युरोपचे धोरण बदलणारी निवडणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2022   
Total Views |

france
फ्रान्समध्ये दि. १० एप्रिल रोजी राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या फेरीसाठी मतदान पूर्ण झाले. २०१७ च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी मरीन ले पेन यांच्यात थेट लढत आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत जगाचे भू-राजकीय चित्र पूर्णपणे बदलले असून, यावेळी जगाचे संपूर्ण लक्ष रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाकडे लागले आहे. तसे, युरोप आणि युरोपियन युनियन रशियाबाबत त्यांच्या धोरणांमध्ये एकसमानता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल युरोपीय संघाची धोरणे ठरवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे.
युरोपमध्ये आज युद्धाची परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर जर्मनी व फ्रान्समध्ये राजकीय स्थिरता असणे युरोपियन युनियनसाठी अतिशय गरजेचे आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस, अँजेला मर्केल यांनी चॅन्सलरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जर्मनीमध्ये सत्तापरिवर्तन झाले आणि जर्मनीचे नवे चॅन्सलर म्हणून ओलाफ शुल्ट यांची निवड झाली. त्याचप्रमाणे आता फ्रान्समध्येही २४ एप्रिल रोजी अध्यक्षीय निवडणुकीच्या दुसर्‍या फेरीसाठी मतदान होणार आहे. पहिल्या फेरीच्या मतदानात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना २७.६ टक्के मते मिळाली. दुसरीकडे मरीन ले पेन यांना २३.४ टक्के मते मिळाली आहेत. तसे, निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्व सर्वेक्षणांमध्येअध्यक्ष मॅक्रॉन आपली खुर्ची वाचवू शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण, मरीन ले पेन यांची उमेदवारी आणि त्यांचा आक्रमक राजकीय प्रचार पाहता ही लढत अपेक्षेपेक्षा जास्त काटेरी ठरू शकते. ५१ टक्के मते मिळवून मॅक्रॉन निवडणूक जिंकतील, असे मतदानपूर्व सर्वेक्षणसांगत आहेत. त्याचवेळी मरीन ले पेन यांना ४९ टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.मॅक्रॉन यांनी मतदारांना मतदानापासून दूर राहण्याऐवजी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘’फ्रान्सने युरोपपासून वेगळे व्हावे आणि केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्णद्वेषी नेत्यांचेच समर्थन मिळत राहावे, अशी माझी इच्छा नाही. फ्रान्सची मानवतेशी असलेली ओढ कायम राहावी आणि पुनर्जागरणाशी एकनिष्ठ राहावे, अशी माझी इच्छा आहे.” मॅक्रॉन यांनी निवडणूक जिंकल्यास, २००२ मध्ये याक शिराकनंतर सलग दुसर्‍यांदा निवडून आलेले ते पहिले फ्रेंच राष्ट्राध्यक्ष असतील.
दुसरीकडे, मरीन ले पेन यांनी स्थलांतरित आणि मुस्लिमांनी सार्वजनिक ठिकाणी ‘हिजाब’ घालणे यासारख्या मुद्द्यांवर आपली भूमिका मवाळ केली आहे. उजव्या विचारसरणीच्या मरीन ले पेन यांनी आपल्या भूतकाळातील अनुभवांतून धडा घेतला आहे. बरेच काही शिकल्या आहे आणि आता त्या आपल्या रॅलीमध्ये मध्यम वर्ग आणि मुख्य प्रवाहातील समस्या जसे की, जीवनमानाचा वाढता खर्च, वाढत्या महागाईचा सामना करणे, इंधनाच्या किमती आणि ’फ्रेंच वस्तूंची खरेदी’ यासारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतात. तथापि, स्थलांतरितांचा अनियंत्रित ओघ थांबवणे आणि इस्लामिक विचारसरणी नष्ट करणे हे त्यांचे मुख्य प्राधान्य राहिले आहे. रणनीतीतील हा बदल मरीन ले पेन यांच्यासाठी प्रभावी ठरला आहे. मरीन ले पेन या पुतीन यांच्या कट्टर समर्थक आहेत. तथापि, त्यांनी सध्याची स्थिती लक्षात घेऊन त्यातही बदल केला आहे. आता फ्रान्सच्या ग्रामीण आणि उपनगरीय मतदारांना आकर्षित करणार्‍या घरगुती समस्यांवर त्या जोर देत आहेत.
आगामी दि. २० एप्रिल रोजी होणार्‍या ‘टेलिव्हिजन डिबेट’मध्ये दोन्ही उमेदवार आमनेसामने असतील. युरोपची प्रशासकीय रचना मुख्यत्वे फ्रेंच अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून आहे. दोन्ही उमेदवार आपापल्या ताकदीच्या मुद्द्यांवर भर देतील, अशी आशा आहे. मॅक्रॉन त्यांच्या निर्णायक परराष्ट्र धोरणातील यश आणि युरोपीय घडामोडींमधील त्यांच्या नेतृत्व अनुभवाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. त्याच वेळी, मरीन ले पेन ग्रामीण मतदारांची मते मिळविण्यासाठी संरक्षणवादी आर्थिक धोरणे आणि इतर देशांतर्गत समस्या यासारखे नवीन उपस्थित केलेले मुद्दे मांडतील. फ्रेंच अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल केवळ फ्रान्ससाठी नव्हे, तर उर्वरित युरोप आणि इतर देशांसाठीही महत्त्वाचे आहेत. नजर त्यांच्यावर असेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@