विरोधी पक्षांची एकजुट हे मृगजळच...; भाजपविरोधी राष्ट्रीय आघाडीस स्पष्ट तडा

राष्ट्रपती निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांचा विसंवाद ठळक

    22-Jul-2022   
Total Views |
opposition party
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्या. निवडणुकीमध्ये त्यांना रालोआ वगळता १७ खासदार आणि १०० हून अधिक आमदारांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाले असून, त्याद्वारे विरोधी पक्षांची एकजुट हे अद्यापतरी मृगजळच असल्याचे दिसून आले आहे.
 
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी भाजपप्रणित रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना संयुक्तपणे उमेदवारी दिली होती. त्यानंतर सिन्हा यांना देशभरातील राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याची वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेले विरोधी पक्ष देशात यापुढे होणाऱ्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीतही विरोधी पक्ष एकत्रपणे सामोरे जाणारे, असे स्वप्नरंजनही केले जात होते. यामध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वगैरे नेहमीचे चेहरे आघाडीवर होते.
 
 
मात्र, निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर विरोधी पक्षांचे स्वप्नही सालबादाप्रमाणे उध्वस्त झाले आहे. कारण, मुर्मू यांना रालोआवगळता १७ खासदार आणि १४ राज्यांमधून १२० हून अधिक बिगररालोआ आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. विशेष म्हणजे ज्या केरळमध्ये भाजप अद्यापही प्रवेशासाठी धडपडतच आहे, तेथूनही मुर्मू यांना एक मत मिळाले आहे. त्यामुळे भाजप आणि त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांची एकजुट हे मृगजळच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे या नेत्यांच्या कथित एकजुटीच्या स्वप्नास त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी हरताळ फासल्याचे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झालेल्या ‘क्रॉस व्होटिंग’मुळे स्पष्ट झाले आहे.
 
 
 
बिगररालोआ आमदारांच्या पाठिब्यांचा अन्वयार्थ
तब्बल १४ राज्यांमधून मुर्मू यांना बिगरभाजप–बिगररालोआ आमदारांनी मतदान केले आहे. त्यापैकी ज्या राज्यांमधून सर्वाधिक ‘क्रॉस व्होटिंग’ झाले, तेथील समीकरणे समजून घेण्याची गरज आहे.
 
 
आसाममध्ये सर्वाधिक २२ आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केले असून आसाममध्ये ६ टक्के लोकसंख्या वनवासी समाजाची आहे. राज्यात अनेक जागांवर आदिवासी समाजाचा प्रभाव आहे. येथे काँग्रेसचे २५ आमदार असून त्यापैकी २२ आमदारांनी मुर्मू यांना मत दिले आहे. मध्य प्रदेशातील विधानसभेच्या २३० जागांपैकी ४७ जागा वनवासी समाजासाठी राखीव आहेत. येथे काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष मिळून विरोधकांकडे १०० आमदार आहेत. त्यापैकी काँग्रेस आमदारांनी मुर्मू यांना मत दिल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असून हा काँग्रेससाठी नक्कीच धोक्याचा इशारा आहे.
 
 
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या सत्ताबदलाचे प्रतिबिंब राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही उमटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यशवंत सिन्हा यांना तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात झालेले १६ आमदारांचे ‘क्रॉस व्होटिंग’ हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातमध्ये ३० ते ४० मतदारसंघांमध्ये वनवासी मतदार निर्णायक ठरतात. त्याचप्रमाणे २०१७ सालापासूनच काँग्रेस आमदार फुटण्याची प्रक्रिया सुरू असल्याने १० आमदारांनी केलेले ‘क्रॉस व्होटिंग’ काँग्रेसच्या अडचणीत भर घालणारे ठरणार आहे.
 
 
झारखंडचे राज्यपालपद भुषविणाऱ्या मुर्मू यांना सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाने पाठिंबा जाहिर केला होता. त्यामागे राज्यातील वनवासी मतदारांना न दुखावण्याचा स्पष्ट हेतू होता. झारखंड विधानसभेचे ८२ सदस्य असून त्यापैकी मुर्मू यांना ७० मते प्राप्त होऊन काँग्रेसच्या १० आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याचे समजते.
 
 
 
उत्तर प्रदेशात पहिल्या दिवसापासूनच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ निश्चित होणारच, असे स्पष्ट झाले होते. त्यानुसार राज्यातील १२ विरोधी पक्षांच्या आमदारांनी मुर्मू यांना मतदान केले. राजस्थानमध्ये विधानसभेचे २०० आमदार आहेत, त्यापैकी भाजपचे ७० आमदार आहेत. मात्र, मुर्मू यांना ७५ मते प्राप्त झाली असून काँग्रेसच्या ५ आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केले आहे. राजस्थानमध्ये गेहलोत विरुद्ध पायलट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे ‘क्रॉस व्होटिंग’ काँग्रेससाठी काळजीचा विषय आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुक होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सहा आमदारांनी मुर्मू यांना मतदान करून पक्षाच्या चिंतेत भर घातली आहे.
 
 
केरळमधून ‘नकारात्मकते’विरोधात ‘सकारात्मकतेस’ मत – के. सुरेंद्रन, भाजप प्रदेशाध्यक्ष
अद्यापही डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असणाऱ्या केरळमध्ये यश मिळविण्यासाठी भाजप धडपड करत आहे. सध्या केरळच्या विधानसभेत भाजपचा एकही आमदार निवडून आलेले नाही. असे असतानाही १४० आमदारांमधून मुर्मू यांना एक मत प्राप्त झाले आहे. त्याविषयी केरळ प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले, केरळमधून द्रौपुदी मुर्मू यांना मिळालेले एक मत हे उर्वरित १३९ मतांपेक्षा अधिक महत्वाचे आहे. कारण हे मत नकारात्मकतेच्या विरोधात सकारात्मकतेस दिलेले मत आहे, असे सुरेंद्रन म्हटले आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.