मुंबईच्या धरणांमध्ये केवळ ३७ टक्के पाणीसाठा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2022   
Total Views |
 
Tansa Dam Mumbai
 
 
 
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशय आणि धरणांमधील पाणीपातळीची आकडेवारी समोर आली असून, मागील वर्षीच्या तुलनेत मुंबईला पाणी देणार्‍या या साठ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याची स्थिती आहे. जलाशयांमधील पाणीसाठा हा येत्या पावसाळ्यापर्यंत पुरण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये यंदा पाणीकपात होणार नाही, असे बोलले जात आहे. संबंधित प्रशासनातर्फे मंगळवार, दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जलसाठ्यांमध्ये एकूण ३७.४३ टक्के म्हणजे ५,४१,७४१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असल्यामुळे मुंबईकरांना यंदाच्या उन्हाळ्यात पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.
 
 
 
सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, धरणांमध्ये ४० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील पावसाळा सुरू होण्यास अद्याप दोन ते तीन महिन्यांचा अवधी बाकी आहे. विशेष म्हणजे दरवर्षी एप्रिल महिन्यात मुंबईकरांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागते. गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली होती.
 
 
 
पाणीकपातीसह अन्य विषयांवर बोलण्यास अधिकार्‍यांचा नकार
मुंबईतील पाणीकपातीचा संदर्भात महापालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर आताच काही बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अद्याप महापालिकेतर्फे या संदर्भात कुठलीही हालचाल किंवा उपाययोजना केल्या जात नसून भविष्यात हा पाणीसाठा पुरेल का, पाणीकपात होईल का, यावर आताच बोलणे योग्य नसल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना म्हटले आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@