सेंट देवसहायम् : चर्चने प्रसवलेला नवा संत

Total Views |

St. Devasahayam
 
 
 
कोण हा देवसहायम्? २००४ ते २०२२ एवढा काळ त्याच्या संतपदाचा प्रस्ताव विचाराधीन का राहिला? तो संत झाला किंवा न झाला, तर तुम्हा-आम्हाला काय फरक पडतो? काय आहे ही सगळी भानगड?
 
 
 
नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेलीय. वारीमध्ये पायी चालणारे, टाळ-मृदुंगाच्या नादात भक्तिरसात चिंब न्हालेले वारकरी, समोरासमोर आल्यावर दोघांनी एकमेकांना ‘माऊली’ असं म्हणून एकमेकांच्या पाया पडणं, अशा सारखी अनेक चित्रं, व्हिडिओ क्लिप्स आपण पाहिल्या असतील. आपण एकमेकांना ‘माऊली’ म्हणून पाया पडतो, हा संप्रदायाच्या अभिवादनाचा एक भाग आहे; प्रत्यक्षात आपण संत नाही, मात्र माऊलीच्या कृपेने आपण संत बनू सुद्धा शकतो, अशी अमर्याद श्रद्धा प्रत्येकाच्या अंत:करणात असते. थोडक्यात, वारकरी काय किंवा कोणताही हिंदू संप्रदाय घ्या, संतपद हे खिरापतीसारखं वाटलं जात नाही. ‘चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचावे’ असे संतांनीच म्हणून ठेवलं आहे. अगदी अलीकडची पटकन आठवणारी उदाहरणं म्हणजे हुबळीचे संत सिद्धारूढ महाराज आणि गोंदवल्याचे संत ब्रह्मचैतन्य महाराज. हे संतपद प्राप्त होण्यापूर्वी कोणत्या अग्निपरीक्षेला त्यांना तोंड द्यावं लागलं, याचं विस्तृत विवेचन त्यांच्या चरित्रकारांनी करून ठेवलेलं आहे. पण, आपल्या रोमन कॅथलिक चर्च या महान संस्थेचा खाक्या वेगळाच आहे, बरं का! दि. १५ मे रोजी रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी एकदम नऊ लोकांना होलसेलमध्ये संतपद देऊन टाकलं. हाय काय अन् नाय काय!
 
 
 
रोमन कॅथलिक चर्च ही आज जगातली सर्वात श्रीमंत, सर्वाधिक अनुयायी असणारी, सर्वशक्तिमान संप्रदाय संस्था आहे. इटली या देशाची राजधानी शहर रोम. या रोममधल्याच १०८.७२ एकर एवढ्या क्षेत्रावर व्हॅटिकन हे रोमन कॅथलिक चर्चचं जागतिक मुख्यालय वसलेलं आहे. अधिकृतपणे ‘व्हॅटिकन सिटी’ हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे. २०१९ या वर्षाच्या अंदाजानुसार, जगभरात कॅथलिक चर्चचे १,३४५ कोटी अनुयायी आहेत. नंतरच्या दोन वर्षांची आकडेवारी ‘कोविड’मुळे उपलब्ध होऊ शकलेली नाही. चर्चची स्थावर आणि जंगम संपत्ती किती आहे, याचा तर कुणालाच अंदाज नाही. २०१९च्या एका वरवरच्या सर्वेक्षणानुसार चर्चच्या ताब्यात असलेली जगभरची नुसती जमीनच १७७ कोटी एकर एवढी आहे. बाकी जंगम संपत्ती म्हणजे रोकड आणि अत्यंत मूल्यवान अशा अगणित कलावस्तू, दुर्मीळ ग्रंथ यांची तर किंमतच होऊ शकत नाही. शतकानुशतकं असंख्य राजे-रजवाडे सरदार-जहागिरदार अशा लोकांनी नजर केलेल्या अतिमूल्यवान वस्तूंनी व्हॅटिकनची भांडारं खच्चून भरलेली आहेत. या कॅथलिक संप्रदायाच्या प्रमुखांना हौतात्म्याचं मोठं आकर्षण आहे. कॅथलिक संप्रदायाच्या प्रचार-प्रसारासाठी ज्यांनी बलिदान केलंय, अशांना संतपदासाठी प्रथम पसंती दिली जाते. एखाद्या अतिश्रीमंत कॉर्पोरेट कंपनीसारखं त्यांचं काम चालतं. देशोदेशींच्या पाद्य्रांनी प्रथम आपापल्या देशातला गेल्या काही शतकांमधला असा कुणीतरी बुवा किंवा बाई हुडकून काढावी की, ज्याने किंवा जिने कॅथलिक पंथाच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्य वेचलंय. मग त्यांनी त्या व्यक्तीला संतपद देण्यात यावं, अशा आशयाचं ‘प्रपोझल’ स्थानिक पातळीवर ‘पुट अप’करावं. कोणत्याही कॉर्पोेरेट कंपनीप्रमाणेच पॅरिश, डायोसिस, आर्चडायोसिस आणि मग होली सी म्हणजे खुद्द पोप, अशा चढत्या भांजणीने त्या ‘प्रपोझल’वर भरपूर विचार होतो. यात अनेक वर्षं जातात. कॉर्पोरेट कंपनी लवकरात लवकर ‘प्रपोझल’चा फडशा पाडते, तशी इथे कोणतीही घाई केली जात नाही. ‘प्रपोझल’ जसजसं वर सरकेल तसं त्या व्यक्तींना ‘बीटीफाय’, ‘व्हेनरेबल’, ‘ब्लेसेड’ आणि अखेर ‘कॅनवाईज्ड’ म्हणजे ‘संत’ असं संबोधलं जातं.
 
 
 
आपल्या आजच्या लेखाचा विषय असलेला सेंट किंवा संत देवसहायम् याला ‘बीटीफाय’ म्हणजे स्वर्गात प्रवेश करण्यास योग्य समजलं जावं, असं ‘प्रपोझल’ २००४ साली प्रथम ‘पुट अप’ करण्यात आलं, जून २०१२ मध्ये त्याला ‘व्हेनरेबल’ म्हणजे सन्माननीय व्यक्ती ठरवण्यात आलं. डिसेंबर २०१२ मध्ये त्याला ‘ब्लेसेड’ म्हणजे देवाचा आशीर्वाद मिळवलेला असं ठरवण्यात आलं. आता पुढची पायरी म्हणजे ‘कॅननायझेशन’ म्हणजेच संतपद. याकरिता एक फारच आवश्यक अट म्हणजे त्या व्यक्तीने जीवंतपणी किंवा मेल्यावर काहीतरी चमत्कार करून दाखवलेला असला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन किंवा तत्सम फक्त हिंदू समाजाच्याच श्रद्धांना अंध ठरवणारे विज्ञानांध लोक यांच्या नाकावर टिच्चून देवसहायम्ने केलेला चमत्कार व्हॅटिकनकडे पाठवण्यात आला. फेब्रुवारी २०२१ मध्ये ती घटना म्हणजे चमत्कारच होय, याला पोप फ्रान्सिसने संमती दिली. नोव्हेंबर २०२१ मध्ये पोपने देवसहायम्ला अधिकृतपणे ‘संत’ ही पदवी दिली. १५ मे या दिवशी व्हॅटिकनमध्ये झालेल्या एका भव्यदिव्य समारंभात पोपने देवसहायम् आणि अन्य नऊ जणांना जाहीरपणे संत पदवी बहाल केली. कोण हा देवसहायम्? २००४ ते २०२२ एवढा काळ त्याच्या संतपदाचा प्रस्ताव विचाराधीन का राहिला? तो संत झाला किंवा न झाला, तर तुम्हा-आम्हाला काय फरक पडतो? काय आहे ही सगळी भानगड? प्राचीन दक्षिण भारतात चोल, पांड्य आणि चेर अशा राजवंशांची नाव येतात. रामायण, महाभारत आणि इतर अनेक पुराणग्रंथांत ही नाव येतात. यातले चोल हे आजच्या कर्नाटकचे, पांड्य हे आजच्या तामिळनाडूचे आणि चेर हे आजच्या केरळ प्रांताचे राजे होते.
 
 
 
केरळ हा पूर्णपणे पश्चिम किनारपट्टीवरचा प्रांत असून, अलीकडच्या इतिहासात त्याला ‘मलबार’ असं म्हटलं जात असे. येशू ख्रिस्ताच्या प्रमुख अशा १२ शिष्यांपैकी टॉमस हा शिष्य इ. स. ५२ या वर्षी सर्वप्रथम भारतात आला आणि धर्मप्रसार करता करता इ. स. ७२ या वर्षी आजच्या चेन्नईजवळ सांतोम या ठिकाणी मरण पावला, अशी तामिळ आणि केरळी ख्रिश्चनांची श्रद्धा आहे. पक्का पुरावा काहीही नाही. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला मलबारच्या त्रावणकोर राज्यात एक जबरदस्त राजा निर्माण झाला. १७०६ साली जन्मलेला राजा मार्तंड वर्मा १७२९ साली वयाच्या २३व्या वर्षी त्रावणकोरचा राजा झाला. बलवान पायदळ आणि घोडदळ यांच्या बळावर मार्तंडवर्माने चौफेर दिग्विजय सुरु केला. पूर्वेला तामिळनाडू आणि उत्तरेला कर्नाटकमधील अनेक छोटी राज्यं, जहागिर्‍या जिंकून त्याने आपल्या साम्राज्यात जोडल्या. १६०० साली जशी लंडनमध्ये ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’ स्थापन झाली, तशीच १६०२ साली हॉलंडमध्ये ‘डच ईस्ट इंडिया कंपनी’ निघाली. केरळ, तामिळनाडू ते थेट मलाया, इंडो-चायनापर्यंतच्या (आजचा इंडोनेशिया) प्रदेशातली मिरी स्वस्तात विकत घ्यायची आणि युरोपात दसपट किमतीत विकून भरपूर नफा कमवायचा, असं एकंदर डचांचं धोरण होतं. मार्तंड वर्मा राजा झाल्यावर हे जमेना. तेव्हा डच आरमाराने मार्तंड वर्मांच्या राज्यातील कोलाचल या बंदरावर सरळ हल्ला चढवला. दि. १० ऑगस्ट, १७४१ या दिवशी डच आणि मार्तंड वर्मा यांच्या सैन्यात घनघोर लढाई होऊन डचांचा साफ पराभव झाला. डच अ‍ॅडमिरल युस्टेशियस डि लेनॉय याने संपूर्ण शरणागती पत्करली. पुढे मार्तंड वर्मा आणि डि लेनॉय यांच्यात मैत्री झाली. डि लेनॉयने मार्तंड वर्माची नोकरी पत्करली आणि त्याचं सैन्य युरोपीय धर्तीवर नव्याने उभं करून दिलं. डि लेनॉय १७७७ मध्ये केरळातच मरण पावला. बस, इथूनच स्थानिक केरळ चर्चने काल्पनिक कथा रचायला सुरुवात केली. डि लेनॉय आणि मार्तंड वर्माचा एक शूर सेनापती नीलकंठन् पिल्लै यांची दार मैत्री झाली. डि लेनॉयच्या प्रभावाने नीलकंठन्ने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. हे न आवडलेल्या मार्तंड वर्माने नीलकंठन्ची धिंड काढली आणि त्याला गोळी घातली. हे सगळं १७५१ साली घडलं. नीलकंठन्ने ख्रिश्चन बनल्यावर ‘देवसहायम्’ असं नाव घेतलं होतं. धर्मासाठी देवसहायम् बलिदान झाला. चला, देवसहायम्ला संत करा पाहू!
 
 
 
देवसहायम्ला गोळी घालण्यासाठी शिपायांनी बंदूक उचलली, तर म्हणे गोळी उडेचना. तेव्हा देवसहायम्ने स्वत:च त्या बंदुकांवर प्रेमाने हात फिरवून त्यांना आशीर्वाद दिला. मग गोळ्या उडाल्या आणि पवित्र कॅथलिक धर्मासाठी देवसहायम् बलिदान झाला. हा त्याचा चमत्कार, बरं का! शंकराच्या गळ्यातला साप चावून आंधळ्या निरूपा रॉयला पुन्हा दृष्टी येते, असा जबरा चमत्कार ‘अमर, अकबर, अँथनी’ मध्ये दाखवणार्‍या दिग्दर्शक मनमोहन देसाईला कुणीतरी देवसहायम्चा हा चमत्कार सांगायला हवा होता. असो. केरळ प्रांतातले सर्व इतिहासतज्ज्ञ एकमुखाने सांगतात की, ही संपूर्ण कथा चक्क खोटी आहे. त्रावणकोर राज्याच्या कागदपत्रांत कुठेही नीलकंठन् किंवा देवसहायम् पिल्लै हे नावच आढळत नाही. दुसरा मुद्दा- राजा मार्तंड वर्माच्या राज्यात ख्रिश्चन आणि मुसलमान यांचा कधीच छळ वगैरे झालेला नाही. तिसरा मुद्दा- डि लेनॉय हा प्रोटेस्टंट होता. त्यामुळे समजा त्याच्या प्रभावाने या कथित नीलकंठन्ने ख्रिश्चन धर्म स्वीकारलाच असता, तर तो प्रोटेस्टंट झाला असता; कॅथलिक नव्हे. तात्पर्य, स्थानिक स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत कॅथलिक चर्चला असं दाखवायचं आहे की, आम्ही एका सर्वसामान्य भारतीयाला संतपद दिलं.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.