मुंबईच्या दरडींखाली मृत्यू वाट पाहतोय !

लाल डोंगरमधील नागरिक भीतीखाली ; पुनर्वसनासोबत स्थलांतरणाची मागणी

    07-Jul-2022   
Total Views |

chembur issue  
 
 
ओंकार देशमुख
 
 
मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये मागील ३ ते ४ दिवसांपासून पावसाने धुवाँधार बॅटिंगला सुरुवात केली आहे. महापालिका क्षेत्रात सुरु झालेल्या पावसाचा मुंबईच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यातच दरड कोसळण्यासारख्या पावसामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मुंबईच्या चेंबूर भागातील लाल डोंगर परिसरातील नागरिक देखील मागील कित्येक वर्षांपासून आपला जीव मुठीत धरून जगत असून किमान पावसाळ्यात तरी आमचे स्थलांतरण व्हावे अशी आशा बाळगून आहेत. वर्ष 1992 ते 2022 या दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 300 पेक्षा लोकांनी जीव गमावला असून 320 हून अधिक जखमी झाल्याची माहिती माहिती अधिकाराखाली प्राप्त झाली होती. वारंवार दरड कोसळण्याचे अपघात होऊनही जर महापालिका यावर कायमस्वरूपी तोडगा काढत नसेल तर मुंबईतील दरडींखाली लपलेला मृत्यू स्थानिकांनी आपल्या कवेत घेण्यासाठी दबा धरून वाट पाहतोय, हे मात्र निश्चित आहे.
 
 
 
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जावर उत्तर देताना मुंबई महापालिका आणि 'म्हाडा'ने मुंबईतील दरडींखालील भाग आणि त्यांच्या स्थानांतरणाच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील ३६ पैकी २५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ३२७ ठिकाणे दरडीखाली असून, एकूण २५७ ठिकाणांना धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या भागात २२ हजार ४८३ कुटुंबीय असून, त्यापैकी ९ हजार ६५७ कुटुंबीयांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे राज्य सरकारला केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून झोपड्यांच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीपेक्षा नागरिकांना कायमस्वरूपी सुरक्षितस्थळी हलवणे आवश्यक असल्याचे गलगली यांनी म्हटले आहे.
 
 
 
नोटीस नको ; स्थलांतरण करा
'चेंबूरच्या एम पश्चिम भागात लाल डोंगर हा भाग असून त्या डोंगरामुळे आंबेडकर नगर, मुकुंदराव आंबेडकर नगर, पंचशील नगर भागातील झोपडपट्ट्या प्रभावित होतात. काही वर्षांपूर्वी या भागात दरड कोसळल्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले होते. या भागात सुरु असलेल्या विकासकामांमुळे स्थानिक झोपडपट्टी धारकांना त्रास सहन करावा लागतो. या भागातील स्थानिकांना कुठलाही अपघात होण्यापूर्वी दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण होणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाचे देखील काही प्रमाणात या विषयावर दुर्लक्ष होते आहे, हे स्पष्ट आहे. पालिकेने केवळ नोटिसा न देता झोपडपट्टी वासियांचे स्थलांतरण करावे अशी आमची मागणी आहे.'
- शंकर कांबळे, स्थानिक रहिवासी, लाल डोंगर, चेंबूर
 
 
 
जीवितहानी पूर्वीच मदत गरजेची
'विकासकाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक प्रकल्प राबविले जात आहेत आणि त्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही स्थानिक झोपडपट्टी वासियांची घरे देखील यामुळे प्रभावित झाली आहेत. स्थानिकांच्या रहदारीचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरही अस्वच्छता आणि असमतोल चढ उतार आहे. त्यातून आरोग्यासोबतच इतरही प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. प्रभागातील समस्यांच्या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार करूनही आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. कुठलीही जीवितहानी होण्यापूर्वी जर प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला तर निष्पापांचे प्राण वाचतील, दुर्घटना घडल्यावर नुकसान भरपाई देण्यापेक्षा अपघातापूर्वीच जर उचित पावले उचलली तर ते अधिक उपयुक्त ठरेल.'
- रोहिणी कदम, स्थानिक रहिवासी, लाल डोंगर, चेंबूर
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.