प्रधानमंत्री संग्रहालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2022   
Total Views |
pm
 
 
 
ल्युटन्स दिल्लीतल्या तीन मूर्ती मार्गावर भव्य अशी तीन मूर्ती भवनाची वास्तू आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या जीवनाचा बराच मोठा काळ या तीन मूर्ती भवनामध्ये घालवला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या उभारणीसाठी आवश्यक असे अनेक महत्वाचे निर्णय याच वास्तूतून घेण्यात आले. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी वास्तूचे रुपांतर पं. नेहरू स्मृती संग्रहालयात करण्यात आले. दिल्लीमधील राष्ट्रपती भवनानंतर सर्वांत भव्य असणाऱ्या या वास्तूचे स्थान स्वतंत्र भारताच्या इतिहासात अतिशय महत्वाचे असे आहे. आता याच तीन मूर्ती भवनाच्या आणि पं. नेहरू यांच्या स्मृतींच्या सान्निध्यात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे कार्य सविस्तरपणे मांडणारे प्रधानमंत्री संग्रहालय उभे राहिलं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या या संग्रहालयाचे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात लोकार्पण करून भारतीय नेतृत्वाचे सिंहावलोकन करण्याची संधी देशातील जनतेला प्राप्त झाली आहे. 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री संग्रहालय देशाला अर्पण केले. तीन मूर्ती भवनाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी आजवरच्या सर्व पंतप्रधानांच्या कर्तृत्वाचे उचित स्मरण केले. ते म्हणाले, “स्वातंत्र्यापासून सर्व सरकारांनी देशाच्या जडणघडणीत दिलेले योगदान अमूल्य आहे. स्वातंत्र्यानंतर देशात स्थापन झालेल्या प्रत्येक सरकारने देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. या प्रत्येक सरकारच्या सामायिक वारशाचे हे संग्रहालय म्हणजे एक जीवंत प्रतिबिंब ठरणार आहे. घटनात्मक लोकशाहीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येक पंतप्रधानांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे स्मरण करणे, म्हणजेच स्वतंत्र भारताचा प्रवास जाणून घेणे होय.” या संग्रहालयात येणार्‍या लोकांना देशाच्या माजी पंतप्रधानांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख होईल, त्यांची पार्श्वभूमी, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या योगदानाची माहिती होणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
 
 
pm
 
 
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात काही नवे काही करायचे ठरविले की, त्याला विरोध करायचाच; असा पायंडा काही राजकीय पक्षांनी 2014 सालापासून पाडला आहे. त्यानुसार, 2018 साली केंद्र सरकारने आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे संग्रहालय तीन मूर्ती भवनात उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर तातडीने हा निर्णय देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे महत्त्व कमी करण्यासाठी घेतल्याचा नवा शोध लावण्यात आला. काही अतिउत्साही मंडळींनी तर आता तीन मूर्ती भवन उद्ध्वस्तच करण्यात येणार असल्याचाही दावा केला होता, तर काहींनी पंतप्रधान मोदी हे स्वत:चेच गुणगान गायले जावे, यासाठी असे संग्रहालय उभारत असल्याचा प्रचार चालविला होता. अर्थात, या मंडळींना असे वाटणे साहजिकच होते. कारण, या मंडळींची जडणघडण ही स्वत:च्याच कार्यकाळात स्वत:लाच भारतरत्न देणार्‍या, सार्वजनिक संपत्ती, वास्तू आदींना आपल्या कुटुंबीयांच्या स्मारकात परावर्तित करणार्‍यांच्या कार्यकाळात झाली आहे. त्यामुळे, पंतप्रधान मोदी हे वेगळे काहीतरी करतील असे त्यांना न वाटणे अगदीच साहजिक आहे.
 

pm 
 
 
मात्र, टीका करणार्‍यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे, पंतप्रधानांना यांना संग्रहालयाचे नाव ‘मोदी संग्रहालय’ अथवा आपले पूर्वसुरी अटलबिहारी वाजपेयी यांचेच नाव देता आले असते. मात्र, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत,’ अशा संकल्पनेवर विश्वास असणार्‍या पंतप्रधान मोदी यांनी ‘प्रधानमंत्री संग्रहालय’ असे नाव दिले. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत काँग्रेस पक्षानेच देशाला सर्वाधिक पंतप्रधान दिले आहेत. त्यामुळे संग्रहालयाद्वारे काँग्रेसच्या पंतप्रधानांच्याही कार्याचे स्मरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तीन मूर्ती भवनामध्ये सर्व पंतप्रधानांचे कार्य सांगणारे संग्रहालय उभारून एकप्रकारे देश उभारणीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या पं. नेहरू यांच्या स्मृती आगळ्यावेगळ्या पद्धतीने जपण्याचा हा अभिनव प्रयत्न, म्हणूनही या संग्रहालयाकडे पाहण्याची गरज आहे.
 
 
 
असे आहे संग्रहालय... 
 
तीन मूर्ती परिसरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम दर्शन होते ते नेहरू मेमोरियल अ‍ॅण्ड म्युझियमचे. येथे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवनपट प्रदर्शित करण्यात आला आहे. बॅरिस्टर होण्याचा प्रवास, स्वातंत्र्याचा मार्ग, नव्या जाणिवेचा नेता, महात्मा गांधींच्या सान्निध्यात येणे आणि विवाह इत्यादी घटनांचे तपशीलवार वर्णन केले आहे. ज्या खोलीत नेहरूंचा मृत्यू झाला होता, ती खोलीही प्रेक्षकांना पाहता येते. त्याचप्रमाणे नेहरूंसह सर्व पंतप्रधानांना विविध देशांतून भेट दिलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही ठेवण्यात आले आहे.
 
 
 
त्यानंतर पहिल्या मजल्यावर स्वतंत्र दालनामध्ये देशाच्या फाळणीचा इतिहास ऑडिओ-व्हिज्युअलपद्धतीने मांडला आहे. यामध्ये एका ध्वनीचित्रफितीद्वारे देशाची फाळणी, त्यात गेलेले लाखो बळी याविषयी माहिती आहे. फाळणीचा इतिहास स्पष्टपणे मांडण्याचा हा देशातील कदाचित पहिलाच असा प्रयत्न असावा. त्यानंतर पं. नेहरू यांच्या कार्यकाळात चीनने भारतावर केलेले आक्रमण, भारताचा दुर्दैवी पराभव आणि त्यावेळचे नेहरूंचे परराष्ट्र धोरण, याचीही माहिती ध्वनीचित्रफितीद्वारे देण्यात आली आहे.
 

pm 
 
तीन मूर्ती भवनाच्या वास्तूनंतर प्रवेश होतो तो नव्या प्रधानमंत्री संग्रहालयामध्ये. नव्या वास्तूमधील मुख्य कॉरिडॉर हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, ज्यामध्ये सर्व पंतप्रधानांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दलही या संग्रहालयात तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. त्यांचा जन्म, त्यांचा अभ्यास, त्यांचे विचार यासह दक्षिण आफ्रिकेतील घडामोडी प्रदर्शित केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर वर्षानुवर्षे घेतलेले महत्त्वाचे निर्णय ऑडिओ-व्हिडिओद्वारे दाखवणारे ‘टाईम मशीन’ हे संग्रहालयातील विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि ‘आझाद हिंद सेने’चा देशाच्या स्वातंत्र्यातील सिंहाचा वाटाही ध्वनीचित्रफितीद्वारे सविस्तरपणे मांडण्यात आला आहे.
 
 
 
त्यानंतर आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे कार्य दाखविणारी स्वतंत्र दालने उभारण्यात आली आहे. ‘व्हर्च्युअल’ आणि ‘ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी’ तसेच ऑडिओ-व्हिज्युअल डिस्प्ले आणि ध्वनी यांच्याद्वारे अतिशय सुंदर अनुभव प्रेक्षकांना प्राप्त होतो. उदाहरणादाखल, अटलबिहारी वाजपेयी यांच्या विभागात, ‘ऑपरेशन शक्ती’ नावाच्या विभागात 1998 सालची पोखरण अणुचाचणी, ‘सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प, कारगिल युद्धातील विजय, आर्थिक विकास, टेलिकॉम क्षेत्रातील क्रांती, सर्व शिक्षा अभियान आदी अतिशय प्रभावी मांडले आहे. अशाचप्रकारे लालबहादूर शास्त्री यांच्या काळातील हरितक्रांती, नरसिंह राव यांनी रोवलेली आर्थिक सुधारणांची मुहूर्तमेढ, राजीव गांधी यांच्या काळातील संगणक क्रांती, बोफोर्स घोटाळा आदी सर्व महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यात आली आहे.
 

pm 
 
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या संग्रहालयामध्ये विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2014 सालापासूनचा कार्यकाळ समाविष्ट करण्यात आलेला नाही. संग्रहालयाच्या सध्याच्या शेवटच्या दालनामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ दाखविण्यात आला आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:चेच गुणगान करण्यासाठी हे संग्रहालय उभारल्याचा दावाही फोल ठरतो. मात्र, एकूणच 1947 ते आजपर्यंत भारतीय नेतृत्वाचे सिंहावलोकन करण्यासाठी हे प्रधानमंत्री संग्रहालय आवर्जून पाहण्यासारखे आहे.
 
 
‘सेल्फी विथ पीएम’ आणि ‘वॉक विथ पीएम’

आपल्या आवडत्या पंतप्रधानांसोबत बसून छायाचित्र काढण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. अर्थात, प्रत्येकाचीच ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. मात्र, प्रधानमंत्री संग्रहालयामध्ये ‘सेल्फी विथ पीएम’ या विशेष दालनामध्ये ‘ऑगमेंटेड रिएलिटी’ हा तंत्रज्ञानाद्वारे आपल्या आवडत्या पंतप्रधानांसोबत छायाचित्र काढण्याची सोय आहे. त्याचप्रमाणे ‘वॉक विथ पीएम’ या दालनामध्ये तंत्रज्ञानाद्वारे आवडत्या पंतप्रधानासोबत चालण्याचीही इच्छा पूर्ण करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे रोबोटद्वारे आपल्या नावे आपल्या आवडत्या पंतप्रधानांचा त्यांच्या स्वाक्षरीद्वारे विशेष संदेशही प्राप्त करता येणार आहे.
  
 
 
संग्रहालयाची वैशिष्ट्ये
ज्या तीन मूर्ती संकुलात हे पंतप्रधानांचे संग्रहालय बांधण्यात आले आहे, ते 16 वर्षे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान होते.
ऊर्जा बचत तंत्रज्ञानाचा अवलंब संग्रहालयाच्या इमारतीमध्ये शाश्वत मार्गाने करण्यात आला आहे. संग्रहालयाच्या बांधकामादरम्यान एकही झाड तोडण्यात आलेले नाही आणि झाडांचे स्थलांतरही करण्यात आलेले नाही.
संग्रहालयाच ‘ब्लॉक-1’ हा पूर्व-निर्मित भाग आहे, ज्यामध्ये तीन मूर्ती भवन समाविष्ट आहे, तो ‘ब्लॉक-2’ म्हणून बांधलेल्या नवीन पंतप्रधान संग्रहालयात विलीन करण्यात आला आहे. दोन्ही ब्लॉकचे एकूण क्षेत्रफळ 15,619 चौरस मीटर झाले आहे. संग्रहालयामध्ये एकूण 43 दीर्घा आहेत.
पंतप्रधानांच्या संग्रहालयात दाखविल्या जाणार्‍या माहितीचा संदर्भ प्रसार भारती, चित्रपट विभाग, संसद टीव्ही, दूरदर्शन, मीडिया हाऊस, संरक्षण मंत्रालय, परदेशी वृत्तसंस्था इत्यादी संस्थांकडून घेण्यात आला आहे.
संग्रहालय मार्च ते ऑक्टोबर या काळात सकाळी 10 ते सायंकाळी 6 आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळास सर्वांसाठी खुले आहे. दर सोमवारी आणि सरकारी सुटीच्या दिवशी संग्रहालय बंद राहणार आहे.
संग्रहालयाचे शुल्क - भारतीयांना ऑनलाईन तिकिटांसाठी 100 रुपये आणि ऑफलाईन तिकिटांसाठी 110 रुपये मोजावे लागतील. संग्रहालयाला भेट देण्यासाठी परदेशी नागरिकांना 750 रुपये शुल्क आहे.
संग्रहालयाचा पत्ता - प्रधान मंत्री संग्रहालय, तीन मूर्ती मार्ग, नवी दिल्ली 110001.
संकेतस्थळ - https://www.pmsangrahalaya.gov.in
 
 
 
आजवर न मांडण्यात न आलेल्या घटना...

आजवर स्पष्टपणे न मांडण्यात आलेल्या घटनाही संग्रहालयाच्या रुपात मांडण्यात आल्या आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी, त्या काळात प्रसारमाध्यांमाची झालेली गळचेपी, विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात डांबणे याविषयी सविस्तर माहिती आहे. त्याचप्रमाणे राजीव गांधी यांच्या कार्यकाळातील शाहबानो प्रकरणे असो अथवा भोपाळ गॅस दुर्घटना असो किंवा बोफोर्स प्रकरणी त्यांच्यावर झालेला लाचखोरीचा आरोपही मांडण्यात आला आहे.
 
 
भविष्य की झलकिया...
‘व्हर्च्युअल रिएलिटी’द्वारे हेलिकॉप्टरमध्ये बसून पर्यटकांना देशाचे भविष्यातील चित्र दाखविले जाते. यामध्ये देशातील महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे लालकिल्ल्याचे एक मॉडेल ठेवण्यात आले असून ज्यावर सर्व पंतप्रधानांनी आतापर्यंत दिलेली भाषणे थ्रीडी प्रोजेक्टरद्वारे होलोग्रामच्या स्वरूपात ऐकण्याचा अनुभव घेता येणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@