शालिवाहन, संजीवनी मंत्र, परीस वगैरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
doctor hedgewar
 
 
ज्याप्रमाणे शालिवाहनाने मातीच्या सैनिकांमध्ये संजीवनी फुंकून, त्यांना जीवंत करून त्यांच्याकरवी पराक्रम केला,तसंच डॉ. हेडगेवारांनी असंघटितपणामुळे मातीप्रमाणेच सगळ्यांकडून तुडवल्या जाणार्‍या हिंदू समाजाला संघटनेचा संजीवनी मंत्र देऊन त्यांच्यात प्राण फुंकले. म्हणून डॉ. हेडगेवार हे आधुनिक शालिवाहन होत.
 
विष्णु श्रीधर उर्फ हरिभाऊ वाकणकर यांचा जन्म १९१९ सालचा. त्यांनी भोपाळपासून सुमारे ४५ कि.मी. अंतरावर असणार्‍या भीमबेटका गुंफांचा शोध लावला. या एकूण ७५० गुंफा असून त्यापैकी काहींमध्ये किमान एक लाख वर्षांपूर्वी मानवी वस्ती होती, असं जागतिक पुरातत्त्वशास्त्रज्ञांचं मत आहे, त्यामुळे ‘युनेस्को’ने भीमबेटका गुंफांना जागतिक वारसा घोषित केलं आहे.
 
मोरेश्वर नीलकंठ उर्फ मोरोपंत पिंगळे यांचाही जन्म १९१९ सालचा. त्यांनी आयुष्यभर रा. स्व. संघाच्या अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या. पण असं म्हणता येईल की, १९८१ सालच्या मीनाक्षीपूरम सामुदायिक धर्मांतरण प्रकरणानंतर मोरोपंत पूर्ण शक्तीनिशी विरोधकांशी भिडले. त्यांच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या गंगाजलयात्रा, भारतमाता पूजन, रामरथयात्रा, रामशिलापूजन, कारसेवा इत्यादी उपक्रमांनी अवघा हिंदू समाज ढवळून निघाला, कृतिशील झाला. आक्रमक बाबरी ढांचा नष्ट होऊन त्या जागी रामललाची स्थापना होणं, हा त्या कृतिशीलतेचा कळस होता.
 
या दोघांच्याही जन्मशताब्दीचा कार्यक्रम २०२० मध्ये ‘कोविड’मुळे होऊ शकला नाही. तो गेल्या आठवड्यात डोंबिवलीत झाला. हरिभाऊ वाकणकरांचे पुतणे डॉ. दिलीप वाकणकर यांनी हरिभाऊंच्या विराट पुरातत्त्वीय ज्ञानभांडाराचा परिचय करून दिला, तर ज्येष्ठ संघ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांनी मोरोपंतांच्या विलक्षण संघटन कौशल्याचा परिचय करून दिला. सुहासरावांनी एक फार महत्त्वाचं वाक्य उच्चारलं, “मोरोपंतांनी आपल्या परीस स्पर्शाने असंख्य कार्यकर्ते उभे केले,” हे ते वाक्य.
 
हिंदू लोककथा आणि पुराणकथांमध्ये परीस या चमत्कारिक दगडाचे पुष्कळ उल्लेख येतात, या दगडाचा लोखंडाला स्पर्श झाला असता लोखंडाचं सोनं होतं, असं म्हणतात. आधुनिक पदार्थविज्ञानशास्त्र किंवा रसायनशास्त्र अशा प्रकारच्या दगडाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवायला तयार नाही. परंतु, वेगवेगळ्या धातूंवर शास्त्रीय प्रक्रिया करून त्यांचं सोन्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे त्यांचे प्रयोग मात्र, चालू आहेत, समुद्राच्या पाण्याचं सोनं बनवण्याची प्रक्रिया यशस्वी झाली आहे म्हणे, पण ती इतकी खर्चिक आहे की, त्या सोन्याची किंमत बाजारभावाच्या कित्येक पट अधिक ठेवावी लागेल म्हणजेच व्यावहारिकदृष्ट्या ती प्रक्रिया उपयुक्त नाही. असो, हरिभाऊ वाकणकर किंवा मोरोपंत पिंगळे यांच्या या परीसस्पर्शाबद्दल विचार करताना मनात येतं की, त्यांना हा स्वत:च परीस बनण्याचा गुण कुठून मिळाला असेल? आणि मग अर्थातच डोळ्यांसमोर नाव येतं ते डॉ. हेडगेवार यांचं.
 
बेळगावानिवासी संत कलावतीदेवी फार मार्मिकपणे लिहितात की, “परीस लोखंडाला सोनं बनवतो. पण ते सोनं दुसर्‍या लोखंडाला सोनेपण देऊ शकत नाही किंवा परीस दुसर्‍या दगडाला परीसपण देऊ शकत नाही. परंतु, गुरू आपल्या शिष्याला आपलं गुरूपणच देतो. ज्यामुळे तो शिष्यही इतर अनेकांना गुरूपण देऊ शकतो.”
 
संघामध्ये डॉ. हेडगेवार गुरू नाहीत, भगवा ध्वज हाच गुरू आहे. डॉ. हेडगेवारांनी स्वत:कडे गुरूपण घेणं कटाक्षाने टाळून व्यक्तिपूजेचा मुद्दाच संपवून टाकला. व्यवहारात मात्र, आपल्यासारखे अनेक परीस घडवले. हिंदू समाजातल्या अनेक व्यक्तींची जीवनं सोन्याप्रमाणे बावनकशी घडवणारे. डॉ. हेडगेवारांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी झाला होता. म्हणून अनेकदा त्यांचा उल्लेख ‘आधुनिक शालिवाहन’ असा केला जातो. आपल्याकडे ‘राजा शालिवाहना’ची दंतकथा प्रसिद्ध आहे. शालिवाहन प्रतिष्ठान उर्फ पैठण या नगरीत राहणारा आणि एका कुंभाराच्या कारखान्यात पडेल ते काम करणारा अनाथ पोरगा होता. योगायोगाने त्याने एका साधूची सेवा केली. साधूने त्याला ‘संजीवनी विद्या’ शिकवली. संजीवनी मंत्राचा जप केला असता मृत माणूस जीवंत होतो. ती विद्या दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांच्याकडे असते, देवगुरू बृहस्पतीचा मुलगा कच मोठ्या हिमतीने शुक्राचार्यांकडून ती विद्या हस्तगत करतो, अशी मोठी विस्मयकारक कथा महाभारतात आहे.
 
तर अनाथ शालिवाहनाला साधूकडून ती विद्या मिळते. मग प्रतिष्ठान नगरीवर शक या परकीय आक्रमकांचा हल्ला होतो, शालिवाहन आणि त्याचा मालक मातीचे सैनिकांचे पुतळे बनवून त्यात संजीवनी मंत्राने प्राण फुंकतात. मग त्या सैन्याच्या जोरावर राजा, परकीय शकांना पराभूत करतो, पुढे शालिवाहन संपूर्ण भारतभूमीतूनच म्लेंच्छ शकांना हाकलवून काढतो. शालिवाहनाच्या राज्यारोहणापासून जी नवी कालगणना अस्तित्वात येते, तीच आपली आजची ‘शालिवाहन शक कालगणना.’ यंदा २ एप्रिल रोजी शालिवाहन शक १९४४ सुरू होत आहे. म्हणजे राजा शालिवाहनाच्या राज्यारोहणाला १ हजार, ९४४ वर्ष झाली आहेत.
 
संघ कार्यकर्ते म्हणतात की, ज्याप्रमाणे शालिवाहनाने मातीच्या सैनिकांमध्ये संजीवनी फुंकून, त्यांना जीवंत करून त्यांच्याकरवी पराक्रम केला, तसंच डॉ. हेडगेवारांनी असंघटितपणामुळे मातीप्रमाणेच सगळ्यांकडून तुडवल्या जाणार्‍या हिंदू समाजाला संघटनेचा संजीवनी मंत्र देऊन त्यांच्यात प्राण फुंकले. म्हणून डॉ. हेडगेवार हे आधुनिक शालिवाहन होत.
 
शास्त्रज्ञ मंडळींना प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो. त्यामुळे त्यांना जसा परीस नावाचा चमत्कारिक दगड मान्य नाही, तसंच संजीवनी विद्या मंत्र मान्य नाही, शालिवाहनही मान्य नाही, म्हणजे असं पाहा की, जर परीस नावाचा दगड असेल, तर दाखवा कुठे आहे तो! शेकडो, हजारो लोकांच्या समक्ष, प्रयोगशाळेत परीसाने लोखंडाला स्पर्श करून त्यांचं सोनं बनवून दाखवा, मगच आम्ही मान्य करू. तसंच संजीवनी विद्या किंवा मंत्र जे काही तुमचं असेल, त्याचं जाहीर प्रात्यक्षिक दाखवून मेलेल्याला जीवंत करून दाखवा, तरच आम्ही मानू. तसाच तुम्ही शालिवाहन जो कोणी म्हणता त्या नावाच्या राजाचं एकही नाणं ताम्रपट, शिलालेख, काहीही मिळालेलं नाही. सातवाहन नावाच्या राजवंशाने इसवी सन पूर्व दुसरं शतक ते इसवी सनाचं तिसरं शतक, अशी साधारण ४५० वर्षे आजच्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगण या प्रदेशावर राज्य केलं हे आम्ही मान्य करतो. कारण, राजा श्रीमुख सातवाहन, राजा कृष्ण, राजा हाल, राजा गौतमीपुत्र, राजा पुलुमावी, राजायज्ञश्री अशा सातवाहन किंवा सातकर्णी वंशातल्या अनेक राजांची नाणी, ताम्रपट, शिलालेख सापडलेत. पण शालिवाहन या नावाचं काहीही अद्याप सापडलेलं नाही, त्यामुळे राजा शालिवाहनाचं अस्तित्वच आम्हाला मान्य नाही, म्हणजेच त्यांच्या नावाची कालगणनाही खोटी आहे, असं आधुनिक शास्त्रज्ञ म्हणतात.
 
आता इतिहासशास्त्रानुसार पत्रव्यवहार, ताम्रपट, शिलालेख, नाणी इत्यादी पुरातात्विक पुरावे नसल्यास साहित्यिक पुरावे बघतात. त्यानुसार ‘भविष्य पुराण’ हा एक मोठा आधारग्रंथ आहे, त्यानुसार महान हिंदू सम्राट विक्रमादित्य यांच्या परमार वंशातच शालिवाहनाचा जन्म झाला होता. पण, इतिहास शास्त्रज्ञांना भविष्य पुराण मान्य नाही. कारण, त्यात अनेक उल्लेख मागाहून घुसडलेले आहेत.
 
मग त्यांनी उपाय शोधला. कुशाण वंशीय सम्राट कनिष्क हा इसवी सन ७८ यावर्षी राज्यावर बसला. तेव्हा तोच हिंदूंचा शालिवाहन असं त्यांनी ठरवून टाकलं. म्हणजे हिंदूंनो, जसे तुम्ही परकीय आर्य आक्रमकांना आपले मानता, परकीय कनिष्काला आपला शालिवाहन मानता, तसंच आम्हा परकीय इंग्रजांनाही आपलेच माना. पर्यायाने भारत देशाविषयी अभिमान वगैरे बाळगू नका आणि आम्हाला भारताची मनसोक्त लूट करू द्या. ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा अत्यंत विद्वान अधिकारी न्यायाधीश विल्यम जोन्स आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागून भारताच्या इतिहास साधन ग्रंथांमध्ये प्रचंड घुसडाघुसडी करून ठेवणारा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्या उद्योगांना भरभरून फळं आली आहेत. आम्ही हिंदू, आमचा देश, आमचा धर्म, आमची संस्कृती, आमचा इतिहास यांच्याबद्दल संभ्रमित अवस्थेत आहोत. आम्ही आमच्या पूर्वजांचा तिरस्कार करतो आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा उदोउदो करतो. आम्ही फक्त नावापुरते नि व्यवहारापुरते हिंदू आहोत, आमची मन, बुद्धी आणि अंत:करण केव्हाच बाटलंय.उलटणार्‍या प्रत्येक वर्षागणिक ते आणखीनच बाटगं बनतंय. पाश्चात्यांचे आधुनिक सुशिक्षित गुलाम!
 
मुंबईहून ‘सद्धर्म’ नावाचं त्रैमासिक निघत असे, अण्णासाहेब नवाथे नावाचे एक गृहस्थ त्याचे मालक होते आणि हरिभाऊ दामले त्याचे संपादक होते. दोघेही अत्यंत विद्वान आणि तितकेच प्रसिद्धीविन्मुख होते. दादरला अप्पा जोशी नावाचे फार प्रसिद्ध वैद्य होते. ते फार मोठे गणेशभक्तही होते. गणेश पुराणात सांगितल्यानुसार २१ वर्ष त्यांनी मांदार वृक्षाची शास्त्रोक्त पूजा केली. तेव्हा त्यांना मांदार गणेशाचा साक्षात्कार झाला. या अप्पांनी तरुण वयात हिमालयात जाऊन आयुर्वेदाचा विशेष अभ्यास केला होता. एकदा अप्पा अण्णासाहेब नवाथे यांच्याकडे आलेले असताना प्राचीन हिंदूंच्या गूढ विद्या, मंत्रशास्त्र इत्यादी गोष्टी निघाल्या. रामायणात, लक्ष्मणाला शक्ती लागली, असता मारुतीने हिमालयाचं द्रोणागिरी हे अख्खं शिखरच उपटून आणलं. मग सुषेण वैद्याने मृतसंजीवनी विशल्यकरणी, सुवर्णकरणी आणि संधानी या चार दिव्य औषधींचा वापर करून लक्ष्मणाला बरं केलं हे मुद्दे निघाले. त्यावरून शुक्राचार्य, कच, संजीवनी मंत्र हे विषय निघाले. त्यावेळी बोलताना अप्पा जोशी म्हणाले की, होय अशी मंत्रविद्या खरोखरच आहे. मला माझ्या गुरूंनी ती शिकवलेली आहे.
 
मग अर्थातच पुढचा प्रश्न आला की, तुमच्या वैद्यकीय सेवेत तुम्ही कधी तिचा वापर केलाय का? त्यावर अप्पा म्हणाले, असा एकदाच प्रसंग आला. थोर विठ्ठलभक्त सोनापंत दांडेकर हे अत्यवस्थ होते. मी त्यांना भेटून त्यांच्यावर हा प्रयोग करण्याची परवानगी विचारली. तेव्हा त्यांनी मला, माझ्या आणि पांडुरंगाच्या भेटीआड येऊ नका, म्हणून मनाई केली.
 
आता, या प्रसंगातील सर्व व्यक्ती अगदी समकालीन म्हणजे अलिकडच्या आहेत. सोनोपंत दांडेकर १९६८ साली गेले. अप्पा जोशी १९७५ साली गेले. अण्णासाहेब नवाथे १९८३ साली गेले आणि हरिभाऊ दामले १९९६ साली गेले. यावरून संजीवनी मंत्राबद्दल तुम्हाला जे काही ठरवायचं ते तुम्हीच ठरवा. वाचन, मनन, संशोधन, अध्ययन या सगळ्याला प्रचंड वाव आहे. हे झालं मंत्रशास्त्राबद्दल. पण आधुनिक शालिवाहन त्याचा परीस स्पर्श आणि त्याचा संजीवनी मंत्र हे मात्र अगदी स्पष्टच आहे. अखंड हिंदू संघटन हाच तो दिव्य मंत्र!
 
 
@@AUTHORINFO_V1@@