कल्याण : इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेत कल्याणच्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने आत्महत्या केली. तिच्यावर चारवर्षांपासून तब्बल ७-८ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिच्या कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार, ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. त्यामुळे ३०६ नाही तर ३०२ चा गुन्हा दाखल होणं गरजेच आहे. वडील सिक्युरीटी गार्ड आहेत, तर आई घरीच असते. तिला दोन लहान भाऊ आहेत.
पिडीत तरुणीने नुकतेच १२वी मध्ये ७१ टक्के गुण मिळवले होते. या प्रकरणात सात तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. त्यापैकी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. तर, दुसरीचा शोध सुरू आहे. पीडितेला वारंवार व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केले जात होते. त्यामुळे गॅंग रेप आयपीसी ३७६ D तसेच आयटी कायदा जो आता नविन शक्ती कायद्यात आलेला आयपीसी ३५४ F ही कलमे लावून पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा. अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
आत्महत्या झाली त्यावेळेस एका मुलीसह अन्य आरोपी तिच्या सोबतच होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, मुलीने आत्महत्या केली नसून, तिला ढकलून देऊन मारण्यात आले आहे. तिचे कुटुंबीय जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही. ८ दिवसांनी पीडितेच्या आई-वडिलांचा सविस्तर जबाब घेण्यात येणार आहे.
‘पीडितेच्या कुटुंबीयांना संरक्षण द्यावे’
दरम्यान, “या प्रकरणात बड्या घरच्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तिच्या आई-वडिलांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य कलम लावून पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना योग्य न्याय द्यावा. तसेच, पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना संरक्षण द्यावे,” अशी मागणीही चित्रा वाघ यांनी यावेळी केली.