संगमनगरमधील स्वच्छतागृहांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2022   
Total Views |

sangamnagar
 
 
 
 
 
मुंबई : वडाळा पूर्व भागातील संगमनगर परिसरात मागील काही वर्षांपासून सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनगर परिसरात निर्माण झालेल्या या प्रश्नामुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित अडचणी हळूहळू निर्माण होऊ लागल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांचा दबलेला असंतोष आता उफाळून येऊ लागला आहे. त्यातच स्थानिक रहिवाशांनी जाहीरपणे आपला असंतोष व्यक्त करायला सुरुवात केल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संगमनगर परिसरातील या मुद्द्यावर स्थानिकांनी नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला.
 
 
 
स्थानिक लोकप्रतिनिधी प्रश्नावर उदासीनच
आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून वारंवार या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सतत त्यांच्याशी संपर्क करून या प्रश्नांची तीव्रता त्यांच्यापर्यंत पोहोचवली मात्र, दुर्दैवाने अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर कुठलाही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही. त्यातून त्यांची सर्वसामान्यांच्या प्रश्नावरील उदासीनता लख्खपणे समोर आली आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
संभाव्य जीवितहानीची जबाबदारी कुणाची?
संगमनगर भागात अनेक नाल्या उघड्या असून त्यावर झाकण बसवलेले नाही. दुर्दैवाने या भागातील मुले खेळताना जर नाल्याच्या आसपास गेली आणि त्यातून काही दुर्घटना घडली, तर त्यातून होणार्‍या जीवितहानीची जबाबदारी कुणाची? संगमनगर भागात सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट झालेली असून त्याची पुनर्बांधणी व्हावी, अशी आमची मागणी आहे. दुर्दैवाने स्थानिक नगरसेविका या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नसून या प्रश्नाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
- माधुरी कांबळे, स्थानिक रहिवासी, प्रभाग क्र. १८०
 
 
 
जनतेच्या प्रश्नाशी काहीही पडलेले नाही
काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होईल आणि तुंबलेल्या नाल्यांचे पाणी आमच्या घरात येण्याचा प्रकार पुन्हा सुरू होईल, हे निश्चित आहे. या शौचालयांची वारंवार केवळ तात्पुरती दुरुस्तीच केली जाते. त्यावर निश्चित असा उपाय शोधला जात नाही. मलनिस्सारण वाहिनीची स्थिती पूर्णपणे बिघडली असून त्यातून वाहणारे घटक पावसाळ्यात रस्त्यावर जमा होतात. शौचालयांत जाण्यासाठी महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नगरसेविका येतात आणि जातात, त्यांचे ध्येय केवळ पैसे खाणे, इतकेच असून त्यांना जनतेच्या प्रश्नाशी काहीही पडलेले नाही.
- नजमा खान, स्थानिक महिला रहिवासी, प्रभाग १८०
 
 
 
आम्ही प्रयत्नशील आहोत
प्रभागातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करणे, हे काम नगरसेवकाच्या अखत्यारित आणि कार्यकक्षेत येते. त्यानुसार प्रभागातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याचे काम मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात करण्यात आलेले आहे. मात्र, नागरिकांच्या जर अपेक्षा असतील की, ही सार्वजनिक शौचालये तोडून त्या ठिकाणी नवे बांधकाम व्हावे, तर ते काम स्थानिक आमदार आणि खासदारांचे आहे. आम्ही आमच्या पातळीवर या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- स्मिता गावकर, माजी नगरसेविका, प्रभाग क्र. १८०, शिवसेना
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@