हिंदूंचा ‘स्व’चा शोध

    13-Aug-2022   
Total Views |
shreeram
 
 
 
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत पदार्पण करीत असताना खर्याa अर्थाने स्वातंत्र्यातील ‘स्व’ म्हणजे कोण आणि त्यातील ‘तंत्र’ म्हणजे कोणते तंत्र, याचा शोध हिंदू समाज घेऊ लागला आहे. तो सर्व बाजूने घेऊ लागला आहे. कोणी तत्त्वज्ञानाच्या अंगाने, कुणी योगसाधनेच्या अंगाने, कोणी स्वदेशीच्या अंगाने, कोणी विकासाच्या अंगाने, तर कोणी शेवटच्या पंक्तीतील शेवटच्या माणसाचा विचार या अंगाने ‘स्व’चा विचार करू लागला आहे आणि तंत्राचा विकास करू लागला आहे.
 
देश 1947 साली स्वतंत्र होत असताना देशाची फाळणी होऊन मुसलमानांनी पाकिस्तान मिळविले. देशाची फाळणी होणार नाही, असे आश्वासन काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. “माझ्या देहाचे दोन तुकडे करा, नंतर देशाची फाळणी करा हे महात्मा गांधीजींचे वाक्य प्रसिद्ध आहे. ही सर्व आश्वासने हवेत विरून गेली. फाळणी झाली. त्यात सुमारे दहा लाख हिंदू मारले गेले. वंशपरंपरेने ते ज्या भूभागात राहात तेथून ते हकलले गेले, त्यांची घरे-दारे-शेती सर्व संपली.
 
 
हिंदू मनावर फाळणीचा जबरदस्त आघात झाला. फाळणी स्वीकारणारे हिंदू समाजाच्यादृष्टीने गुन्हेगार झाले. दुर्दैवाने याच काळात म्हणजे 1948 साली गांधीजींची हत्या एका हिंदूने केली. काँग्रेसी नेत्यांना गांधीजींची हत्या ही हिंदुत्ववादी चळवळ दडपून टाकण्याची नामी संधी वाटली. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, श्रीगुरुजी यांना अटक तर केलीच, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. गांधीजींच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
 
 
त्याला कवडीचाही पुरावा नव्हता. सर्व देशभर विषारी वातावरण बनविण्यात आले. याचा परिणाम हिंदुत्ववादी चळवळ अत्यंत क्षीण होण्यात झाला. 1948 ते 1970 हा कालखंड हिंदू समाज आणि हिंदू चळवळीच्यादृष्टीने अतिशय बिकट आणि भयाण कालखंड आहे.
 
 
या कालखंडात हिंदुत्व चळवळीचे अमृत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जपून ठेवण्याचा प्रयत्न देशातील लाखो संघ स्वयंसेवकांनी केला. राजसत्तेचा विरोध, समाजाची उपेक्षा, सांस्कृतिक चळवळीची अस्पृश्यता, साहित्यिक चळवळीचा दुजाभाव असे सर्व आघात या काळातील पिढीने सहन केले. जनमानसात आपल्या सेवेने आणि तपश्चर्येने, त्यागाने आणि बलिदानाने स्थान निर्माण केले.
 
 
आपल्या प्राचीन शास्त्रकारांनी सांगून ठेवले आहे की, धर्मग्लानी आली की, धर्म हा सुक्ष्मात जातो, अधर्माचे प्राबल्य वाढत जाते आणि अधर्म व अधर्मी लोकांची सत्ता समाजावर काळ्या मेघाप्रमाणे पसरते. पण, ती दीर्घकाळ राहात नाही. अधर्म, आपल्या अधर्मानेच उतरंडीला लागत असतो आणि त्याची उतरण सुरू झाली की, धर्माचे पुनरुत्थान सुरू होते.
 
 
भारतातही हेच घडले. आज आपण 2022 सालात जगत आहोत. आणि हा कालखंड हिंदू विचार, हिंदू जीवनमूल्ये, हिंदू जीवनपद्धती यांच्या पुनरुत्थानाचा कालखंड आहे. महाराष्ट्राचे शासन हिंदुत्व सोडले, या प्रश्नावरून कोसळले, हे आपण जाणतो. 50 वर्षांपूर्वी जर कोणी असे भाकित केले असते की, हिंदुत्वाच्या प्रश्नावरून शासन जाऊ शकते, तर त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. तेव्हा हिंदुत्व हा विषय कुंपणाबाहेरील विषय होता. सर्व हिंदू विरोधकांची, कम्युनिस्ट विचारसरणीची मंडळी आणि समाजवादी विचारसरणीची मंडळी यांचे हिंदुत्वाला गाडून टाकावे याबाबतीत एकमत होते, त्यांचे नेते होते पंडित जवाहरलाल नेहरू.
 
 
आज म्हणजे 2022 साली हिंदुत्वाचे एवढे जबरदस्त वातावरण कसे काय निर्माण झाले? त्याचा इतिहास आहे. अगदी काँग्रेसच्या पूर्णपणे हिंदूविरोधी राजसत्तेच्या काळातही, हिंदूविचारांवर आस्था असलेल्या काही काँग्रेसी नेत्यांनी हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाची बीजे रोवलेली आहेत. हे आपल्याला आश्चर्यकारक वाटेल. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिराच्या उद्घाटनाला ते गेले.
 
 
भारताचे दोनदा हंगामी पंतप्रधान झालेले गुलझारीलाल नंदा यांनी ‘अखिल भारतीय साधू समाजा’ची स्थापना केली. त्यांचे संघटन बांधण्याचा प्रयत्न केला. हा ‘अखिल भारतीय साधू समाज’ नंतर विश्व हिंदू परिषदेत सामील झाला. 1965 साली लालबहाद्दूर शास्त्री यांनी पाकिस्तानचा सडकून पराभव केला आणि 1971 साली इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले. पानिपतच्या तिसर्यान लढाईनंतर हिंदू समाजाने इस्लामी आक्रमणावर मिळविलेले हे दोन विजय हिंदू समाजाचे मनोधैर्य आणि अस्मिता जागृत करणारे ठरलेले आहे. डावे पुरोगामी या प्रकारे त्याचे विश्लेषण करीत नाहीत, हा त्यांचा बुद्धिदोष समजला पाहिजे. आजच्या हिंदू जागरणामध्ये पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांचादेखील वाटा आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही.
 
 
मुंबईतील पवईजवळील स्वामी चिन्मयानंद यांच्या सांदिपनी आश्रमात 1964 साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. हिंदू समाजातील वेगवेगळ्या पंथांचे प्रमुख या स्थापनेच्या वेळी सांदिपनी आश्रमात उपस्थित होते. आजच्या हिंदू जागृतीची ही ऐतिहासिक घटना आहे. हिंदू समाज जसा सामाजिकदृष्ट्या विभाजित होता, त्याप्रमाणे वेगवेगळ्या पंथांत विभागलेला होता. या सर्व पंथांना हिंदूहिताच्या समान भूमिकेवर आणण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचा जन्म झाला. जन्मानंतर लगेचच विश्व हिंदू परिषदेच्या अवतारकार्याला प्रारंभ झालेला नाही. त्यासाठी 1983 साल उजाडावे लागले.
 
 
हिंदू समाज जागरणाच्या इतिहासात तामिळनाडू येथील 1981चे मीनाक्षीपूरमचे धर्मांतर हा सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा आहे. मीनाक्षीपूरम हे एका खेड्याचे नाव आहे. तिरुनेलवेली जिल्ह्यातील हे एक गाव, जे तामिळनाडूत आहे. या गावातील सुमारे तीन हजार अस्पृश्य बांधवांनी सामूहिक धर्मांतर करून मुसलमान धर्म स्वीकारला. फाळणीनंतर हिंदू समाजाला बसलेला हा दुसरा प्रचंड आघात होता.
 
 
त्या आघाताची तीव्रता लक्षात येण्यासाठी तेव्हा त्या गावाला भेट देण्यासाठी अटलबिहारी वाजपेयीदेखील गेले होते, अनेक धर्माचारी गेले होते, हे लक्षात घ्यायला हवे. इंदिरा गांधीदेखील या धर्मांतराने अस्वस्थ झाल्या. यानंतर डॉ. करणसिंग यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विराट हिंदू संमेलन झाले. या संमेलनात सुमारे दोन लाख हिंदू सहभागी झाले होते. अशी विराट हिंदू संमेलने देशात अन्य ठिकाणीदेखील झाली. ती व्हावीत यासाठी इंदिरा गांधी यांनी पडद्यामागून भरीव मदत केली होती. डॉ. करणसिंग हे तसे काँग्रेसचे नेते आहेत आणि इंदिरा गांधींच्या अनुमतीशिवाय हे विराट हिंदू संमेलन घेऊ शकत नव्हते.
 
 
 
यानंतर विश्व हिंदू परिषदेचे अवतारकार्य सुरू होते. हे कार्य हिंदू समाजात हिंदू अस्मिता जागृत करण्याचे, ‘हिंदू सारा एक’ ही भावना निर्माण करण्याचे, अस्पृश्यतेचे पालन करणे हे पाप आहे, हा भाव निर्माण करण्याचे आणि जे परधर्मात गेले आहेत, त्यांना परत स्वगृही आणण्याचे होते. या कार्याला गती देण्यासाठी संघ प्रचारक अशोक सिंघल यांच्याकडे विहिंपचे दायित्व आले आणि संघाचे केंद्रीय अधिकारी मोरोपंत पिंगळे यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेचे पालक-संरक्षक म्हणून जबाबदारी आली.
 
 
त्यांच्या नेतृत्वाखाली 1983 साली पहिल्या एकात्मता यात्रेचे आयोजन करण्यात आले. या एकात्मता यात्रेने भारताच्या राष्ट्रवादाची जनसामान्यांत स्पष्टता निर्माण केली. भारतमातेची मूर्ती या यात्रेत होती, तिचे पूजन करण्यात आले. ‘आपण सर्व भारतमातेची संतान आहोत आणि एका मातेच्या संतानामध्ये उच-नीच भाव नसतो, स्पृश्य-अस्पृश्यता याला काही जागा नाही,’ हा संदेश खेडोपाडी गेला. तीन यात्रांचे मार्ग असे होते. पहिली यात्रा काडमांडू ते रामेश्वरम्, दुसरी यात्रा गंगासागर ते सोमनाथ मंदिर आणि तिसरी यात्रा हरिद्वार ते कन्याकुमारी. या तिन्ही यात्रा एकाच दिवशी नागपुरात प्रवेशकर्त्या झाल्या. या यात्रांचे तपशीलवार नियोजन मोरोपंत पिंगळे यांनी केले.
 
 
 
गंगाजलाच्या कुपी सर्व ठिकाणी वितरित करण्यात आल्या. भारतमाता आणि गंगामाता या सर्व समाजाच्या जोडणार्याय दोन संकल्पना आहेत, या श्रद्धांचे राष्ट्रीय भाव जागरण या यात्रांतून करण्यात आले. आजच्या हिंदू जागृतीची ही पायाभरणी आहे आणि त्याचे शिल्पकार आहेत, मोरोपंत पिंगळे. मोरोपंत कधीही प्रेसला मुलाखत द्यायला गेले नाहीत, त्यांनी कधीही कोणतेही पत्रक काढले नाही, कुठल्याही विषयाचे श्रेय स्वत:कडे घेतले नाही, संघ प्रचारकाचा एक महान आदर्श मोरोपंतांनी आपल्या जीवनातून उभा केला.
 
 
 
ही एकात्मता रथयात्रा पुढे होणार्यान अयोध्या आंदोलनाची पृष्ठभूमी झाली. हिंदू समाजाचा स्वभाव निरंतर जागृत राहाण्याचा नाही. एखादे संकट किंवा आपत्ती आली असता तेवढ्यापुरता समाज जागा होतो, नंतर मात्र तो ‘मी, माझे कुटुंब आणि माझे सुख’ यामध्ये गढून जातो, त्याला नित्य जागृत ठेवणे आवश्यक होते, हे काम अयोध्या आंदोलनाने साध्य झाले. आपले पुरोगामी महापंडित अयोध्या आंदोलनाचे त्यांच्या समाजवादी बुद्धीने विश्लेषण करतात. मंदिराची गरज काय?त्याच जागी मशीद आहे, ती कशाला पाडायची? मुसलमानांना काय वाटेल, सांप्रदायिक तणाव निर्माण होणार नाही का? मशीद तशीच ठेवून मंदिर बांधूया वगैरे वगैरे वगैरे.
 
 
या बावळट युक्तिवादाला विश्व हिंदू परिषदेने कृतीने उत्तर दिले. ज्या स्थानी रामाचा जन्म झाला, त्या जागी फक्त आणि फक्त राममंदिरच उभे राहील. एक इंच भूमीदेखील मशिदीला मिळणार नाही. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ ही घोषणा याच काळात लोकप्रिय झाली. हिंदू अस्मिता जागरण, हिंदू राष्ट्रभाव जागरण आणि हिंदू आग्रही होणे, ही या यात्रेची मोठी उपलब्धी आहे.
 
 
या यात्रेपाठोपाठ ‘राम-जानकी यात्रा’ अशी दुसरी यात्रा काढण्यात आली. तिचा संदर्भ अयोध्येतील रामजन्मभूमीशी होता. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन यानंतर हळूहळू वेग घेऊ लागले. 1987 ला रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका दूरदर्शनवर सुरू झाली. हिंदू धर्मजागरण, हिंदू अस्मिता जागरण, हिंदू इतिहास जागरण यासंदर्भात या मालिकेने जे कार्य केले आहे, ते शब्दात मांडणे फार कठीण आहे. ही ‘रामायण’ मालिका इतकी लोकप्रिय होती की, आयोजकांना आपल्या कार्यक्रमाच्या वेळा, विवाहाचा मुहूर्त, ‘रामायण’ मालिकेची वेळ सोडून ठरवावा लागला.
 
 
सगळा हिंदू समाज दूरदर्शनसमोर मालिका बघत बसे. लाखो भाषणांनी आणि हजारो पुस्तकांनी जे साधले नसते, ते एका मालिकेने साधले. रामानंद सागर हे कोणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते नव्हते, पण हृदयस्त हनुमंताने त्यांना प्रेरित केले आणि या मालिकेचा जन्म झाला. हिंदू जागरणाचे श्रेय कुठल्याही एका पक्षाला, संघटनेला देणे म्हणजे इतिहासाची प्रतारणा करण्यासारखे होईल.
 
 
पालनपूरच्या भाजप अधिवेशनात रामजन्मस्थानावर मंदिर असले पाहिजे, असा ठराव भाजपने केला. 1990 साली जनजागृती करण्यासाठी त्यांनी रथयात्रा काढली. या रथयात्रेने देशाचा राजकीय विमर्श (डिस्कोर्स) बदलवून टाकला. मुस्लीम तुष्टीकरणाचा ‘सेक्युलॅरिझम’ बदनाम झाला आणि त्याला मुठमाती देण्याचे काम अडवाणीजींच्या यात्रेने केले. या यात्रेच्या संयोजनात लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. हिंदू राजकीय नेतृत्वाचा उदय करणारी ही रथयात्रा ठरली. नंतर झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आणि नंतर 1996 साली 13 दिवसांचे का होईना, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अधिकारावर आले. हिंंदूंच्या राष्ट्रभाव जागरणाचा हा ऐतिहासिक विजय ठरला.
 
 
हिंदू जागरण यात्रेतील 1992 सालची अयोध्येतील कारसेवा हा अतिशय महत्त्वाचा किंवा निर्णायक टप्पा समजला पाहिजे. दि. 6 डिसेंबर, 1992 रोजी रामजन्मस्थानावर उभा असलेला बाबरी ढाचा कारसेवकांनी जमीनदोस्त केला. 1789ला फ्रेंच जनतेने अन्यायाचे प्रतीक झालेला बास्तिल तुरुंग फोडला आणि काही तासांत तो जमीनदोस्त करून टाकला. त्या घटनेची ही पुनरावृत्ती आहे. इतिहासातील हा समान धागा आपल्या देशातील महापंडितांच्या डोक्यावरून गेला.
 
 
त्यानंतर हिंदू समाजाला कायम जागृत ठेवण्यासाठी जोरदार आंदोलने करण्याची गरज राहिली नाही. 1992 नंतर 1998 साली अटलजींचे सरकार पुन्हा आले आणि ज्या हिंदुत्वाला गाडण्याचा संकल्प डाव्या विचारसरणीच्या लोकांनी केला होता, तेच अटलजींच्या सिंहासनाखाली गाडले गेले. योगी अरविंद सांगून गेले की, “सनातन धर्म आणि राष्ट्रवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धर्मभाव जागृत करा, राष्ट्रभाव आपोआप जागृत होतो,” असा त्याचा अर्थ झाला.
 
 
खर्यान अर्थाने हिंदूंची पूर्ण सत्ता येण्याचा कालखंड 2014 पासून सुरू होतो. फेब्रुवारी 2002 साली गुजरातमध्ये साबरमती एक्स्प्रेसचा डब्बा जाळून कारसेवकांना जीवंत जाळण्यात आले. हे काम गोध्रा येथील राष्ट्रद्रोह्यांनी केले. त्यांना संरक्षण देण्याचे प्रयत्न काँग्रेस आणि लालू प्रसाद यांनी केले. गुजरातमध्ये त्याची भयानक प्रतिक्रिया झाली आणि पुढे काय घडले, हे आपल्याला माहीत आहे
 
 
त्यातून एक संदेश गेला. हिंदू समाज मार खाण्याच्या स्थितीत आता राहिलेला नाही. आमच्यावर वीट मारली, तर दगडाने उत्तर दिले जाईल, ‘जशास तसे’ वागविले जाईल, गीताधर्माचे पालन केले जाईल, एकतर्फी अहिंसा आता नाही, हा संदेश अतिशय जबरदस्त आहे. मुहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून आपल्या बांधवांच्या रक्ताचे पाट वाहताना हिंदू समाजाने पाहिले. तो हिंदू समाज आता या मन:स्थितीत आला की, झाले ते पुरे झाले, आता रक्ताचे पाट वाहतील, पण ते आक्रमण करणार्यांईच्या. नरेंद्र मोदी यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून आणि बालाकोटवर हल्ला करून प्रत्याघाती मानसिकतेचे दर्शन घडविले.
 
 
हिंदूभाव जागृतीच्या या पर्वाचे अनेक शिल्पकार आहेत. बाळासाहेब ठाकरे, बाबा रामदेव, रविशंकर, गायत्री परिवार, रामकृष्ण मिशन, माता अमृतानंदमयी, चिन्मय मिशन अशा असंख्य व्यक्ती आणि संस्थांचे योगदान खूप मोठे आहे. सर्व बाजूने हिंदू समाजाला जागे करण्याचे काम सर्वांनी मिळून केलेले आहे म्हणून त्याचे श्रेय सर्वांचे. बाबा रामदेव यांनी योगाचा इतका प्रचार केला की, तो आता प्रत्येक हिंदूंच्या कुटुंबाचा विषय झालेला आहे. योगसाधना दुसरे-तिसरे काही नसून हिंदू जीवन-चिंतन साधना आहे.
 
 
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत पदार्पण करीत असताना खर्यार अर्थाने स्वातंत्र्यातील ‘स्व’ म्हणजे कोण आणि त्यातील ‘तंत्र’ म्हणजे कोणते तंत्र, याचा शोध हिंदू समाज घेऊ लागला आहे. तो सर्व बाजूने घेऊ लागला आहे. कोणी तत्त्वज्ञानाच्या अंगाने, कुणी योगसाधनेच्या अंगाने, कोणी स्वदेशीच्या अंगाने, कोणी विकासाच्या अंगाने, तर कोणी शेवटच्या पंक्तीतील शेवटच्या माणसाचा विचार या अंगाने ‘स्व’चा विचार करू लागला आहे आणि तंत्राचा विकास करू लागला आहे. हेच आपले खरे स्वातंत्र्य आहे.
 
- रमेश पतंगे
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.