भाजपप्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) आणि पाकिस्तानने निषेधाच्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. त्यासंदर्भात शर्मा यांच्यावर आणि अन्य भाजपप्रवक्ते नवीनकुमार जिंदाल यांच्यावर भाजपने कारवाईदेखील केली आहे. वादग्रस्त टिप्पणीचा निषेध म्हणून सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन, ओमान, कतार इत्यादी इस्लामी देशांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन तेथील नागरिकांना केले आहे. त्यामुळे भारतातील मोदीद्वेषाची कावीळ झालेल्या स्वयंघोषित पुरोगाम्यांनीदेखील कोल्हेकुई सुरू केली आहे.
प्रश्न असा आहे की, भारताच्या राज्यघटनेने नागरिकांना सप्तस्वातंत्र्ये बहाल केलेली आहेत. त्यांचा कुणी दुरुपयोग केल्यास भारतातील कायद्यांनुसार त्यांच्यावर कारवाई होईलच. मात्र भारतात ईशनिंदेचा (ब्लास्फेमी) कायदा लागू झालेला नाही, कारण हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, इस्लामी राष्ट्र नव्हे. (त्या ईशनिंदेच्या कायद्याबाबत जागतिक मानवी हक्क संघटनेचे किंवा येथील पुरोगाम्यांचे काय मत आहे?) खरेतर मुस्लीम आक्रमकांनी त्यांच्या चौदाशे वर्षांच्या इतिहासात हजारो मंदिरे, चर्चेस, गुरुद्वारा इत्यादी धर्मस्थळे उद्ध्वस्त केली, मूर्ती फोडल्या. अलीकडच्या काळात अफगाणिस्तानातील बामियान येथे तालिबान्यांनी पुरातन बुद्धमूर्ती सुरुंग लावून उद्ध्वस्त केली.... ती सर्व 'ईशनिंदा' नव्हती का? की धार्मिक भावना केवळ मुस्लिमांनाच आहेत आणि मुस्लिमेतरांना त्या नाहीत, असे आहे?
उपरोक्त इस्लामी देश तेथील नागरिकांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत आहेत. मग, गेल्या तीनचारशे वर्षांत मानवी जीवन सुखी करणारे विज्ञानक्षेत्रात जे अनेक शोध लागले ते सर्व ख्रिश्चन वा ज्यू ह्या 'काफरां'नी लावले, त्या सर्वांवर बहिष्कार टाकून हे इस्लामी देश चौदाशे वर्षांपूर्वीची जीवनपद्धती अवलंबिणार का? आणि यास उत्तर म्हणून भारतातील बिगरमुस्लिमांनी जर मुस्लिमांच्या बेकऱ्या, कत्तलखाने, विविध 'हलाल' उत्पादने, विविध ग्राहकसेवा यांच्यावर बहिष्कार घातला तर काय परिस्थिती उद्भवेल? भारतातील सुबुद्ध मुस्लिमांनी याबाबत गांभीर्याने विचार करून हे प्रकरण किती ताणायचे, याचा विचार करणे आवश्यक आहे.
- अविनाश वाघ, पुणे
(प्रस्तुत मजकूर हा वाचकपत्र या सदरातून प्रकाशित केला आहे. या मजकूरातील लेखकाची मते वैयक्तीक आहेत.)