पुणे: शुक्रवार पेठेत नेहरू चौक परिसरात असलेल्या जुन्या वाड्याचा काही भाग कोसळण्याची घटना शनिवार ९ जुलै २०२२ रोजी सकाळी घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ढिगाऱ्यात अडकलेल्या सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
विशेष म्हणजे दोनच दिवसापूर्वी महापालिकेने या शहरातील जुन्या इमारती ,वाडे, घरे सतत येणाऱ्या पावसामुळे पडू शकत असल्यास खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना केल्या होत्या. १ जुलै पासून पुण्यात संततधार पाऊस सुरू आहे. शुक्रवार पेठेतील हा वाडा ८० वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते.
या वाड्याचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच यात अडकलेल्या सहा जणांना बाहेर काढण्यात अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. अग्निशामक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील तीन मजली वाडयाचा काही भाग कोसळल्याची माहिती आम्हाला सात वाजून पंधरा मिनिटांनी मिळाली.
त्यानंतर आम्ही पुढील पाच मिनिटात घटनास्थळी पोहचलो. त्या वाड्यात तीन जणांचं कुटुंब राहत आहे. त्यापैकी सहा जण दुसर्या मजल्यावर अडकून पडले होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असल्याचे या पथकातील जवानांनी सांगितले.