धुमसता पाकिस्तान...

    28-May-2022   
Total Views | 46
 
 
pk
 
 
 
पाकिस्तान भयंकराच्या उंबरठ्यावर नव्हे, तर दरीतच कोसळल्यासारखे झाले आहे. अर्थात, करावे तसे भरावे. भारताविरोधात स्वतःचे नाक कापून अपशकुन करणारा हा देश. जन्मापासूनच भारताविरोधात कटकारस्थानांमध्ये इतका गुंतला की,त्या गुंत्यात तो स्वतःच अडकला. या पाकिस्तानला कधीही राजकीय आणि आर्थिक स्थैर्य लाभलेच नाही. आता तर काय, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे सर्वेसर्वाइमरान खान यांनी पाकिस्तानमध्ये ‘आझादी मोर्चा’च काढला होता. ‘हमे चाहिये आझादी’चे राक्षस भारतात काश्मीरमध्ये हैदोस घालताना सगळ्यांनी पाहिले. त्यांच्या खोट्या ‘आझादी’चे मूळ आणि कुळ पाकिस्तानशी जोडलेले होते, हेसुद्धा वेळोवेळी सिद्ध झाले होतेच. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशद्रोह्यांना खर्‍या अर्थाने ‘आझादी’ देण्यासाठी कंबर कसली. त्यामुळे काश्मीरमध्येच काय, देशभरात देश तोडणारे लोक भपंक ‘आझादी’चे नारे देताना दिसत नाहीत. मात्र, कर्म वर्तुळासारखे परत परत येते, या न्यायाने पाकिस्तान आता ‘आझादी’च्या नार्‍यांनी पेटला आहे. इतका की, ‘आझादी’ मोर्च्यात पाकिस्तान्यांनी त्यांच्या देशाच्या राजधानीचे इस्लामाबाद मेट्रो स्टेशनही पेटवून दिले. यावर कडी म्हणजे, पाकिस्तानच्या शाहबाज शरीफच्या सरकारचे म्हणणे होते की, इमरान समर्थक सर्वोच्च न्यायालय, संसद भवन, पंतप्रधान निवास, राष्ट्रपती निवास आणि पाकिस्तान सचिवालयावरही हल्ला करतील. याचाच अर्थ सत्ता काबीज करण्यासाठी पाकिस्तानमध्ये कुणीही काहीही करू शकतो. कारण, देश, देश कल्याण आणि निष्ठा वगैरे शब्द हे पाकिस्तान्यांच्याा शब्दकोशातच नाही.
 
 
 
हा ‘आझादी मोर्चा’, हे इस्लामाबादचे मेट्रो स्टेशन जाळणे आणि पाकिस्तानभर सुरू असलेला हिंसाचार... त्यातच बलुचिस्तान आणि सिंधदेशवासीयांची पाकिस्तानपासून वेगळे होऊन नवीन देश निर्माण करण्याची मागणी. या सगळ्या पाश्वर्र्भूमीवर ‘आझादी मोर्चा’मध्ये इमरान खान काय म्हणाले? इमरान म्हणाले, ”भारतात २० कोटी मुस्लीम राहतात. त्यांनी ज्या असली पाकिस्तानसाठी मतदान केले होते, त्या असली पाकिस्तानचे स्वप्न मी पूर्ण करतो आहे,” तर इमरान यांचे म्हणणे ऐकून वाटते की, पाकिस्तानचे नेते आता स्थळकाळापलीकडे गेले आहेत, इतकी त्यांची वाईट परिस्थिती झाली आहे. १९४७ साली भारताच्या विभाजनाच्या वेळेस आताचे २० कोटी भारतीय मुस्लीम होते का? तेव्हा ज्यांना कुणाला पाकिस्तान पाहिजे होता, ते पाकिस्तानमध्ये गेले. उर्वरित भारतात राहिले. (भारताच्या प्रेमाखातर राहिले का? हे मला माहिती नाही!) त्यानंतर पाकिस्तानने नेहमीच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय मुसलमानांच्या परिस्थितीबाबत खोटेनाटे अहवाल तयार करण्याचा रतीबच घातला.पण, भारत एकसंघच राहिला. भारताला तोडण्याचे स्वप्न पाकिस्तानच्या स्वप्नातही पाकिस्तानला शक्य झाले नाही. तर असा हा भरकटलेला पाकिस्तान आणि त्याचे भरकटलेले नेता इमरान याला भारतातराहणारे सगळेच मुस्लीम पाकिस्तानचे स्वप्न पाहत असावेत का वाटते?
 
 
 
बरं पाकिस्तानमध्ये महागाई, बेरोजगारी इतकी वाढली की, या देशात आसरा घेतलेले इतर देशातील मुस्लीम शरणार्थींनी मोर्चा काढला की, आम्ही मरायला तयार आहोत. पण, आम्हाला या पाकिस्तानात राहायचे नाही. इतकेच काय, या पाकिस्तानचेच नागरिक देशाची साधनसंपत्ती जाळतात, उठसूठ हिंसा करतात, बॉम्बस्फोट करतात. त्या पाकिस्तानला भारतातले २० कोटी मुसलमान आपला आदर्श मानतात,असे इमरान खान यांना का वाटते? असो. इमरान ज्यावेळी भारतातल्या २० कोटी मुस्लिमांच्या पाकिस्तानी स्वप्नाबद्दल बोलत होते, त्याचवेळी जम्मू-काश्मीर दलातील जवानाने श्रीनगरकडे जाणार्‍या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात त्या जवानाला विरमरण आले. जवानाच्या मृत्यूची बातमी समजताच जवानाचे शूरपिता म्हणाले की, ”मला माझ्या मुलाचा अभिमान आहे.” विरमरण प्राप्त झालेले जवान होते मुद्दसीर आणि त्यांचे शूरपिता मकसुद अहमद. दोघेही भारतीय मुसलमान आहेत. मुद्दसीर भारताच्या एकतेसाठी, सुरक्षिततेसाठी मृत्यूला कवटाळायला तयार झाले. अर्थात, इमरान खान आणि पाकिस्तान या घटनेला महत्त्व देणार नाहीत. बदलत्या समर्थ भारतातफुटीरतेची बीजे उरात बाळगून जगणे मुश्किल आहे, हे बहुतेकांना कळले आहे. या बदलत्या समर्थ भारताबद्दल शक्तीहीन दुर्बल पाकिस्तान कोणत्या तोंडाने बोलणार?
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121