विधानपरिषदेत कोण मारणार बाजी? : मतदानाचे बिगुल वाजले.

    20-Jun-2022
Total Views |
u 
 
 
 
मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे, मंदा म्हात्रे, बबनराव लोणीकर विजयकुमार देशमुख यांच्या सह भारतीय जनता पक्षाच्या बहुतांश आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.  विधानभवनात दाखल होण्याआधी भाजपच्या सर्व आमदारांची भारतीय जनता पक्ष कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आमदाराशी संवाद साधून कशा पद्धतीने मतदान करायचे याचे निर्देश दिले.
 
 
विजयाचा दावा
राज्यसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती विधानपरिषदेत होणार त्यामुळे प्रसाद लाड यांचा विजय निश्चित आहे, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे. आम्ही या वेळी फारशी चर्चा करणार नाही पण कौशल्याचा वापर करून आम्ही महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकून आणून दाखवू , अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
 
 
गुप्त मदतदन आणि वाढली चिंता
विधानपरिषदेची मतदान प्रक्रिया ही गुप्त असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमदार फुटण्याची भीती अधिक आहे. विधानपरिषदेच्या विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला २६ मतांची गरज आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ उपलब्ध आहे. संख्याबळानुसार भाजपचे ४ उमेदवार निवडून येऊ शकतात परंतु भाजपने प्रसाद लाड यांना ५ व्या जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरावल्याने काँग्रेसचे भाई जगताप यांच्या समोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसकडे स्वपक्षीय ४४ मतं आहेत, समाजवादी पक्ष व काही अपक्ष यांच्या मतांची बेरीज करून देखील भाई जगताप यांना विजयासाठी ३-४ मतांची गरज आहे.
 
 
रणनीती
देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी भाजप कार्यालयात सगळ्या आमदारांची बैठक घेऊन, प्रत्येक आमदाराला व्यक्तीगत एका खोलीत समोरा समोर बसवून मतांच्या पसंतीचाक्रम कसा असावा याचे मार्गदर्शन व सूचना केली. मागच्या निवडणुकी प्रमाणे जोखीम न पत्करता पहिल्या चार उमेदवारांच्या मतांचा कोटा भाजपकडून आधी पूर्ण केला जाण्याची शक्यता आहे. प्रसाद लाड यांना १३ अतिरिक्त मतांची गरज असल्याने भाजप यावेळी चमत्कार घडवून लाड यांच्या विजयाचा गुलाल उधळणार का? याकडे सगळ्यांचच लक्ष लागले आहे. प्रथम राष्ट्रवादी त्यानंतर काँग्रेस आणि सगळ्यात शेवटी शिवसेनेचे आमदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची रणनीती महाविकास आघाडीने रचली आहे. मागच्या निवडणुकीप्रमाणे मत बाद होऊ नये यासाठी माविआच्या जेष्ठ नेत्यांनी आमदारांना मार्गदर्शन केले आहे.
 
 
देवाकडे साकडे
दरम्यान निवडणुकीत विजय मिळावा यासाठी भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांनी सकाळी दादरच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दुसरीकडे शिवसेनेचे सचिन अहिर व आमषा पाडवी यांनी महालक्ष्मीकडे विजयासाठी साकडे घातले.