तामिळनाडूत तिरंग्यावर ‘तमाशा’

    18-Aug-2022
Total Views |
insult national flage
 
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील काही भागांमध्ये मात्र तिरंग्याचा अपमान केल्याच्या घटना समोर आल्या. त्यात तामिळनाडूत घडलेल्या एका प्रकाराने तर सर्वत्र संतापाची लाट उसळली. प्राप्त माहितीनुसार, तामिळनाडूमधील धर्मपुरी जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने तिरंग्याला सलामी देण्यास चक्क नकार दिला. ख्रिश्चन मुख्याध्यापिकेच्या या कृतीमुळे तिच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली.
 
 
तिरंग्याला सलामी देण्याचे कारणही धक्कादायक आहे. “माझा धर्म मला तिरंग्याला सलामी करण्यास परवानगी देत नाही. माझ्या ‘गॉड’व्यतिरिक्त कुणालाही सलाम करण्यास आमच्या धर्मात मनाई आहे,” असे कारण या महिलेने पुढे केले आहे. यानंतर झालेल्या वादानंतर अखेर प्रधान अध्यापकाला ध्वजारोहणाची जबाबदारी पार पाडली. धक्कादायक बाब म्हणजे, मागील वर्षीही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या तमिलसेल्वी नामक मुख्याध्यापिकेने तिरंगा फडकविण्यास विरोध केला होता.
 
 
सदर महिला मुख्याध्यापिका याच वर्षी सेवानिवृत्त होत आहे. या सर्व प्रकाराची धर्मपुरीच्या मुख्य शिक्षण अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली. मुख्याध्यापक बाई इथेच थांबल्या नाहीत, तर त्यांनी आपल्या कृतीचे समर्थन करताना मुक्ताफळांची उधळण करत “तिरंग्याचा अपमान करण्याचा माझा उद्देश नाही. तसेच, आम्ही केवळ ‘गॉड’ला सलाम करतो, अन्य कुणाला नाही.” म्हणून मी प्रधान अध्यापकाला तिरंगा फडकविण्यास सांगितले, असे स्पष्टीकरण दिले.”
 
 
हा सगळा प्रकार जितका धक्कादायक आहे तितकाच हिंदूंना विचार करायला लावणारा आहे. राष्ट्रासाठी आणि राष्ट्रपथम हे ध्येय समोर ठेवून अनेकांनी भारतभूसाठी प्राणांची आहुती दिली. हा तिरंगा आणि त्याची शान कायम ठेवण्यासाठी असंख्य देशभक्तांनी मरणाची चिंता न करता मृत्यूला कवटाळलं. केवळ हिंदूच नव्हे, तर सर्व धर्मीयांनी एकदिलाने लढा उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.
 
 
परंतु, तामिळनाडूतील हा प्रकार म्हणजे, त्या असंख्य वीरांचा अपमान! काही ख्रिश्चन मिशनरींकडून केल्या जाणार्‍या धर्मांतरणाच्या प्रयत्नाचा मुद्दाही पुन्हा एकदा यानिमित्ताने चर्चेच आला. गरिबीचा फायदा उचलून असंख्य हिंदूंचे धर्मांतरणाचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे हिंदूंनी सावध होऊन एक होणे आवश्यक आहे. तसेच, अशा देशविरोधी पिलावळी शोधून त्यांना कायदेशीर मार्गाने योग्य तो धडा शिकवलाच पाहिजे.
 
गहलोत जमिनीवर या...
काँग्रेस पक्षामधील वाढत्या महत्त्वामुळे हवेत असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत अजूनही जमिनीवर यायला तयार नाहीत. राजस्थानमध्ये हिंदूंवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून आता वारंवार घडणार्‍या हत्येच्या घटनांनी राजस्थान पुरते हादरले आहे. नुकतीच हनुमानगढ जिल्ह्यातील एका साधूची गळा चिरून निघृण हत्या करण्यात आली असून, सदर घटनेने राजस्थान पुन्हा एकदा हादरले आहे.
 
 
 
चेतनदास असे या साधूचे नाव असून त्यांच्या आश्रमाबाहेर त्यांचा मृतदेह आढळून आला. नेहमीप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. परंतु, हिंदूंच्या हत्या आणि त्यांच्यावर सातत्याने होणारे अत्याचार कधी थांबतील याचे उत्तर मात्र सध्याच्या घडीला गहलोत सरकारकडे उपलब्ध नाही. दरम्यान, साधूंच्या होणार्‍या हत्या राजस्थानसाठी काही नवीन नाही. अगदी 15 दिवसांपूर्वीच 20 वर्षांपासून मंदिरात राहणार्‍या अंध साधूचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता.
 
 
 
त्यानंतर जालोर येथील रानीवाडातील एका साधूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. काही महिन्यांपूर्वीच अतिक्रमणाच्या नावाखाली हिंदू मंदिरे तोडण्याचं पापदेखील राजस्थानच्या गहलोत सरकारने केले होते. तेव्हा मोठा वादंग निर्माण झाला होता. प्राप्त माहितीनुसार, भाखरावाली गावात गेल्या २५ वर्षांपासून साधू चेतनदास आपल्या कुटीमध्ये राहत होते. मूळ पंजाबमधील असलेल्या या साधूंची गावातील लोकच जेवणाची व्यवस्था करत होते.
 
 
 
काही दिवसांपूर्वीच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. राजस्थानात काँग्रेस शासन आल्यानंतर एकाएकी हिंदूंना ‘टार्गेट’ केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. देशभरात काँग्रेसचा सुपडा साफ होत असताना सुधारेल ती काँग्रेस कसली. हिंदूंना सरळ सरळ ‘टार्गेट’ केले जात असतानाही ठोस पावले उचलली जात नाही. उलटपक्षी त्याला काँग्रेसचच छुपं समर्थन आहे की, काय असा प्रश्न निर्माण होतो. दिल्लीत अवैध अतिक्रमणांवर बुलडोझर चालविण्यात आल्यानंतर इकडे राजस्थानाच मंदिरे पाडण्यांचं सत्र सुरू झालं.
 
 
 
त्यानंतर राजस्थानमील हिंदूंनी त्याचा तीव्र विरोध केला होता. सात दिवसांपूर्वीच राजस्थानची राजधानी जयपूरमधील रायसरमध्ये एका महिला शिक्षिकेला काही बदमाशांनी पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याची घटनेनेही खळबळ उडाली होती. एकूणच गहलोतांचा पोलीस प्रशासनावर कुठलाही वचक राहिलेला नाही, हे या वारंवार घडणार्‍या हत्यांनी सिद्ध होत आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.