सन्मान बांबूसेवकांचा

    06-Apr-2022   
Total Views |

koshyari
 
 
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते भालिवलीच्या ‘सेवा विवेक’च्या प्रांगणात बांबूसेवकांचा सत्कार दि. ३ एप्रिल रोजी संपन्न झाला. राज्यपालांची या प्रकल्पाला ही दुसरी भेट होती. कोरोनाचा प्रकोप सुरू होण्यापूर्वी राज्यपालांनी या प्रकल्पाला भेट दिली होती. त्यावेळची भेट प्रकल्पातील सर्व कार्यकर्त्यांना आणि वनवासी भगिनींना प्रचंड ऊर्जा देणारी ठरली. यावेळची भेटदेखील ऐतिहासिक म्हणावी लागेल. ही भेट ऐतिहासिक एवढ्यासाठी म्हणावी लागते की, यावेळी जवळजवळ ५९ बांबूसेवकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार झाला.
 
 
भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते भालिवलीच्या ‘सेवा विवेक’च्या प्रांगणात बांबूसेवकांचा सत्कार ३ एप्रिल रोजी संपन्न झाला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून हे बांबूसेेवक आले होते. सर्वप्रथम ‘बांबूसेवक’ म्हणजे काय, हे स्पष्ट करायला पाहिजे. या प्रकल्पातील हे काम वनवासी भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आहे. त्यांच्या दारिद्—याच्या, कुपोषणाच्या, उपासमारीच्या बातम्या शोधून शोधून देण्यात काहीजणांना आसुरी आनंद होत असतो. त्यावर मग वृत्तपत्रीय लेखांचा मारा होतो. सरकार काय करतं, यावर ताशेरे झाडले जातात आणि खूप मोठं समाजजागृतीचं काम केलं, असं मानून प्रसारमाध्यमे आणि बातम्या शोधणारे पत्रकार धन्यता मानून झोपी जातात.
 
 
प्रश्न झोपण्याचा नसून नित्य जागृतीचा आहे. प्रश्न सरकार काय करतं, याचा नसून आम्ही काय करतो, याचा आहे. हाच फरक भालिवलीचा प्रकल्प आणि समाजाच्या दु:खाचा बाजार मांडणारे यांच्यात आहे. कुपोषण का होतं, गरिबी का निर्माण होते, शोषण का होतं, या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे, वनवासी भागात रोजगार उपलब्ध होत नाहीत आणि रोजगार नसल्यामुळे पैशांची आवक नाही. पैशांची आवक नसल्यामुळे बाजारात जाऊन वस्तू खरेदी करण्याची क्षमता नाही. बाजारात धान्य मुबलक आहेत, जीवनावश्यक वस्तू मुबलक आहेत, पण तो घेण्यासाठी पैसा नाही.
 
 
प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी विचार केला की, वनवासी भगिनींना हा पैसा कसा उपलब्ध करून देता येईल. पैसा उपलब्ध करुन देण्याचे दोन मार्ग. पहिला मार्ग पैशांचे वाटप करणे आणि दुसरा मार्ग पैसा मिळविण्याची क्षमता निर्माण करणे. पहिला मार्ग लाचार बनविणारा आहे, आणि त्याच्या मर्यादा आहेत. दुसरा मार्ग आत्मसन्मान वाढविणारा, सक्षम करणारा मार्ग आहे. हा मार्ग थोडा अवघड जरी असला, तरी कायमस्वरुपाचे यश देणारा आणि मूल्यवर्धन करणारा आहे. रोजगार कसा उपलब्ध करुन देता येईल, याचे काही प्रयोग भालिवलीमध्ये झाले आणि त्यातून कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होत गेले. लुकेश बंड आणि प्रगती भोईर हे दोन प्रमुख कार्यकर्ते या प्रयोगांतून खूप शिकत गेले आणि मग त्यांना बांबू नावाचा कल्पवृक्ष सापडला. बांबूची बेटं आपण सर्व ठिकाणी बघत असतो. या बांबूचे सामर्थ्य दारिद्य्र मिटविण्याचे आणि आर्थिक विकास घडविण्याचे आहे. हे मेळघाट येथे प्रकल्प चालविणार्‍या सुनील देशपांडे यांच्या कामामुळे लक्षात आले. बांबूसाठी आपले आयुष्य समर्पित केलेला कार्यकर्ता म्हणजे सुनील देशपांडे. त्यांच्याविषयी जेवढे लिहावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या महान कार्याची ओळख करून देणारे पुस्तक यथावकाश प्रकाशित होईलच.
 
 
‘विवेक प्रकाशना’तर्फे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘परिसांचा संग’ या पुस्तकात सुनील देशपांडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेणारा लेख आहे. सुनीलजी भालिवलीत आले आणि त्यांनी बांबूच्या वस्तूंचे बीजारोपण केले. बांबूकामात एकूण चार गावांमधील सात वस्ती-पाड्यातील ७० तेे ९० महिला काम करतात. घरातील फर्निचर बनविण्यापासून ते घर सुशोभीकरणासाठी अनेक लहान-मोठ्या वस्तूंची निर्मिती करतात. तसेच मोठ्या प्रमाणात बांबूपासून बनविल्या जाणार्‍या आणि प्रचंड मागणीस उतरणार्‍या बांबूपासून राख्या तयार केल्या जात आहेत. तसेच दिवाळीसाठी आकाशकंदिलांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे १०-१५ प्रकारच्या कंदिलांची निर्मिती केली जात आहे आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. तसं पाहिलं तर वस्तू बनविणे त्यामानाने सोपी गोष्ट आहे. त्यासाठी साधरण ४० दिवसांचं प्रशिक्षण द्यावं लागत. बांबू कसा तासायचा, त्याच्या बारीक पट्ट्या कशा बनवायच्या. जी वस्तू बनवायची, त्यासाठी कशा पट्ट्या बनवायच्या, असे सर्व प्रशिक्षण दिले जाते आणि प्रत्येक स्त्रीच्या अंगी ईश्वराने कलागुण दिलेले असतात. त्यामुळे स्त्री या सर्व गोष्टी फार लवकर शिकते. तिच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो.
 
 

koshyarih
 
 
पण बनविलेल्या वस्तू विकायच्या कशा, विकत घेणार्‍या व्यक्तीपर्यंत या वस्तू कशा घेऊन जायच्या, त्याचं व्यापारीकरण केलं, तर व्यापारी आपल्याकडून दहा रुपयांत वस्तू घेईल आणि १००रुपयांत वस्तू विकेल. ते करायचं नाही, असं केलं तर व्यापार्‍यांचं पोट भरण्यासाठी, त्यांना श्रीमंत करण्यासाठी आपण प्रकल्प चालू केला, असे होईल. म्हणून मग रक्षाबंधनांच्या बांबूच्या राखी, दिवाळीतील कंदील आणि इतर बांबूच्या इतर गृहोपयोगी वस्तू यांची विक्री करणारा हवा, पण दलाल नकोे. त्यासाठी अशी एक टीम उभी करणे आवश्यक होते.
 
 
प्रगती भोईर आणि लुकेश बंड यांनी तीन-चार वर्षांमध्ये नीट योजना करुन जवळजवळ १००-१२५ जणांची महाराष्ट्रव्यापी टीम उभी केली. आणि ही सर्व टीम सोशल मीडियाच्या माध्यमातून उभी राहिली, हे तिचे वैशिष्ट्ये. या टीमने समाजशक्ती काय असते, याचा परिचय करुन दिला. अगदी कोरोना काळातही लाखो रुपयांच्या वस्तूंची विक्री या मंडळींनी केली. त्यात कुणी कारखानदार आहेत, कुणी प्राध्यापक आहेत, कुणी हँडिक्राफ्ट वस्तू विकणारे दुकानदार आहेत, कुणी शिक्षक आहेत, कुणी छोट्या-मोठ्या सेवाभावी संस्था चालविणारे आहेत, हे सर्व ‘बांबूसेेवक.’सर्वांची समान वैशिष्ट्ये कोणती, तर प्रत्येकजण नि:स्वार्थ भावनेने काम करतो, कोणत्याही आर्थिक मोबदल्याची त्याची अपेक्षा नाही. एक अतिशय चांगले काम करतो, याचा त्याला आनंद आहे. राखी काय किंवा कंदील काय आणि अन्य गृहोपयोगी वस्तू काय, सर्व पर्यावरणपूरक वस्तू आहेत. त्यात प्लास्टिक नाही, केमिकल नाही, आणि प्रत्येक वस्तू हाताने बनविलेल्या आहेत, यंत्राचा वापर नाही. ‘हस्तकला’ हा शब्द आपण वाचतो, ऐकतो, भालिवली प्रकल्पात होणार्‍या वस्तू म्हणजे हस्तकलेचे प्रत्यक्ष रूप आहे. अशा सर्व वस्तू आनंदाने आपल्या मित्रपरिवारात, आपल्या संस्थेत, आपल्या निवासी संकुलात, विक्रीचे काम करणारे ‘बांबूसेवक’ आहेत. त्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते होतो.
 
 
भगतसिंह कोश्यारी हे दिलीप करंबेळकर यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘जनराज्यपाल’ आहेत. ते आता ऐंशीच्या उंबरठ्यावर आहेत. पण प्रवासाला निघाले की, एकेका दिवसात तीन-चार कार्यक्रम करुन येतात. सामाजिक राष्ट्रीय आशय असलेल्या कोणत्याही कार्यक्रमास ते नाही म्हणत नाहीत. एकेकाळी राजभवन ही दुरून बघण्याची गोष्ट होती. त्या राजभवनाचे दरवाजे त्यांनी सामान्य लोकांसाठी खुले केले. असे हे ‘जनराज्यपाल’ आहेत. राज्यपालांच्या हस्ते सत्कार, हा सत्कारमूर्तींंच्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण होता. मी मंचावर राज्यपालांच्या शेजारीच बसलो होतो, येणार्‍या सत्कारमूर्तींच्या चेहर्‍यावरील भाव पाहत होतो. प्रत्येकजण वाकून राज्यपालांचे चरणस्पर्श करू इच्छित होता आणि राज्यपाल त्याला थांबवित होते. वयस्कांचे चरणस्पर्श करणे ही आपली संस्कृती आहे. हे बांबूसेवक समाजातील सर्व स्तरांतील आहेत. ते आपल्या कृतीने, आपल्या संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडवीत होते. राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार, फोटो, असे एकामागून एक येत गेले. असा कार्यक्रम ‘सेवा विवेक’ने घडवून आणला, आम्हाला सन्मानित केले, याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. राज्यपालांनी आपल्या भाषणात सर्वांचे मन:पूर्वक कौतुक केले. “मी पहाडी प्रदेशातून आलेलो आहे. येथेही आजूबाजूला डोंगर बघून मला आनंद होतो. पण एक खंतही मनात येते की, डोंगरदर्‍यात राहणार्‍या आपल्या बांधवाच्या घरात अजून वीज गेलेली नाही. गाव-वस्तीपाड्यांपर्यंत रस्ते झाले नाहीत. मोबाईल असेल तर तिथे नेटवर्क नसतं. संपर्कापासून ही सर्व मंडळी शेकडो हात दूर असतात.”
 
 
पहिल्या रांगेत सर्व प्रशासकीय अधिकारी बसले होते. त्यांना उद्देशूनराज्यपाल म्हणाले की, “आपल्या योजना अनेक आहेत, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आपल्या देशबांधवांना सक्षम केले पाहिजे.” ‘सेवा विवेक’ प्रकल्पाचा उल्लेख करून ते म्हणाले की, “या प्रकल्पाची संकल्पना खूप चांगली आहे आणि रोजगार देण्याचा विस्तार अनेक गाव-पाड्यातून झाला पाहिजे. त्यासाठी जे काही सहकार्य लागेल, ते माझ्या क्षमतेत जेवढे आहे तेवढे मी जरूर करीन,” असे आश्वासनही त्यांनी दिले.
 
 
आपल्या प्रास्ताविकात दिलीप करंबेळकर यांनी ‘पार्क’तर्फे आपण त्रिपुरा सरकारला बांबूविषयी एक धोरण लिहून दिले आहे असे सांगितले. या प्रकल्पाचे काम मुग्धा वहाळकर यांच्याकडे आहे. हा बांबूविषयी ‘रिपोर्ट’ स्वीकारला जाईल आणि त्यातून त्रिपुरामध्ये हजारो वनवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल. प्रत्येक राज्याने पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून आणि विकासाचा दृष्टिकोन अंगीकारुन काम केले, तर वनवासी क्षेत्रातील दारिद्य्र समस्या आणि पर्यावरण र्‍हासाची समस्या याला जबरदस्त पायबंद बसेल.या प्रकल्पात पुढील वर्षी एक गुरुकुल सुरू करण्याची योजनादेखील राज्यपालांपुढे ठेवण्यात आली. या प्रकल्पाचा आराखडा डॉ. कला आचार्य यांनी तयार केलेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत या ‘आचार्य - पौरोहित्य’, ‘आचार्य- योगशास्त्र’ या विषयांचे शिक्षण दिले जाणार आहे. भारतीय संस्कृती, भारतीय जीवनपद्धती सर्व प्राणिमात्रांचा उत्कर्ष करणारी संस्कृती आहे. याचे प्रकटीकरण ‘विवेक गुरुकुल’, भालिवलीमार्फत होणार आहे. समाजाची गरजपूर्ती हेच कोणत्याही प्रकल्पाचे यश असते आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यासार‘या सात्विक राज्यपालांच्या पदस्पर्शामुळे हे यश अधिकच उजाळून निघणारे ठरणार आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.