राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठीच जातीयवादी विधानांचा आधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2022   
Total Views |
absp
 
 
 
 
मुंबई (ओंकार देशमुख): ''राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन प्रकरणावर करण्यात आली होती. त्यातून जातीयवादाच्या संदर्भात मोठी चर्चा देखील उफाळून आली होती. मात्र, अनेक आघाड्यांवर अपयशी झालेल्या महाविकास आघाडी सरकारचे अपयश लपविण्यसाठीच पवारांकडून अशा प्रकारच्या जातीयवादी विधानांचा आधार घेतला जात आहे,' अशी घणाघाती टीका मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवर भातखळकर यांनी 'मुंबई तरुण भारत'शी नुकताच संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
'शरद पवार यांनी महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण केली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी' असे विधान तुम्ही केले आहे. त्यावर तुम्ही ठाम आहेत का ?
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत एक टिप्पणी केली आणि तिथून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जातीयवादाला तोंड फुटले आहे. मुळात शरद पवारांनी केलेले वक्तव्य हे अजाणतेपणी किंवा अनावधानाने करण्यात आलेले नसून जाणिवपूर्वक करण्यात आले आहे. राज्यात दोन जातींमध्ये द्वेष पसरविण्याचे काम शरद पवार आणि इतर काही घटकांकडून मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यातून महाराष्ट्रात जातीजातींमध्ये मोठा द्वेष निर्माण झाला असून त्याला ही मंडळी जबाबदार आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करून कायदेशीर मार्गाने कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.
 
 
 
अशा प्रकारच्या कारवाईची आपण मागणी करत आहात. पण खरोखरच ही कारवाई होईल, असे तुम्हाला वाटते का ?
'अजिबात नाही. ज्याप्रकारे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती मागील दोन ते अडीच वर्षांमध्ये घसरत चालली आहे, राज्याच्या पोलीस दलातील अधिकारी पैशांची वसुली करत आहेत, देशातील एक अत्यंत मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर एका पोलीस अधिकाऱ्याकडून स्फोटके ठेवली जात आहेत, अशा स्थितीत राज्य सरकार पवारांवर कुठलीही कायदेशीर कारवाई करेल याची सुतराम शक्यता नाही आणि मला तशी अपेक्षा देखील नाही.'
 
 
 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणाला दोष देत राज्यात अनेक वर्षे हा वाद कसा पेटता राहील याची काही घटकांनी व्यवस्थित काळजी घेतली, असा आरोप केला जातो. त्यामागे काय कारण असू शकतं ?
- सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे ते म्हणजे केवळ जातीयवाद. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणाचे चुकीचे अर्थ काढून ते समाजात पसरविण्यात आले. बाबासाहेबांच्या बाबत हे का घडले तर केवळ त्यांची जात. बाबासाहेबांनी तहहयात छत्रपती शिवरायांचे कार्य देशभरात पोहिचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. पण केवळ बाबासाहेब हे जातीने ब्राह्मण होते, म्हणून त्यांच्या लिखाणाला काही विशिष्ठ घटकांकडून सातत्याने विरोध केला गेला आणि त्यातून महाराष्ट्रभर जातिद्वेषाचे राजकारण घडवून आणले गेले. केवळ आणि केवळ राज्यात जातीय विद्वेषाचे राजकारण करण्यासाठीच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणाचे चुकीचे संदर्भ देत हा वाद कायम पेटवला गेला हा आरोप शंभर टक्के खरा आहे.'
 
 
 
शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या संदर्भात टीका केल्यानंतर काही संघटना आणि त्यांची नेते मंडळींनीही बाबासाहेबांच्या विरोधात वक्तव्ये केली होती. या दोन घटनांमध्ये काही संदर्भ आहे, असे वाटते का ?
'निश्चितच. राज्यात मागील काही वर्षांमध्ये जे काही जातीयवादाचे विष पेरले गेले, त्यासाठी काही राजकीय पक्षांकडून काही संघटना जन्माला घातल्या गेल्या आणि त्यांच्या मार्फत ही विषपेरणी राज्यभरात केली गेली. पवारांनी वक्तव्य केले आणि त्यानंतर जे लोक बाबासाहेबांच्या विरोधात टीका टिप्पणी करत आहेत, त्यातून या संघटना पवारांच्याच वक्तव्याची री ओढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील दोन वर्षांपासून राज्यात सत्ताधारी पक्षाच्या भूमिका बजावत असलेल्या महाविकास आघाडीतर्फे राज्यात कुठलाही नविन प्रकल्प अथवा कार्यक्रम राबवण्यात आलेला नाही. या सरकारचे लक्ष केवळ कोण जास्त वसुली करणार आणि कुणाला अधिकचा वाटा मिळणार याकडे आहे. त्यामुळे शरद पवार आणि संबंधित व्यक्तींकडून केवळ सत्ताधारी महाविकास आघाडीच्या अपयशाला झाकण्यासाठीच अशा प्रकारच्या विधानांचा आधार घेतला जात आहे.'
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@