फातिमा आणि ईशनिंदा

    15-Jun-2022   
Total Views |

mm
 
 
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या कथित ईशनिंदेच्या वक्तव्यावरुन भारताच्या विविध शहरांत मुस्लीम समुदाय आक्रमक होत रस्त्यावर उतरला. मुस्लीम देशांमधून याविषयी लगोलग विरोधी सूर उमटले. पाकिस्तानसारख्या देशाने, तर ‘भारतात मुस्लीम सुरक्षित नाहीत’ वगैरे नेहमीची री ओढली.
 
 
पण, केवळ भारतातच नाही, तर जगभरात या ईशनिंदेवरुन सध्या मोठा गदारोळ माजलेला दिसतो. आता ही परिस्थिती केवळ अमेरिका, युरोप वा अन्य ख्रिश्चनबहुल देशांमध्येच निर्माण झाली, असे कदापि नाही, तर अनेक इस्लामिक देशांमध्येही ईशनिंदेच्या नावाखाली कित्येकांना मृत्यूदंडाची शिक्षाही झाली. पण, याविषयी शांतीचा संदेश देणारा धर्म आपल्याच इस्लामिक कायद्यांमध्ये बदल करण्यास कदापि तयार नाही, हेच विदारक सत्य. पण, युकेमध्येही आता एका चित्रपटावरुन पुन्हा एकदा ईशनिंदेचा प्रकार चर्चेत आला आहे. परंतु, यातील आश्चर्यजनक बाब म्हणजे, यंदा युकेमध्ये प्रदर्शित एका चित्रपटात केलेली ईशनिंदा प्रेषित मोहम्मदांची नव्हे, तर त्यांची कन्या फातिमा यांची असल्याचा दावा करण्यात आला. तसेच, याच प्रकरणाशी निगडित दुसरी बाजू म्हणजे, युकेमध्ये इस्लामोफोबिया रोखण्यासाठी सरकारने नेमलेल्याच एका इमामाने या चित्रपटाविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्याने युके सरकारने त्या इमामाला पदच्युत केले आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन पुन्हा एकदा ईशनिंदा, इस्लामोफोबिया आणि शिया-सुन्नी वाद यांसारखे विषय चव्हाट्यावर आले असून, युकेमध्ये प्रामुख्याने केंद्रस्थानी आलेले दिसतात.
 
 
‘लेडी ऑफ हेवन’ हा प्रेषित मोहम्मद यांची कन्या फातिमा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट. हा चित्रपट कोणी ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध नव्हे, तर इराणच्याच एका मुस्लीम लेखकाने लिहिलेला. आता इराणचा मुस्लीम म्हणजे साहजिकच शिया. त्याचे नाव शेख असिर अल हबिब. तो स्वत:ही धर्मगुरु आणि इस्लामचा गाढा अभ्यासक. हा चित्रपट ‘लेडी फातिमा’ची कथा आणि खासकरुन त्यांची हत्या याविषयी भाष्य करतो. तो प्रसंग कसा पहिलावहिला दहशतवादी प्रकार होता, अशी साधारणपणे पटकथा. त्यातही प्रेषितांवर यापूर्वी चित्रपटही आले, पण फातिमा यांचे जीवनचरित्र मोठ्या पडद्यावर आणणारा हा पहिलाच प्रयोग मानला जातो. चित्रपट जरी प्रेषितांच्या कन्येवर असला तरी मुसलमानांच्या भावनांचा विचार करता प्रेषितांची भूमिका कुणीही न निभावता स्पेशल इफेक्ट्स, विजांचा झगमगाट वगैरेचा ‘सिम्बॉलिक’ वापर चित्रपटात करण्यात आला. परंतु, फातिमाच्या केलेल्या चित्रणावरुन शिया आणि सुन्नींमध्ये मतभेद असल्यामुळेच यावरही ईशनिंदेचा ठपका ठेवण्यात आला. एवढेच नाही, तर युकेमध्ये ज्या ज्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट झळकणार होता, तिथेही खासकरुन सुन्नी मुसलमानांकडून विरोध प्रदर्शने करण्यात आली.
 
 
आता या सगळ्या प्रकरणाची युके सरकारनेही गंभीर दखल घेतली. त्यातच ‘इस्लामोफोबिया’सारख्या विषयावर युके सरकारला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी होती, लीड्स शहराचे इमाम कारी असीम यांच्यावर. परंतु, या प्रकरणी युके सरकारचे प्रतिनिधी म्हणून मार्ग काढण्यापेक्षा या इमामांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिळविण्यातच धन्यता मानली. मग काय, संतापलेल्या युके सरकारने या इमामांनाच घरचा रस्ता दाखवला.
 
 
त्यामुळे दि. ३ जून रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट युकेमधील काही कट्टरतावाद्यांच्या निषेधामुळे बहुतांश चित्रपटगृहांतून हटविण्यात आला. एवढेच नाही, तर हा चित्रपट इस्लामविरोधी आणि ईशनिंदेला कारक ठरणारा आहे, म्हणून ऑनलाईन सह्यांची मोहीम राबवूनही विरोध नोंदवण्यात आला. पण, हेच सगळे विरोधप्रदर्शन रोखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे युके सरकारने इमाम आरीलाच फैलावर घेत हाकलून लावले.
 
 
त्यामुळे ईशनिंदेचा आपल्या सोयीने अर्थ लावणे, त्यातही शिया-सुन्नी मतभेदांना खतपाणी घालणे यांसारखे प्रकार यानिमित्ताने चव्हाट्यावर आले. एका मुसलमानानेच तयार केलेला प्रेषितांच्या कन्येविषयीचा साधा चित्रपटही सहन होऊ नये, अशी ही असहिष्णू मानसिकता निश्चितच खेदजनक म्हणावी लागेल. तसेच, इस्लाम, प्रेषितांविषयीचे चित्रण किंवा अनुद्गार या समाजाला इतके झोंबतात. पण, मंदिरांची, देवीदेवतांची, बायबलची, बुद्ध मूर्तींची केलेली विटंबना ही यांच्यालेखी अद्याप ईशनिंदा नाहीच?
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची