखर शिवाचा तो भालचंद्र नामक पुत्र आहे! ज्याच्या गळ्यात नागांची आभूषणे आहेत, अशा शिवाचा तो नागाचे यज्ञोपवीत धारण करणारा पुत्र आहे. १४ विद्या आणि ६४ कलांचे देवत्वसुद्धा गणरायाला शंभो शंकराकडून मिळाले. गणपती विद्येची देवता असल्याने, मोठ्या ग्रंथांची सुरुवात गणेश वंदनेने होते. गणपती नाट्याची देवता असल्याने प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाची सुरुवातसुद्धा गणेशाला वंदन करून होते.

 

ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिकेत सुरुवातीला केलेल्या गणेश वंदनात म्हंटले आहे-
देखा काव्यनाटका।
जे निर्धारिता सकौतुका।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका ।
अर्थध्वनी ॥ १.७ ॥




ganpti






गणपतीची नृत्य प्रतिमा भारताच्या बाहेरसुद्धा पाहायला मिळते. इंडोनेशिया, बालीसह थायलंडमध्ये सुद्धा अनेक सुंदर नृत्य गणेशाच्या मूर्ती पाहायला मिळतात. थायलंडच्या शियांग मे येथील हा सोनेरी नृत्य गणेश. विशाल अशा या कमलावर नृत्य करणारा गणेश आल्या विघ्नाचे हरण करो!






साहित्यातील समस्त काव्य आणि नाटक, हे जणू काही गणेशाच्या पायातील नुपुरांच्या क्षुद्र, बारीक, नाजूक घंटिका! गणपती जेव्हा नर्तन करतो तेव्हा त्याच्या पदलालित्यातून उमटणारे मधुर झंकार म्हणजे कालिदासादी कवींच्या लेखणीतून उतरलेली काव्य आणि नाटके आहेत. गणेशाच्या पायातील लहान लहान घुंगरुंमधून येणारा रुणझुण आवाज हाच त्या काव्यातील अर्थाचा ध्वनी आहे!





ganpti


खजुराहो येथील अजून एक नृत्य गणेशाची ही सर्वांग सुंदर मूर्ती... नृत्यातील सावकाश मंद लईतील ही हालचाल शिल्पकाराने कॅमेरामध्ये नाही, तर दगडात बद्ध केली आहे. आजूबाजूला नृत्य, गायन व वादन करत असणारे गण दिसत आहेत.





श्रीरामदास स्वामींनी श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या सुरुवातीला नृत्यगणेशाला वंदन केले आहे. पहिल्या दशकाच्या दुसर्‍या समासात ते म्हणतात-
 
सगुण रूपाची टेव। माहा लावण्य लाघव। नृत्य करितां सकळ देव। तटस्त होती ॥ ८॥
लवथवित मलपे दोंद। वेष्टित कट्ट नागबंद।
क्षुद्र घंटिका मंद मंद। वाजती झणत्कारें ॥ १६॥
नट नाट्य कळा कुंसरी। नाना छंदें नृत्य करी।
टाळ मृदांग भरोवरी। उपांग हुंकारे ॥ २१॥
स्थिरता नाहीं येक क्षण। चपळविशईं अग्रगण ।
साअजिरी मूर्ति सुलक्षण। लावण्यखाणी ॥ २२॥
रुणझुणा वाजती नेपुरें। वांकी बोभाटती गजरें ।
घागरियासहित मनोहरें। पाउलें दोनी ॥ २३॥

 

ganpti  

 

ही गणेशाची मूर्ती आहे लक्ष्मी-नरसिंह मंदिरातील. १३व्या शतकातील होयसळ राजा सोमेश्वर याने मंदिर बांधले होते. अतिशय सुंदर अशी येथील नृत्य गणेशाची मूर्ती बारीक कोरीवकामाने सजली आहे. पायाशी दोन वादक असून, गणेशाचे वाहन असलेला मूषक पण पायाशी आहे. अष्टभुजा गणेशाच्या हातात-परशु, कमळ, शंख, गदा, सुळा व लाडू दिसत आहेत.







लावण्याची जणू काही खाण असलेला गणेश, जेव्हा नृत्य करावयास लागतो, तेव्हा देवांची सभा स्तिमित होते. गणेशाच्या नृत्याने देवसभेला शोभा येते. स्थूल प्रकृतीचा असूनसुद्धा, गणपती अतिशय चपळाईने नृत्य करतो. नाट्य आणि नृत्यात निपुण असलेला गणपती टाळ-मृदुंगाच्या नादावर हुंकार करत नृत्य करतो. क्षणभरही स्थिर न राहता, अखंड, चपळपणे गणेशाची साजिरी, सुलक्षणी मूर्ती आपल्या नृत्याने सर्वांचे मन हरण करते. असा श्रीगणेश भक्ताला बुद्धी, शक्ती आणि कला-कौशल्य प्रदान करतो.


 
ganpti

 
 

मध्य प्रदेशमधील ही ११व्या शतकातील नृत्य गणेशाची मूर्ती. आता न्यूयॉर्क येथील ‘एमईटी संग्रहालया’मध्ये आहे. तुंदिल तनु, आखूड पाय असलेल्या दशभुजा गणेशाच्या गळ्यात सर्प यज्ञोपवीत आहे. उजव्या हाताची नृत्यमुद्रा असून, मागच्या दोन हातात सर्प धरला आहे.






गणपती नृत्याची देवता असल्याने, गणेशाच्या नृत्य करणार्‍या मूर्तीची निर्मिती केली गेली. गणपतीच्या नृत्य करणार्‍या मूर्तींना ‘नृत्य गणेश’ म्हणतात. शेषाच्या फण्यावर उभे राहून नृत्य करणार्‍या गणेशाला ‘शेषवाहन नृत्य गणेश’ तर मूषकाच्या मस्तकावर नृत्य करणार्‍या गणेशाला ‘मूषकवाहन नृत्य गणेश’ म्हटले जाते. अतिशय सुबक, मनमोहक अशा नृत्यगणेशाच्या मूर्ती प्राचीन काळापासून केल्या गेल्या. आखूड पाय, मोठे पोट, गजमस्तक, मोठे कान, बारीक दृष्टी, पायात घागर्‍या, चपळ हालचालींनी उडणारे उत्तरीय, हातांच्या विविध नृत्य, मुद्रा, कधी नटराजप्रमाणे तांडव तर कधी संथ लईतील मुद्रा... अशा गणेशाच्या मनोहारी मूर्ती मन वेधून घेतात.



 
ganpti




केवळ आग्नेय आशियामध्येच नाही, तर युरोपमध्येसुद्धा नृत्य गणेशाच्या सुरेख मूर्ती आहेत. आयर्लंड येथील ‘व्हिक्टर्स वे इंडियन स्कलपचर पार्क’मध्ये अनेक देवीदेवतांची शिल्प पाहायला मिळतात. इथे गणपतीची अनेक शिल्प असून, प्रत्येक मूर्ती गायन-वादन-नृत्य करण्यात दंग झालेली आहे. या सर्व रेखीव मूर्ती २० एकरवर पसरलेल्या पार्कमध्ये स्थापित केल्या आहेत. गणेशाचे नृत्य म्हणजे नवनिर्मिती! एखाद्या महाकाव्याचे लिखाण हे जणू गणेशाच्या नृत्याचा अविष्कार आहे! एखाद्या सुंदर नाटकाचा प्रयोग हे गणेशाचे नृत्य आहे. एखाद्या सुंदर चित्राची कुंचल्यातून होणारी निर्मिती हे गणेशाचे नृत्य आहे. एखादा छान रंगलेला गायनाचा कार्यक्रम हे गजाननाचे नृत्य आहे. सुरेख असे निर्माण केलेले शिल्प म्हणजेच गणरायाचे नृत्य आहे. संपूर्ण जगताचा अखंड चालेला खेळ हेच गणेशाचे नृत्य आहे!
















आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.