पुन्हा ‘ऐलान-ए-जंग?’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2022   
Total Views |

taliban
 
 
 
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या इस्लामी राजवटीस प्रारंभ झाला आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये दीर्घकाळ तळ ठोकला. हजारो कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांचा वापर अमेरिकेद्वारे करण्यात आला. मात्र, तरीदेखील तालिबानचा निर्णायक सफाया करणे त्यांना साध्य झाले नाही. अखेरीस अमेरिकेला अतिशय अपमानास्पदरित्या अफगाणिस्तान सोडावे लागले. त्यानंतर तालिबानने तेथे आपल्या राजवटीस प्रारंभ केला. त्यामुळे केवळ अफगाणिस्तानच नव्हे, तर जगभरातून चिंतेचा सूर सुरू झाला. कारण, अतिशय हिंसक अशा तालिबानच्या हाती अफगाणिस्तान येणे हे आशिया खंडासह जगासाठीही धोकादायक आहे. मात्र, आता तालिबानची राजवट कुठे स्थिरावताना दिसत असतानाचा पुन्हा तेथे ईदनंतर ‘ऐलान-ए -जंग’ होताना दिसत आहे.
 
 
अफगाण लष्कराचे माजी लेफ्टनंट जनरल सामी सादत म्हणाले की, “तालिबानच्या आठ महिन्यांच्या राजवटीत अफगाणिस्तानातील अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, लष्करी कारवाई हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. अफगाणिस्तानची तालिबानपासून मुक्तता व्हावी आणि देशात लोकशाही व्यवस्था पुन्हा प्रस्थापित व्हावी, यासाठी ते आणि त्यांना पाठिंबा देणारे सैनिक प्रयत्न करतील,” असे त्यांनी सांगितले आहे. माजी जनरल असेही म्हणाले की, “अफगाणिस्तान तालिबानपासून मुक्त व्हावे आणि लोकशाही व्यवस्था पुन्हा प्रस्थापित होईल, याची खात्री करण्यासाठी ते आणि इतर त्यांना शक्य तोपर्यंत लढत राहणार आहेत.”
 
गेल्या आठ महिन्यांच्या सत्ताकाळात देशातील नागरिकांनी तालिबानी राजवटीचे अत्याचार पाहिल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, “तालिबान राजवट म्हणजे धार्मिक निर्बंध, कुराणाचा चुकीचा अर्थ लावणे आणि पवित्र कुराणाचा राजकीय हेतूने दुरुपयोग करणे हे समीकरण झाले आहे. दररोज तालिबान लोकांवर अत्याचार होत आहेत. देशातील नागरिक एकाएकी नाहीसे होत आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर अन्नटंचाई वाढली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर कुपोषणाची समस्या वाढताना दिसत आहे. अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक ती इच्छाशक्ती आणि यंत्रणा तालिबानकडे नाही. त्यामुळे देशातील जनता आता मोठ्या प्रमाणावर अन्य देशांमध्ये स्थलांतर करताना दिसत आहे.” मात्र, यामुळे अफगाणिस्तानमधील अनागोंदी अधिकच वाढत असल्याचेही सादत यांनी म्हटले आहे.
 
 
एकीकडे देशात गृहयुद्धाची अतिशय स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. ईदनंतर पुन्हा एकदा तालिबानला अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. त्याचवेळी पाकिस्तानदेखील या स्थितीचा फायदा घेण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण, अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आल्यानंतर त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे नाचविता येईल, असा पाकचा समज होता. मात्र, तालिबानने सध्या पाकला पूर्णपणे बाजूला टाकले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तालिबानवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी पाकिस्तान सातत्याने कारवाया करीत आहे.
 
गेल्या काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानात तीन वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. पहिला स्फोट उत्तर मजार-ए-शरीफ येथील डोकान मशिदीत झाला, ज्यात ३० जण ठार आणि ४० जखमी झाले. यानंतर, दुसरा स्फोट काबूलच्या दश्त-ए-बरची भागात रस्त्याच्या कडेला झाला, ज्यामध्ये दोन निष्पाप मुले गंभीर जखमी झाली. त्यानंतर कुंदुझ प्रांतात तिसरा स्फोट झाला, ज्यात वाहनाला लक्ष्य करण्यात आले. याशिवाय, उत्तर कुंदुझ प्रांतातील इमाम साहिब जिल्ह्यातील मौलवी सिकंदर मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला. या धोकादायक बॉम्बस्फोटात ३० हून अधिक लोक ठार झाल्याची माहिती आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटांमागे पाकिस्तान असल्याचा तालिबानचा संशय आहे. त्यातच ‘ड्युरंड लाईन’ सीमारेषेचाही प्रश्न दोन्ही देशांमध्ये संघर्षाचा आणखी एक मुद्दा आहे. ‘ड्युरंड’ सीमारेषेवर पाकिस्तान मोठ्या प्रमाणात आक्रमक हालचाली करताना दिसत आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी पाकिस्तानने आपली लढाऊ विमानेही त्या भागात तैनात केली आहेत. त्यामुळे तालिबाननेही सीमारेषेवर आता हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देणारी यंत्रण तैनात करण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा गृहयुद्ध सुरू झाल्यास आशिया खंडाचा धोका अधिकच वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@