पुढच्या २५ वर्षांनंतरचा भारत...

    13-Aug-2022   
Total Views |

75
 
 


या पंचाहत्तरीनंतर स्वतंत्र भारत शंभराव्या वर्षात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेत प्रवेश करू लागेल. ही प्रक्रिया नव्या संधी आणणारी असेल, तशीच ती नवी आव्हानेही घेऊन येईल. राष्ट्राची निर्मिती ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इतके सारे अंत:प्रवाह घेऊनच हा देश आतापर्यंतची वाटचाल करीत आला आहे आणि यापुढेही जाईल.
 
 
आपण आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करीत आहोत. ७५ हा आकडा काही लहान नाही. भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी जागतिक स्तरावर दिग्गज म्हणून ओळखल्या जाणार्‍या, राष्ट्रप्रमुख म्हणून नाव कमावलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीला ब्रिटिशांनी हा देश सोडल्यानंतर तो अक्षुण्ण राहिला व महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करेल, असे वाटत नव्हते. किंबहुना, त्यांची राज्यांप्रमाणे शकले पडतील, असेच अंदाज व्यक्त केले जात होते. तशी त्यांची विधानेही प्रसिद्ध आहेत. मात्र, कमालीच्या अंतर्विरोधांना, विविधतांना सोबत घेऊन या देशाचे स्वातंत्र्य ७५ वर्षांचे झाले.
 
 
ही पंचाहत्तरी केवळ संख्यात्मक नाही, तर गुणात्मकही आहे. निरनिराळ्या प्रांतातून येणार्‍या निरनिराळ्या अस्मिता आणि महत्त्वाचे म्हणजे, माणसे घेऊन हा देश इथपर्यंत आला आहे. या येण्यात एक आकांक्षादेखील आहे. गेल्या पाच वर्षांत ज्या प्रकारच्या व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रातील कामांसाठी ‘पद्म’ पुरस्काराने गौरवविण्यात आले, ते पाहिले की, आपल्या सहज लक्षात येते की, खरा भारत म्हणजे नेमके काय आहे. एखाद्या आकाशगंगेप्रमाणे अनेक ग्रह-तार्‍यांना सोबत घेऊन हा देश इथपर्यंत आला आहे. चर्चा खूप आहेत आणि विचारही! देशाला स्वातंत्र्य कुणामुळे मिळाले, जहालवाद्यांमुळे की मवाळवाद्यांमुळे? एका कुटुंबामुळे की हजारोंच्या त्याग व बलिदानामुळे? यातले काहीच चूक नाही आणि बरोबरही. कारण, तो काळच इतका भारावलेला होता की, प्रत्येक भारतीय देशासाठी काही करण्याच्या भावनेने पेटून उठला होता.
 
 
एका मोठ्या संघर्षानंतर हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले. मात्र, त्याच्याबाबतच्या योगदानाबाबत भांडवल करण्याचे प्रयत्न सुरू झाले की, मग समोरून उत्तरेसुद्धा तशीच यायला लागतात. मूळ मुद्दा आपण अक्षुण्ण कसे राहिलो हा आहे आणि त्याचे उत्तर शोधणे सोपे नाही. मात्र, ते तसे अवघडही नाही. तथाकथित ‘सेक्युलर’ चश्मे काढले की, या प्रश्नांचे उत्तर मिळायला सोपे जाते. विविधता हे या देशाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य. भारतात दोन अंतर्प्रवाह सातत्याने वाहत आहेत आणि ते परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत. एक प्रवाह आधुनिक भारताचा आहे, तर दुसरा प्रवाह प्राचीन भारताचा आहे.
 
 
आधुनिक भारत तंत्रसिद्ध आहे. आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करण्याच्या महत्त्वाकांक्षेकडे चालू लागलेला आहे. प्राचीन भारत सहोदराच्या संकल्पनेतून आपले अस्तित्व सिद्ध करणारा आहे. भाषा, उपासना पद्धती, आहारविहार, देवदेवता या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याकडे बहुविधता आहे. मात्र, यातून निर्माण झालेला एक आंतरभारतीचा धागा हा देश एकत्र बांधून ठेवतो. संतसाहित्य व त्यातून निर्माण झालेली सांस्कृतिक देवाणघेवाण, मठ-मंदिरादींनी हा देश बांधून ठेवला आहे. ‘उत्तरे यतसमृद्रस्य’ हे भारताचे वर्णन करण्याची प्रेरणा तिथूनच येते आणि फाळणीनंतरही अखंड राहिलेल्या या देशाचे गमक सांगून जाते.
 
कृषी, आरोग्य, जीवनावश्यक वस्तू, उपकरणे, आयुध सामग्री या आणि अशा कितीतरी घटकांच्या बाबतीत आपण आज पूर्णत: ते अंशत: स्वावलंबी झालो आहोत. ज्याबाबतीत स्वावलंबी नाही, त्याबाबतीत स्वावलंबी होण्याकडे आपली वाटचाल सुरू आहे किंवा जगाकडे आपण त्या गोष्टी आपल्या अटीशर्थींवर मागत आहोत. मग स्वातंत्र्याच्या शतकोत्तर वाटचालीकडे मार्गस्थ झालेल्या या देशासमोरची खरी आव्हाने काय, हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. तरुण हे जसे आपले आजचे बलस्थान आहे, तसेच ते आव्हानही आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेतून आपण सुशिक्षित पदवीधर निर्माण करीत आहोत, पण उद्योगांना लागणारे मनुष्यबळ म्हणून त्यांच्याकडे पाहण्याच्या उद्योगांचा दृष्टिकोन काय आहे, याचा विचार आपल्याला करावा लागेल.
 
 
 जी धोरणे आपण नव्याने आखू, त्यांचा विचार करीत असताना इथली माती आणि या मातीशी इमान राखणारी धोरणेच आपल्याला आखावी लागतील. नीतीनिर्धारणाच्या बाबतीत ‘युरोपियन मॉडेल’ तर आपल्याला मुळीच लागू होत नाहीत, हे आतापर्यंतचा आपला इतिहास सांगतो. सर्वदूर परिणाम पाहायला मिळतील, अशा आर्थिक धोरणांचा विचार व विस्तार करावा लागेल, ज्यामुळे शहरी व ग्रामीण भागातही विकासाची समान फळे सर्वच भारतीयांना चाखायला मिळतील.
 
 
नवे तंत्रज्ञान, नव्या मार्गांचा अवलंब व मनुष्यबळाच्या कौशल्यांत वाढ, हे घटक या प्रवासात महत्त्वाचे असतील. कृषी क्षेत्रातले सर्वात मोठे आव्हान हे कृषी उत्पादनावर प्रक्रिया व मूल्यसाखळीचा विकास याचे आहे. ते प्रभावीपणे करता आले व त्याची लहान लहान केंद्रे जनसहभागातून उभी राहिली, तर त्या केंद्राच्या कक्षेतील जनसंख्येला त्याचा लाभ नक्कीच होऊ शकतो. ‘जनसहभागातून विकास’ ही केवळ कागदावरची चळवळ नसून तामिळनाडू, ओडिशा यांसारख्या राज्यात ती चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण साधलेले विकासाचे टप्पे शाश्वत राहायचे असतील, तर पर्यावरणाचा विचारही तितक्याच गांभीर्याने करावा लागेल.
 
 
‘झाडे लावा, झाडे जगवा’ यापलीकडे जाऊन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या माध्यमातून निर्माण होणारे प्रदूषणासारखे प्रश्न आपल्याला कसे सोडविता येतील, याचा विचार करावा लागेल. या पंचाहत्तरीनंतर स्वतंत्र भारत शंभराव्या वर्षात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेत प्रवेश करू लागेल. ही प्रक्रिया नव्या संधी आणणारी असेल, तशीच ती नवी आव्हानेही घेऊन येईल. राष्ट्राची निर्मिती ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इतके सारे अंत:प्रवाह घेऊनच हा देश आतापर्यंतची वाटचाल करीत आला आहे आणि यापुढेही जाईल. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!
 
 

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.