नवी दिल्ली: “पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविषयी प्रेम आणि वंचित-दलितांविषयी द्वेष, हेच मेहबुबा मुफ्ती यांचे धोरण आहे,” असा टोला जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते निर्मल सिंह यांनी लगाविला आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळाविषयी आक्षेपार्ह टीका केली. त्यास जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “मेहबूबा मुफ्ती या पातळीवर घसरतील, याची कल्पना नव्हती. दलित समाजातून आलेल्या, राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेल्या आणि गरिबांचे प्रतिनिधित्व करणार्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याविषयी खालच्या स्तरावरील भाषा वापरणे अतिशय निंदनीय आहे.”
सिंह पुढे म्हणाले की, “पंतप्रधान आणि केंद्र सरकारवर टीका करणे समजू शकतो. मात्र, राष्ट्रपतीपदाविषयी आणि त्या पदाचा कार्यकाळ संपलेल्या व्यक्तीविषयी अशी भाषा वापरणे अतिशय लज्जास्पद आहे. निवडणूक आयोग, न्यायालय, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याविषयी सातत्याने गरळ ओकणे आणि पाकिस्तान, दहशतवादी तसेच दहशतवादी हल्ल्यांमध्ये हुतात्मा होणार्या भारतीयांविषयी गप्प बसणे हेच मेहबुबा आणि त्यांच्या पक्षाचे धोरण आहे. मात्र, ज्या अजेंड्यास घेऊन त्यांचे राजकारण सुरू आहे, तो अजेंडा नेहमीच अपयशी ठरले आहेत,” अशी सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.
मुफ्ती म्हणाल्या...
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या कार्यकाळामध्ये भारतीय राज्यघटनेस अनेकवेळा चिरडले असून तोच वारसा त्यांनी मागे ठेवला आहे. ‘कलम ३७०’ असो, ‘नागरिकत्व कायदा’ असो अथवा दलित-अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे असो. त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या नावाखाली भाजपचा राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी काम केल्याचा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.