कझाकस्तानचे कझाकीकरण आणि नूरसुलतान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 

Kazakhstan
 
 
आपल्या देशात आपणच अल्पसंख्य आहोत. रशियन भाषिक जास्त आहेत. तेव्हा परत या. तुमची नोकरी-व्यवसाय-निवास सगळी व्यवस्था आम्ही करू. व्लादिमीर पुतीन आणि नझरबायेव्ह यांचे संबंध चांगले होते. पुतीनना हे आवाहन फारसं पसंत पडलं नाही. पण, नझरबायेव्हनी त्यांच्या पसंती-नापसंतीची पर्वा न करता आपली ऑफर खुलीच ठेवली.
 
 
 
गेल्या दोन-अडीच हजार वर्षांच्या कालखंडात आपल्या भारत देशावर जी आक्रमणं झाली, ती मुख्यतः वायव्य दिशेकडून झाली. ते पाहा, भारताच्या वायव्य सीमेलगतचेच दोन देश-पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. अवघ्या काही शतकांपूर्वी ते दोन्ही देश आमचेच होते. पण, परकीय आक्रमणांमुळे आज ते आम्हाला दुरावलेत. अफगाणिस्तानच्याही पलीकडे ते पाहा.तुर्कमेनिस्तान, ताजिकीस्तान, किरगिजस्तान, उझबेकिस्तान आणि कझाकस्तान हे तुर्कवंशीय देश आणि मग कझाकस्तानच्या उत्तरेला अफाट पसरलेला अवाढव्य देश रशिया. भारताच्या आजच्या ज्ञात इतिहासानुसार, भारतावर झालेली पहिली परकीय स्वारी म्हणजे मॅकेडोनियाचा राजा अलेक्झांडर याची.इसवी सन पूर्व सुमारे तिसर्‍या शतकात ही स्वारी झाली. जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडरची पंजाब प्रातांत पोहोचेपर्यंत इतकी दमछाक झाली की, तो सिंधू नदी वरूनच परत फिरला. मग इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकापर्यंत भारतावर शक, कुशाण आणि हूण यांच्या स्वार्‍या झाल्या. हे शक, कुशाण आणि हूण लोक साधारणपणे या कझाकस्तान-ताजिकीस्तान अशा प्रदेशांमधले होते. आज यांना ‘मध्य आशियाई देश’ म्हणतात. काही काळ या आक्रमकांनी भारतीय राजांना हैराण करून सोडत मोठमोठे प्रदेश जिंकले. शकांनी तर संपूर्ण उत्तर भारत पादाक्रांत करीत, नर्मदा ओलांडून गुजरातमार्गे महाराष्ट्रातला मोठा भाग जिंकला. जुन्नर आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरांवर त्यांचा अंमल बसला. पण, भारतीय राजे सावरले आणि समुद्रगुप्त, यशोधर्मा, शालिवाहन इत्यादी वीरांनी शक-कुशाण-हूण यांचं आव्हान संपवलं. काही शतकं भारतात राहिल्यामुळे या आक्रमकांच्या नव्या पिढीला भारत देशच आपला वाटू लागला होता. त्यामुळे ते आपल्या मूळ देशात परत न जाता इथेच राहिले. सर्वसमावेशक, व्यापक आणि उदार हिंदू संस्कृतीने त्यांना सहजपणे पचवून टाकलं. आज शक, कुशाण, हूण यांचा आपल्या देशात कसलाही मागमूस नाही. सगळे हिंदू आहेत. याला म्हणतात, ‘आत्मसातीकरण.’
 
 
 
चितोडचा राजा रत्नासिंह रावळ हा अल्लाउद्दिन खिलजीशी लढताना ठार झाला. त्याचा अतिशय विश्वासू आणि शूर सरदार राण लक्ष्मणसिंह शिसोदिया हा आपल्या सात पुत्रांसह लढत होता. राणा लक्ष्मणसिंह आणि त्याचे सहा पुत्र त्या भीषण रणकंदनात ठार झाले. सातवा, सर्वात धाकटा पुत्र अभयसिंह हा जबर जखमी झाला, पण बचावला. ही घटना इसवी सन १३०३ सालची. राणा अभयसिंहाचे वंशज राजपुतान्यातून महाराष्ट्रात आले. इतिहासाच्या कोणत्या वळणावर या शिसोदिया कुटुंबाने भोसले हे आडनाव घेतलं, हे मात्र ज्ञात नाही. वेरुळ गावच्या परिसरात राहणार्‍या मालोजी भोसल्यांना निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने ‘सरदारकी’ आणि ‘राजे’ हा किताब दिला. पुढचा इतिहास हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी सुवर्णाक्षरातला इतिहास आहे. मूळ राजस्थानी शिसोदियांनी महाराष्ट्राची संस्कृती, भाषा, राहणी सहज आत्मसात केली. इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबांनी इराणवर आक्रमण केलं. पुढची चार-पाचशे वर्ष अग्निपूजक झरतुष्ट्र संप्रदायी इराण्यांनी आपला धर्म आणि संस्कृती वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण, अखेरीस त्यांचा पूर्ण पराभव झाला. तेव्हा जहाजातून पश्चिम समुद्र ओलांडून हे अग्निपूजक पारशी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातमध्ये उदवाडा इथे आले. गुजरातचा हिंदू राजा ‘जादव राणा’ याने त्यांना आपल्या राज्यात उदार आश्रय दिला. बघता बघता पारशांनी भारतीय संस्कृती, आपला वेगळेपणा राखून आत्मसात केली. जमशेटजी टाटा, जमशेटजी जिजिमॉय, जे. आर. डी. टाटा, फ्लिडमार्शल माणेकशाँ, रतन टाटा अशा नररत्नांना कोण अ-भारतीय म्हणेल?
 
 
 
डेव्हिड बेन गुरियान हे मूळचे पोलिश ज्यू. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर 1919 सालच्या व्हर्सायच्या तहानुसार पॅलेस्टाईनचा ताबा तुर्कस्तानकडून ब्रिटिशांकडे आला. पॅलेस्टाईनच्या प्रदेशात प्रत्यक्ष राहणारे लोक होते मुसलमान अरब. बेन गुरियान आणि अन्य ज्यू नेते मोठ्या हिकमतीने पॅलेस्टाईनमध्ये आले. तब्बल १८०० वर्षांपूर्वी रोमन लोकांनी ज्यूंना पॅलेस्टाईनमधून म्हणजेच त्यांच्या मूळ भूमीतून हद्दपार केलं होतं. आता ती मूळ मायभूमी परत मिळवण्याची संधी आली होती. बेन गुरियाननी जगभरच्या ज्यू लोकांना आवाहन केलं - आपल्या मूळ भूमीत परत या. हे परत येणं सोपं नव्हतं. ब्रिटिश अधिकारी आणि स्थानिक अरब दोघांनाही ज्यू नको होते. बेन गुरियाननी चक्क मानवी तस्करी -ह्यूमन ट्रॅफिकिंगचा मार्ग स्वीकारला. चोरून. जहाजं भरभरून ज्यू कुटुंब पॅलेस्टाईनमध्ये येऊ लागली. जगभरच्या वेगवेगळ्या देशांतून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे ज्यू आले. बेन गुरियाननी सर्वांची एक भाषा ठरवली- हिब्रू! बघता-बघता लोकांनी ती भाषा आत्मसात केली नि १९४८ साली सगळ्या अरबांच्या नाकावर टिच्चून हिब्रू भाषी ज्यू धर्मीय इस्रायल राष्ट्र उभं राहिलं. इसवी सनाच्या सातव्या शतकातच पर्शिया उर्फ इराणच्या पारशी ससानियन साम्राज्याचा चुराडा उडवून अरब मुसलमान आक्रमक मध्य आशियावर धडकले. आजचे हे सगळे मध्य आशियाई देश तेव्हा विविध छोट्या-मोठ्या राज्यांमध्ये विभागलेले होते.ते सगळे वंशाने तुर्क होते आणि चीनच्या तँग सम्राटाचे अंकित होते. अरबांची या तुर्क राज्यांशी वेगवेगळी युद्धं झालीच. शिवाय इ.स. ७५१ या वर्षी तलास या ठिकाणी तँग सम्राटाशी निर्णायक युद्ध झालं. ते अरबांनी जिंकलं. तोपर्यंत ही सगळी राज्यं धर्माने बौद्ध होती. कारण, चिनी सम्राटाचा धर्म बौद्ध होता.जो राजाचा धर्म, तो प्रजेचा धर्म. या तुर्क वंशीय राज्यांच्या प्रमुखांना म्हणायचे ‘खान’ आणि त्यांच्या राज्यांना म्हणायचे ‘खानेट’ किंवा खाग्नेट.’ आता अरबांनी या सगळ्या खानांना जिंकलं आणि इस्लामची दीक्षा दिली.तेव्हापासून तुर्क हे अरबांचे गुलाम झाले आणि इस्लामध्ये ‘खान’ हा शब्द आला.
 
 
 
पुढे मध्य आशियातल्या या नव-मुसलमान तुर्क टोळ्या अरब मालकांसह मुलुखगिरीला बाहेर पडल्या. अनेक जण किंवा अनेक टोळ्या अनातोलिया या ग्रीसपासून जवळ असणार्‍या भूप्रदेशात स्थायिक होत गेल्या. पुढच्या काळात तुर्क हे अरबांना वरचढ झाले आणि त्यांनी खलिफा हे सर्वोच्च पद अरबांकडून हिसकावून स्वत:कडे घेतलं. खलिफाचं केंद्र अरबस्तानातल्या बगदादहून अनातोलियामधल्या कॉस्टन्टिनोपल उर्फ इस्तंबूल शहरात आलं. मात्र, पराभूत झालेल्या इराणची पर्शियन किंवा फारसी ही भाषा, अरबी किंवा तुर्कीपेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे मुसलमानांनी तिच आपली भाषा म्हणून स्वीकारली. राज्यकर्त्यांनी पराभूतांची भाषा आपली म्हणून आत्मसात केल्याचं हे विरळा उदाहरण. म्हणून बाबरापासून औरंगजेबापर्यंत आणि पुढेही साधारण अब्दालीच्या स्वारीपर्यंत मुघल साम्राज्याची अधिकृत भाषा फारसी होती. अहमदशहा अब्दाली हा अफगाण होता. त्याच्या सैन्यातले बरेचसे लोक पुढे दिल्ली आणि परिसरातच कायमचे स्थायिक झाले. पुढच्या काळातही तुर्कस्तान किंवा इराणपेक्षा अफगाणिस्तानातून सतत लष्करी पेशाचे लोक मुघल राज्यात येत राहिले. याचा परिणाम भाषेवर झाला. अरबी, तुर्की, पश्तुनी आणि हिंदी यांच्या मिलाफातून उर्दू ही भाषा प्रचलित झाली आणि ती एवढी लोकप्रिय ठरली की, १८३७ साली ‘ईस्ट इंडिया’ कंपनीने भारतातली आपली अधिकृत कारभाराची भाषा आता फारसी नव्हे, तर उर्दू असेल असं घोषित केलं. शेवटचा मुघल बादशहा बहादूरशहा जफर याची अधिकृत राज्यभाषा उर्दू होती.
 
 
 
आता या सगळ्या पार्श्वभूमीवर कझाकस्तानकडे पाहूया. १९९१ साली सोव्हिएत रशिया कोसळल्यावर कझाकस्तान हा कझाक भाषा बोलणार्‍या लोकांचा देश स्वतंत्र झाला. त्यातले बहुसंख्य लोक धर्माने मुसलमान असले, तरी आपला देश निधर्मी लोकशाही देश असेल, असं राष्ट्राध्यक्ष नूरसुलतान नझरबायेव्ह यांनी घोषित केलं. हे ठीकच झालं. पण, ज्या कझाक भाषेवरून देशाचं नाव कझाकस्तान, ती भाषा बोलणारे लोक किती आहेत? तर फक्त ३८ टक्के आणि ४० टक्के लोक रशियन भाषा बोलणारे. बाकी मग आजूबाजूच्या देशातले ताजिक, किरगिझ आणि मांदारिन बोलणारे चिनीसुद्धा. असं का बरं झालं? त्याचं मुख्य कारण स्टॅलिन, सोव्हिएत रशियातल्या प्रत्येक प्रजासत्ताकात म्हणजेच प्रांतात, स्टॅलिनने योजनापूर्वक रशियन भाषिक लोक आणून वसवले. म्हणजे या प्रातांनी बंड-बिंड केलं, तर आपल्याशी निष्ठा ठेवणारे रशियन भाषिक तिथे हवेत, हा हेतू.
 
 
 
नूरसुलतान नझरबायेव्ह काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते.ते स्टॅलिन आणि ब्रेझनेव्हच्या तालमीतच राजकारण शिकलेले होते. त्यांनी जुन्या सोव्हिएत साम्राज्यातल्या सर्व देशांमधल्या आणि जगभरातल्या सर्व कझाक भाषी लोकांना जाहीर आवाहन केलं की, आपल्या देशात आपणच अल्पसंख्य आहोत. रशियन भाषिक जास्त आहेत. तेव्हा परत या. तुमची नोकरी-व्यवसाय-निवास सगळी व्यवस्था आम्ही करू. व्लादिमीर पुतीन आणि नझरबायेव्ह यांचे संबंध चांगले होते. पुतीनना हे आवाहन फारसं पसंत पडलं नाही. पण, नझरबायेव्हनी त्यांच्या पसंती-नापसंतीची पर्वा न करता आपली ऑफर खुलीच ठेवली. नझरबायेव्हना हे जमलं, याची जमेची बाजू म्हणजे त्यांच्या देशाचा अफाट भूभाग आणि अगदीच अल्प लोकसंख्या. आपल्याला हसू येईल. कझाकस्तानचं क्षेत्रफळ आहे २७ लक्ष २४ हजार ९०० चौ.किमी आणि लोकसंख्या आहे १ कोटी, ९० लक्ष, ८२ हजार. आपल्याकडे आपल्या एकट्या मुंबई शहराचं क्षेत्रफळ आहे ६०३.४ चौ. किमी आणि ‘युनो’च्या २०१८ च्या अंदाजानुसार लोकसंख्या अंदाजे दोन कोटी आहे. आपल्या एकट्या मुंबईपेक्षाअख्ख्या कझाकस्तानची लोकसंख्या कमी आहे आणि असा हा देश तेल आणि नैसर्गिक वायू या मौल्यवान संपत्तीने अगदी समृद्ध आहे. परिणामी, नझरबायेव्ह यांच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळून तिथली कझाक भाषिक टक्केवारी आता ७० टक्के झाली आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@