आजकाल राज्यातील सत्ताधारी राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या वर्तन आणि कृतीने, ‘सर्वसामान्य माणसाची आम्हाला कवडीचीही किंमत नाही’ हे गेल्या अडीच वर्षांत दाखवून दिले. निव्वळ सत्तेत राहून भ्रष्टाचार करायचा आणि माध्यमांना हाताशी घेत निर्लज्जपणे वक्तव्ये करायची, हाच यांचा नित्याचा उद्योग. एवढेच नव्हे, तर ज्या न्यायव्यवस्थेमार्फत हा देश विश्वासाने वाटचाल करीत आहे, त्या न्याय व्यवस्थेने दिलेल्या निर्णयावरदेखील अवमानजनक भाष्य करण्यापर्यंत या नेत्यांची मजल जाते, म्हणजे सत्तेच्या मस्तीची धुंदीच यांना चढली असल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल. असा घातक आणि दुर्दैवी पायंडा या राज्यातील तीन पक्षात असलेल्या नेत्यांनी, राजकीय लोकांनी पाडला. गेल्या अडीच वर्षांपासून हा तमाशा राज्यातील जनता बघत आहे. मात्र, काही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते याला अपवाद आहेत. विशेषत्वे भारतीय जनता पक्षातील शिस्त आणि कार्यपद्धती ही या सत्तांध लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दोन आमदारांनी पक्षनिष्ठेचे जे उदाहरण समोर ठेवले, त्याचे स्वागत या राज्यातील जनतेने केले. समाजमाध्यमांवर तर या दोन्ही भाजप आमदारांच्या कृतीचे कौतुक तर झालेच, पण हे दोन्ही आमदार लवकर बरे होवोत, अशा सदिच्छादेखील अनेकांनी व्यक्त केल्या. पक्षातील नेता आणि कार्यकर्ता कसा असावा, हे राजकीय संस्कार भाजपच्या नेत्यांच्या या कृतीतून समाजात रुजले आहेत. प्रकृती बरी नसतानादेखील पुण्यातील मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप या भाजपच्या आमदारद्वयीने पक्षनिष्ठा आणि कर्तव्यपूर्तीचा आदर्श निर्माण करून राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. आजारी असूनदेखील पक्षाला गरज आहे आणि पक्ष आमची या स्थितीत काळजी घेतो, म्हणून या दोन्ही निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून सकारात्मक राजकारण काय असते, हे दाखवून दिले. विशेष म्हणजे, या दोन्ही आमदारांना मतदान करण्यासाठी कोणतीही बळजबरी करण्यात आली नव्हती, उलट पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘प्रकृती आधी जपा, शक्य असेल तरच मतदानाला या’ असा प्रेमळ निरोप दिला होता. राज्याच्या राजकारणातील ही दोन रूपं लोकांना भविष्यात सद्सदविवेकबुद्धीने मतदान करण्यासाठी नक्कीच मार्ग दाखवतील, यात संदेह नाही.
शिक्षण, अध्यात्माचा हातात हात
क्षण आणि अध्यात्म हे हातात हात घालून चालले, तर संस्कारक्षम पिढी तयार होऊन समाजाची मानसिकतादेखील सकारात्मक होत असते. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते आणि येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण आणि अध्यात्माच्या उत्सवाला सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे हे उत्सव फार उत्साहात साजरे झाले नाहीत. मात्र, यावर्षी पुन्हा या दोन्ही उत्सवांनी वातावरण भारावून टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील उपस्थितीने आणि तेथील त्यांनी आधुनिक भारत आणि अध्यात्म अशी सांगड घालीत केलेल्या भाषणांमुळे धार्मिक उत्सवाची पायाभरणी यावर्षी खर्या अर्थाने झाली, असे म्हणता येईल. शिक्षण क्षेत्र आणि पुणे हे नातं आता आधुनिक काळातदेखील तितकच उजळ आहे, हे अलीकडील पुण्यात झालेल्या काही घटनांवरून स्पष्ट झाले. मग राजदत्त यांचा गौरव कार्यक्रमात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी मांडलेले विचार असोत की, पुण्यभूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलेले विचार असोत, यातून पुणेकर नागरिक आणि भावी पिढी यांना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारी नेमकी दिशा जी आजच्या काळाला अनुसरून आहे ती मिळाली. इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालात गुणवंत झालेले विद्यार्थी आणि अन्य शैक्षणिक उपक्रमांतून होणारे प्रबोधन हे या पिढीसाठी संजीवक ठरत आहे. वारी, देशभक्तीपर कार्यक्रम, योगासारख्या उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची कृती हे या दिशेने पडलेले सकारात्मक पाऊल आहे. त्यात आता तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळा यातूनदेखील विविध समाजपयोगी उपक्रमातून समाजाला योग्य दिशा दिली जात आहे. ‘आयटी’ क्षेत्रातील कार्य करणारी पिढी आता या अध्यात्मिक कार्यक्रमात वारकरी बनून सहभागी होते. तेव्हा, शिक्षण आणि अध्यात्म ही सांगड संस्कारक्षम समाजाला उपयुक्त ठरणारी असते, हे यानिमित्ताने पुन्हा सिद्ध होत आहे. पुणे शहराची ही अध्यात्म आणि शिक्षण असे दोहोंचे हातात हात घेऊन पुढे नेण्याची परंपरा नक्कीच इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरेल, हे नाकबूल करून चालणार नाही.
लेखक: अतुल तांदळीकर