विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील नेतृत्व

Total Views |
 
book
 
 
 
नुकतचं किसिंजर यांचं ‘लीडरशीप’ हे पुस्तक बाजारात आलं आहे. किसिंजर यांनी उत्तम नेतृत्त्वगुणांचं वर्णन करून सांगण्यासाठी वाचकांसमोर सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत. किसिंजरनी आपल्या समोर चार्ल्स डि गॉल, कॉनराड अ‍ॅडनॉर, ली क्वान यी, रिचर्ड निक्सन अन्वर सादात आणि मार्गारेट थॅचर अशा सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत.
 
 
डॉ. हेन्री किसिंजर यांचा जन्म 1923 सालचा. म्हणजे आज ते 99 वर्षांचे आहेत. आजच्या घटकेला ते अमेरिकेतले सर्वांत वयोवृद्ध राजकारणी आहेत. या वयातदेखील ते चांगलेच सक्रिय आहेत. पक्षीय राजकारणात नव्हे, जागतिक राजनीतीच्या अभ्यासात राजकीय सल्ला देणारी त्यांची व्यावसायिक कंपनी आहे. अमेरिकेसह अनेक देशांमधले राजकीय नेते त्यांचा सल्ला घेत असतात. कधी उघडपणे, पण बरेचदा गुप्तपणे.
 
 
किसिंजर मूळचे जर्मन ज्यू. 1933 साली जर्मनीत हिटलरचा नाझी पक्ष सत्तारूढ झाला. त्याचं ज्यूद्वेषांच धोरण स्पष्ट होऊ लागल्यावर अनेक ज्यू कुटुंबांनी जर्मनीतून अमेरिकेत स्थलांतर केलं. 1938 साली हेन्रीचा बाप लुई किसिंजर याने जर्मनीतल्या नव्हे, बव्हेरियातून प्रथम लंडनला मग न्यूयॉर्कला स्थलांतर केलं. आणखी पाच वर्षांनी म्हणजे 1943 साली हेन्रीने अमेरिकन सैन्यदलात एक साधा शिपाई म्हणून प्रवेश केला, तेव्हा तो फक्त 20 वर्षांचा पोर्‍या होता.
 
 
त्याची पलटण युरोपात पाठवण्यात आली आणि हेन्रीने एका अत्यंत गाजलेल्या लढाईचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आधुनिक युद्धेइतिहासात ती लढाई ‘बॅटल ऑफ बल्ज’ म्हणून प्रसिद्ध आहे. फ्रान्सची भूमी मुक्त करून पश्चिमेकडून जर्मनीत घुसू पाहणार्‍या अँग्लो-अमेरिकन सैन्याला थोपवण्याचा जर्मनीचा शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणजे ‘बॅटल ऑफ बल्ज.’ ही अत्यंत हिंस्र लढाई जिंकून अँग्लो-अमेरिकन दोस्त सैन्य जर्मनीत शिरलं. इथे वरिष्ठ सेनापतींना जर्मन भाषा बोलू शकणार्‍या माणसांची गरज निर्माण झाली आणि हेन्री किसिंजर वरिष्ठांचा एकदम लाडका बनला.
 
 
कारण, जर्मन भाषा तो अत्यंत सफाईदारपणे बोलू शकत होता. किसिंजर साध्या शिपायाचा सार्जंट तर बनलाच, पण यानंतर त्याचं काम प्रत्यक्ष रणांगणावर न राहता कार्यालयात आलं. जर्मन सैन्याचे किंवा घातपाती पथकांचे गुप्त वा उघड संदेश भाषांतरित करणं, पकडलेल्या जर्मन सैनिकांकडून वा गुप्त हस्तकांकडून माहिती काढून ती भाषांतरित करून वरिष्ठांना देणं, अशा खात्यात त्याची नेमणूक झाली. या खात्याला म्हणतात, ‘काउंटर’ इंटेलिजन्स डिपार्टमेंट’ किंवा ‘प्रतिगुप्तवार्ता खातं.’
 
 
हेन्री किसिंजरने आपल्या कारकिर्दीची सुरुवातच अशा रीतीने रणांगण आणि गुप्तवार्ता यांच्या प्रत्यक्ष अनुभवाने केली. महायुद्ध संपल्यावर अमेरिकेत परतलेल्या हेन्रीने सैनिकी सेवेला रामराम ठोकून ‘हार्वड’ या प्रख्यात विद्यापीठात प्रवेश केला. ‘राजनीतिशास्त्र’ या विषयात ‘बी.एल’, ‘एम.ए’ आणि ‘पीएच.डी’ मिळवणार्‍या हेन्रीची शैक्षणिक झेप भलतीच जोरदार होती. एकीकडे पदवी परीक्षा देत असतानाच दुसरीकडे तो ‘फेड’ किंवा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ उर्फ ‘एफबीआय’ या प्रख्यात गुप्तचर संस्थेचा हस्तक म्हणून काम करू लागला. व्हायकाऊंट कॅसलरे आणि क्लेमेन्स मॅटरनिख या प्रख्यात युरोपीय राजनीतीशास्त्रज्ञांच्या तत्वज्ञानाचा त्याने कसून अभ्यास केला.
 
 
अशा माणसाला अमेरिकन राजकारण्यांनी न उचलला तरच नवल. डॉ. हेन्री किसिंजर रिपब्लिकन पक्षाचे समर्थक बनले. विविध स्तरांवर उत्तम कामगिरी बजावत अखेर 1969 साली ते राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि 1974 साली अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री बनले. किसिंजर यांच्या राजकीय उत्कर्षाचा हा कळस होता.
 
 
या कळसावर किसिंजरनी काही ऐतिहासिक कामगिर्‍या पार पाडल्या. त्यांनी प्रथम निक्सन-ब्रेझनेव्ह आणि नंतर निक्सन माओ यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली. इजिप्त आणि इस्रायल यांच्यात समझोता घडवून आणला आणि व्हिएतनामच्या कुचंबलेल्या युद्धातून अमेरिकेला बाहेर काढलं.
 
 
कळसानंतर घसरण सुरू झाली. राजकीय धोरणं आखताना आणि राबवताना किसिंजरनी जे निर्घृण मार्ग वापरले. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. 1977 साली त्यांना पायउतार व्हावं लागलं. परंतु, किसिंजर यांचं राजकीय ज्ञान आणि अनुभव इतका दांडगा होती की, राजकारणातलं त्यांचं स्थान संपुष्टात आलं म्हणून ते संपले नाहीत. त्यांनी ‘किसिंजर असोसिएट्स’ ही राजकीय सल्लामसलत पुरवणारी कंपनी काढली. एक अनुभवी, मुरब्बी, धूर्त राजनीतीशास्त्रज्ञ म्हणून किसिंजर जगभर प्रवास करीत असतात. भक्कम मानधन घेऊन भाषणं करीत असतात. उत्कृष्ट पुस्तक लिहीत असतात. आत्तापर्यंत त्यांची 17-18 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. जगभर ती उत्सुकतेने वाचली जात असतात. कुणाला वाटेल फुस्स! फक्त 17 -18च पुस्तकं? तर लक्षात घ्या की, त्या प्रणयरम्य कथा-कादंबर्‍या नव्हेत! आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा खरं म्हणजे राजनीतीशास्त्र या विषयावरची ती पुस्तकं आहेत.
 
 
नुकतचं किसिंजर यांचं ‘लीडरशीप’ हे पुस्तक बाजारात आलं आहे. किसिंजर यांनी उत्तम नेतृत्त्वगुणांचं वर्णन करून सांगण्यासाठी वाचकांसमोर सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत. त्यांनी अगोदरच असं म्हटलं आहे की,20व्या शतकाच्या उत्तरार्धातील नेतृत्त्वाची चर्चा आपण करणार आहोत. म्हणजेच दुसर्‍या महायुद्धानंतरच्या जगातील नेतृत्त्वाबद्दल ते मांडणी करीत आहेत. अर्थातच, लेनिन, चर्चिल, रूझवेल्ट, हिटलर हे गडी बाद झाले.
 
 

book 
 
 
 
किसिंजरनी आपल्या समोर चार्ल्स डि गॉल, कॉनराड अ‍ॅडनॉर, ली क्वान यी, रिचर्ड निक्सन अन्वर सादात आणि मार्गारेट थॅचर अशा सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत.
 
 
आता या यादीत स्टॅलिन का नाही? माओ, नासर, बेन, गुरियान, टिटो हो-चि-मिन्ह किंवा रोनाल्ड रीगन का नाहीत? दुसर्‍या महायुद्धोेत्तर जगात या सर्व नेत्यांनी आपापल्या देशासह एकूण जागतिक राजकारणावरही प्रभाव टाकला होता, तर या प्रश्नाला उत्तर कदाचित हेच की, किसिंजरना ते प्रभावी वाटत नाही किंवा किसिंजरना ते आवडत नाहीत. शेवटी लेखक त्याच्या वैयक्तिक आवडी-निवडीप्रमाणेच मतप्रदर्शन करणार. आपल्याकडचे अत्यंत बुद्धिमान समाजवादी विचारवंत इंदिरा गांधींच्या आणीबाणीबद्दल लिहिताना रा. स्व. संघाबद्दल चकार शब्द न लिहिता फक्त जयप्रकाश नारायणांबद्दल लिहितात, तसंच. असो.
 
  
तर किसिंजर त्यांना आवडणार्‍या या सहा नेत्यांच्या नेतृत्वगुणांबद्दल लिहिताना अतिशय खुसखुशीत, चुरचुरीत, प्रवाही शैलीमध्ये विषय मांडतात. चार्ल्स डि गॉल (मूळ फे्रंच उच्चार शार्ल्स डि गोल) या फे्रंच नेत्याने फ्रान्ससाठी खरोखरच महान कार्य केलं आहे. हिटलरच्या झंजावातासमोर फ्रान्सच्या सैनिकी आणि राजकीय नेतृत्वाने अल्पावधीत लोळण घेतली. गॉलने लंडनला ‘परागंदा फे्रंच सरकार’ स्थापन करून फ्रेंच अस्मिता जीवंत ठेवली. 1945 साली दोस्त सैन्याने जर्मनीचा पराभव करून फ्रान्स मुक्त केल्यावर तिथे सरकार स्थापन करण्यासाठी कम्युुनिस्ट टपले होते.
 
 
सोव्हिएत रशियाचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. गॉलने हर किमतीने मुक्त फ्रान्सचा राज्यशकट स्वत:च्या हाती घेतला आणि पराभूत फ्रान्सला पुन्हा मानाचं स्थान मिळवून दिलं.
 
 
जवळजवळ हेच काम कॉनराड अ‍ॅडनॉरने जर्मनीत केलं. सोव्हिएत रशियाने अर्धा जर्मनी खाऊन तिथे कम्युनिस्ट बाहुलं सरकार स्थापन केलंच. उर्वरित पश्चिम जर्मनी या देशाला पराभवाच्या भीषण खाईतून सरकार बाहेर काढणं अमेरिका आणि फ्रान्स या अगोदरच्या शत्रू पण आता साहाय्यकर्त्या देशांच्या मदतीने जर्मनीत स्थिर असं लोकशाही सरकार स्थापन करणं, अशी बिकट कार्य अ‍ॅडनॉरने हिमतीने पार पाडली.
 
 
ली क्वान यी उर्फ हॅरी ली या नेत्याने सिंगापूर या एक शहरीय देशाला आज जगभरातलं एक प्रभावी एक आर्थिक केंद्र बनवलं आहे. सिंगापूर हे ब्रिटिश साम्राज्याचं पूर्वेकडचं नाक होतं. दुसर्‍या महायुद्धात जपानने ते हिसकावलं. जपानच्या पराभवानंतर ली क्वान यीच्या पुढाकारने मलाया, सिंगापूर इत्यादी प्रदेशांचा मलेशिया हा नवाच देश निर्माण झाला. पण, दोन वर्षांत ली क्वान यी मलेशियामधून बाहेर पडला. त्याच्या समर्थ नेतृत्वाखाली सिंगापूर हे स्वतंत्र राष्ट्र मान उंचावून उभं राहिलं आहे.
 
 
रिचर्ड निक्सन यांच्या नेतृत्वाबद्दल लिहिताना किसिंजर यांच्या लेखणीला अगदी बहर आला आहे. कारण, निक्सन यांचं राजकीय धोरण म्हणेज एक प्रकारे किसिंजर याचं स्वतःचं धोरणं आहे. मात्र, निक्सन यांनी म्हणजेच, आपल्या सरकारने बांगलादेशात किमान एक कोटी निरपराध नागरिकांची कत्तल करणार्‍या पाकिस्तानच्या जनरल याह्याखान यांना पाठिंबा का दिला, याबद्दल किसिंजर काहीही लिहीत नाहीत.
 
 
अन्वर सादात यांच्याबद्दलही किसिंजर जिव्हाळ्याने लिहितात. कारण, इजिप्तचे अन्वर सादात आणि इस्रायलचे मेनाशिम बेगिन यांच्यात समझोता होऊन, अरब-इस्रायल संघर्षातून इजिप्त या मुख्य भिडूने बाहेर पडणं ही फार मोठी घटना होती. ती घडवून आणण्यामागे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणून किसिंजर यांची मोठी भूमिका होती. या कामासाठी किसिंजर यांनी अनेकदा सादात यांची भेट घेतली. त्यामुळे दोघांची खूप दोेस्ती झाली.
 
 
मार्गारेट थॅचर यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदर वाटत असे आणि वाटतो. आपल्या राजकीय गुरूंचा पराभव करून आपल्या पक्षाचं नेतृत्व मिळवणं, मग विरोधी पक्षनेता म्हणून आणि अखेर पंतप्रधान पद मिळवताना मॅगीने जी चमक दाखविली, ती लक्षणीय होती आणि पंतप्रधान पद मिळविल्यानंतर तर ती ज्या तडफदारपणे समस्यांना भिडली, ते सगळंच फार कौतुक करण्यासारखं होतं. महायुद्धानंतर महासत्ता पदावरून एकदम ‘थर्ड क्लास कंट्री’ या दर्जाला पोहोचलेल्या ब्रिटनला मॅगीने बरचं वर खेचलं, यात शंकाच नाही.
 
 
आपल्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे, या नेत्यांच्या यशाची किसिंजर यांनी केलेली चिकित्सा. या प्रत्येक नेत्याने त्याच्यासमोरच्या आव्हांनाना तोंड देताना जी दानत, जी बुद्धिमत्ता आणि जो दृढपणा दाखवला, तो त्यांना कुठून मिळाला आणि आज नव्या आव्हानांना असे निश्चयपूर्वक भिडणारे नेते का आढळत नाहीत? किसिंजर म्हणतात त्याचा आशय असा की, हे नेते ज्या समाजातून मोठे झाले, घडले, त्या समाजाने किंवा कदाचित धर्माने काही एक नैतिक मूल्य दिलं, संस्कार दिले.
 
 
त्या संस्कारांमधून त्यांना हे बळ मिळालं. किसिंजर म्हणतात, “आजच्या प्रगत विज्ञानाने कुटुंब आणि समाज अधिकाधिक विभक्त, एकाकी, स्वंयकेंद्रित बनवून टाकला आहे. त्याला कसलीच मूल्यं नाहीत. असा समाज, अशा व्यक्ती स्वतःवरचाच विश्वास गमावून बसतात. जो समाज, जी व्यक्ती आत्मसन्मान गमावते ती सर्व काही गमावून बसते.”
 
 
मेकॉले शिक्षणपद्धतीने भारतीयांनी स्वतः स्वतःला दूषणं देत राहून आत्मसन्मान विहीन करून सोडलं. भारताचं नव नेतृत्व स्वतःच ‘आम्ही हिंदू नसून हिंदी आहोत’ असं म्हणू लागलं. ही अस्मिता जागृत करण्याचंच काम गेली 95 वर्ष चालू आहे. पण, हा विषय किसिंजर यांच्या आकलनाबाहेरचा आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.