आता माघार नाही!

    26-Aug-2022   
Total Views |
 
eknath shinde
 
 
 
विधिमंडळ अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये झालेल्या फ्री-स्टाईल हाणामारीची दृश्ये अवघ्या महाराष्ट्राने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली. ‘सत्ताधारी विरुद्ध विरोधक’ या तात्विक संघर्षाची परिणीती अशी हिंसात्मक पातळीवर पोहोचेल, अशी अपेक्षा महाराष्ट्राला नव्हती. पण, असो. अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी शिंदे गटातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंचे व्यंगचित्राचे बॅनर विधानभवनाच्या पायर्‍यांवर झळकाविले गेले आणि त्यातून शिंदे गटाचा नवा आक्रमक चेहरा लख्खपणे समोर आला.
 
 
एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर सातत्याने शिंदे गटाने ‘आम्ही ‘मातोश्री’ आणि ठाकरेंवर टीका करणार नाही व करूही देणार नाही,’ असा काहीसा पवित्रा घेतला होता. पण, मागील काही दिवसांमध्ये ठाकरे गटातील सदस्यांकडून बंडखोरांवर केला जाणारा गद्दारीचा आरोप आणि 50 खोक्यांचा पुनरुच्चार यामुळे शिंदे गटाने आता थेट आदित्य ठाकरे आणि ‘मातोश्री’लाच टार्गेट करायला सुरुवात केली आहे.
 
 
“शिंदे गटातील आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे त्यांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे,” या आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला शिंदे गटानेदेखील प्रतिआव्हान दिले आहे. “आम्ही राजीनामे देतो तसा तुम्हीही वरळीच्या आमदारकीचा राजीनामा द्या, मग बघू,” असे प्रतिआव्हान देतानाच शिंदे गट कुठल्याही प्रकारे माघार घेण्याच्या मानसिकतेत नाही, हेच स्पष्ट होते. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याला मिळणारा प्रतिसाद आणि आदित्य ठाकरेंच्या ‘शिवसंवाद’ यात्रेला झालेली गर्दी यामुळे संसदीय पातळीवर सुरू असलेली ही लढाई आता रस्त्यावर शिवसेनेच्या आक्रमक पद्धतीने लढली जाणार, हे निश्चित.
 
 
शिंदेंच्या बंडानंतर सुरुवातीच्या काळात हे बंड म्हणजे ठाकरेंनी खेळलेली चाल आहे, अशा कपोलकल्पित कथा चायबिस्कुट पत्रकारांनी रचल्या होत्या. पण, आदित्य ठाकरेंवर शिंदे गटाकडून होणार्‍या थेट हल्ल्यांमुळे आता शिंदे आणि ठाकरे गटातील युद्धविरामाची चिन्हे दिसत नसून, ‘आता माघार नाही’ हे शिंदे गटाने स्पष्ट करून पुढील वाटचालीचे सूतोवाचच या अधिवेशनाच्या निमित्ताने केले आहे.
 
 
मुंबईचा रणसंग्राम...
 
 
 
मुंबई महापालिकेची स्टॅण्डिंग कमिटी म्हणजे ‘अंडरस्टॅण्डिंग’ कमिटी आहे, त्यात होणारे व्यवहार आणि दिली जाणारी कंत्राटे बिल्डरलॉबी आणि महापालिकेतील अधिकारी व सत्ताधार्‍यांच्या अर्थपूर्ण स्नेहबंधातून निर्माण झालेल्या परस्पर सहमतीने दिली जातात,” असे एक वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केले होते. वास्तविक मागील काही वर्षांमध्ये आणि विशेषत्वाने काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेवर होणार्‍या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे विलासरावांचे ते विधान मुंबई महापालिकेतील कारभार आणि मुंबई महापालिकेचे महत्त्व अधोरेखित करणारेच.
 
 
राज्यातील विद्यमान सत्ताधारी भाजपने मागील पाच वर्षांपासून राज्यात जम बसविल्यानंतर मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनातदेखील दिसून आला. अधिवेशनातील बराचसा कालावधी हा मुंबई महानगरपालिका आणि मुंबईच्या प्रश्नांवरील चर्चेसाठी राखीव होता आणि त्यातूनच भाजप आणि विद्यमान सरकारसाठी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक किती महत्त्वाची आहे, हे पुनश्च स्पष्ट झाले.
 
 
शिंदे गटाने देखील आता त्यांचा मोर्चा मुंबई महापालिकेकडे वळला आहे. शिवसेनेच्या मुंबईतील एकमेव माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यापासून मुंबईतील सेनेच्या माजी नगरसेवकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांची ‘कॅग’ अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी, महापालिका अधिकारी आणि कंत्राटदार लॉबीचे धाबे दणाणले असून सत्तेच्या आड लपून मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी करणारी मंडळी आता गजाआड जाण्याचे सूतोवाच देखील काही मंडळींनी केले आहे.
 
 
शिंदे गट असो भाजप असो वा शिवसेनेतील ठाकरे गट, आता प्रत्येकाचेच लक्ष मुंबई महापालिकेवर आहे आणि प्रत्येकाची रणनीती त्याच अनुषंगाने आखली जाणार आहे, हे निर्विवाद. त्यामुळे प्रत्येकाचे टार्गेट मुंबई महापालिका असून त्यासाठी मुंबईत मोठा राजकीय संघर्ष पेटणारे हे अटळ असले तरी या संघर्षात मुंबईकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये, हीच माफक अपेक्षा!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.