‘निर्धास्त’ नितीश ते ‘निस्तेज’ नितीश!

    11-Aug-2022   
Total Views |

nitish
 
 
ठरावीक काळानंतर आपल्या सहकारी पक्षांविषयी उफाळून येणार्‍या असुरक्षिततेने नितीश कुमार यांना बेभरवशी राजकारणी बनविले आहे. यापूर्वी तेजस्वी यादव यांची सरकारमधील वाढती पकड आणि लोकप्रियतेमुळे नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपसोबत युती केली होती. त्याचप्रमाणे यावेळी भाजपचा वाढलेला जनाधार पाहून त्यांनी राजदसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे ही अनाकलनीय वृत्ती नितीश कुमार यांच्यासाठी आता राजकारणामध्ये मोठा ‘स्पीडब्रेकर’ ठरली आहे.
 
 
देशात साधारणपणे २०११ सालापासून काही निवडक राज्यांचे मुख्यमंत्री हे राष्ट्रीय नेतृत्व करू शकतील, असे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. त्यामध्ये आघाडीवर होते ते गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वासह विकासाचे एक नवे मॉडेल देशासमोर ठेवले होते. जगभरातून गुजरातमध्ये गुंतवणूक कशी होईल, याकडे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी हे विशेष लक्ष देत होते. परिणामी, देशातील नागरिकांच्या मनात नरेंद्र मोदी यांच्याविषयी कुतूहल निर्माण होण्यास प्रारंभ झाला होता. त्यातले दुसरे नाव होते ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे.
 
बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या जंगलराजविरोधात लढा देऊन त्यांनी बिहारमध्ये सत्ता प्राप्त केली होती. बिहारला जंगलराज आणि भ्रष्टाचारापासून साफ करण्याचे आणि प्रगतीशील राज्य बनविण्याचे ध्येय नितीश कुमार यांनी तेव्हा वारंवार बोलून दाखविले होते. अर्थात,२०११ सालानंतर अवघ्या दोन-अडीच वर्षांत भाजपने नरेंद्र मोदी यांना प्रथम प्रचारप्रमुख आणि त्यानंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले. त्यानंतर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने सोडली. त्यावेळी नितीश कुमार यांनी ‘सेक्युलॅरिझम’चे फसवे कारण दिले होते. मात्र, त्यावेळी देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या पारड्यात जनाधार टाकला होता. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासह अनेकांच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या अपेक्षांना २०१४ सालापासून सुरुंग लागण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे २०११ ते आता २०२२ या १२वर्षांचा विचार करता, नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व ‘लोकनेता ते विश्वनेता’ असे विस्तारले आहे, तर नितीश कुमार यांच्या नावापुढे ‘सालाबादप्रमाणे भूमिका बदलणारा बेभरवशी नेता’ हे बिरूद लागले आहे.
 
नितीश कुमार यांनी अवघ्या दोन दिवसांपूर्वी भाजपप्रणित रालोआची साथ सोडली आणि लालू प्रसाद यादव यांच्या राजदप्रणित महागठबंधनची साथ घेत पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळविले. यावेळी नितीश कुमार यांनी भाजपवर ते जदयु संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे आपल्याच पक्षातील रामचंद्रप्रसाद सिंह यांच्याद्वारे जदयुमध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मात्र, भाजप जदयु संपविण्याचा प्रयत्न करत असल्याच्या नितीश कुमार यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे लक्षात येते. कारण, २०२० सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमार त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता सर्वांत कमकुवत टप्प्यावर असल्याचे स्पष्ट दिसून आले होते. एकेकाळी बिहारी जनता नितीश कुमार यांचे बिहारमध्ये परिवर्तन घडविण्याचे दावे करणारी भाषणे ऐकण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असे. त्यानंतर त्याच गर्दीचे रुपांतर मतांमध्येही होत होते. एकूणच ‘बिहारचा मसीहा’ असे नितीश कुमार यांचे स्थान होते.
 
मात्र, २०२० सालची हवा काहीतरी वेगळीच होते. एरवी आपल्या एका वाक्याने जनसमुदायाला आपलेसे करणार्‍या नितीश कुमार यांच्यावरही ‘ही माझी शेवटची विधानसभा निवडणूक आहे, यानंतर मी एकही निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे यंदा तुम्ही मला निवडून द्यायलाच हवे,’ असे आर्जव करण्याची वेळ आली होती. निवडणुकीच्या निकालामध्ये नितीश कुमार यांना अवघ्या ४५ जागांवर समाधान मानावे लागले होते. दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत प्रथमच निवडणूक लढविणार्‍या तेजस्वी यादव यांनी राजदला ७९ जागांचा टप्पा गाठून दिला होता, तर आजवर जदयुचा धाकटा भाऊ म्हणून भूमिका पार पाडणार्‍या भाजपने ७७ जागा प्राप्त करत नितीश यांना जोरदार धक्का दिला होता.
 
त्यानंतरही भाजपने युतीधर्माचे पालन करून ४५ आमदार असलेल्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र, नितीश कुमार यांच्या मनात त्यांची नेहमीची चलबिचल त्याचवेळी सुरू झाली होती. बिहारच्या जनतेने जदयुला ४५ जागा देणे आणि त्याचवेळी भाजप व राजदला भरभरून जागा देणे, याचा अर्थ नितीश कुमार यांना चांगलाच लक्षात आला होता. भविष्याच बिहारच्या राजकारणात भाजप विरुद्ध राजद असा संघर्ष होऊ शकतो आणि त्यामध्ये जदयु मात्र कुठेही नसेल, याची भीती नितीश कुमारांना वाटू लागली होती. त्यातच प्रदेश भाजपमध्ये नितीश कुमार यांच्या कार्यशैलीविषयी असंतोष वाढत होता. कारण, बिहारमध्ये जंगलराज नष्ट करण्याचे आश्वासन देणारे नितीश कुमार हे त्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत होते. त्याचवेळी भाजपने शाहनवाझ हुसैन यांच्यासारखा नेता राज्य मंत्रिमंडळात आणून अतिशय महत्वाचे काम केले होते.
 
एकीकडे भाजपच्या मंत्र्यांची वाढती लोकप्रियता आणि दुसरीकडे पक्षांतर्गत वाढता संघर्ष, यातून मार्ग काढण्यासाठी नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा 79 जागा असलेल्या राजदसोबत आघाडी केली आहे. अर्थात, राजदच्या तेजस्वी यादव यांची गेल्या दोन दिवसांतील भाषा आणि देहबोली बघितल्यास नितीश कुमार मुख्यमंत्री नावालाच राहणार; याची खात्री पटते. नितीश कुमार यांनी भाजपला झटका द्यायच्या नादात तेजस्वी यादव यांना मोठे बळ प्रदान केले आहे. त्यातच नितीश कुमार यांचा बेभरवशी स्वभाव पाहता 2024 साली त्यांची भूमिका पुन्हा बदलू शकते, हे ध्यानात घेऊन तेजस्वी यादव हे नितीश कुमार यांचे खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडणार नाही; हेही स्पष्ट झाले आहे.
 
नितीश कुमार यांच्या यावेळच्या बेभरवशी वागण्यामुळे राष्ट्रीय राजकारण तर दूर राहिले, राज्याच्या राजकारणामध्येही त्यांचे स्थान डळमळीत झाले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अन्य विरोधी पक्षांच्या पंतप्रधानांच्या घोषित-अघोषित- तहहयात उमेदवारांप्रमाणे ‘२०१४ वाले २०२४ साली शिल्लक राहणार नाहीत,’ अशी दर्पोक्ती केली आहे. आता देशातील भाजपविरोधी राजकारण्यांच्या कंपूमध्ये जायचे असेल, तर असे डायलॉग अनिवार्य असल्याचे नितीश कुमार यांना चांगलेच माहिती आहे. मात्र, राष्ट्रीय राजकारणाचा विचार केल्यास तेथे भाजप अर्थात मोदीविरोधी आघाडी हा प्रमुख मुद्दा आहे. त्या आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी सध्या राहुल गांधी, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, के. चंद्रशेखर राव, शरद पवार आदी नेते २०१४ सालापासूनच प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आता नितीश कुमार यांची भर पडली आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणामध्ये हे नेते नितीश कुमार यांना कितपत स्वीकारतील, त्याहीपेक्षा नितीश कुमार हे या अन्य नेत्यांसोबत काम करण्यास तयार आहेत का; हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
 
अर्थात, बिहारमधील जनता संपूर्ण नाटक पाहत आहे. याचा फटका नितीश यांना सहन करावा लागू शकतो. 90च्या दशकात लालूंशिवाय समता पक्षाची स्थापना झाली, तेव्हा शहरी सुशिक्षित मतदार नितीश यांच्यासोबत गेले. भाजपचा पाठिंबा त्यांना बळ देत राहिला. शहर आणि ग्रामीण भागातही ‘नितीश मॉडेल’ पसंतीस उतरले. गावातील रस्ते चमकू लागले, वीज पोहोचली आणि त्यामुळे लालूंचा लालटेन विझविण्यात नितीश यांना यश आले होते. मात्र, त्यांच्या या यशामध्ये भाजपचीदेखील महत्वाची भूमिका होती, हे विसरून चालणार नाही.
 
भाजपसोबत २०१७ साली ‘घरवापसी’ करताना त्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भूमिका तर खुद्द नितीश कुमारही विसरणार नाहीत. मात्र, ठरावीक काळानंतर आपल्या सहकारी पक्षांविषयी उफाळून येणार्‍या असुरक्षिततेने नितीश कुमार यांना बेभरवशी राजकारणी बनविले आहे. यापूर्वी तेजस्वी यादव यांची सरकारमधील वाढती पकड आणि लोकप्रियतेमुळे नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपसोबत युती केली होती. त्याचप्रमाणे यावेळी भाजपचा वाढलेला जनाधार पाहून त्यांनी राजदसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे ही अनाकलनीय वृत्ती नितीश कुमार यांच्यासाठी आता राजकारणामध्ये मोठा ‘स्पीडब्रेकर’ ठरली आहे, यात कोणतीही शंका नाही.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.