इमरान खान ‘क्लीन बोल्ड’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2022   
Total Views |

imran
 
 
इमरान खान यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला गेला. त्या ठरावाला सामोरे न जाता त्यांनी संसद बरखास्त केली. प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायमूर्तींनी संसद बरखास्तीचा निर्णय घटनाबाह्य ठरविला आणि रविवार दि. १० एप्रिल रोजी संसदेच्या अधिवेशनात अविश्वासाचा ठराव पारीत झाला आणि इमरान खान ‘क्लीन बोल्ड’ झाले. यात अमेरिका कुठे येत नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान, हे एकेकाळी पाकिस्तानी क्रिकेट टीमचे कप्तान होते. जलदगती गोलंदाज म्हणून ते विख्यात होते. एक उत्तम क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांनी अफाट लोकप्रियता प्राप्त केली. आपल्याकडे गावस्कर आणि तेंडुलकर यांनीदेखील अफाट लोकप्रियता प्राप्त केली. परंतु, या दोघांनी राजकारणासाठी तिचे भांडवल केले नाही, ते इमरान खानने केले. ‘तेहरिक-ए-इन्साफ’ या नावाचा एक राजकीय पक्ष काढला आणि ते निवडणुकांच्या रिंगणात उतरले; निवडून आले आणि पंतप्रधान झाले.
 
क्रिकेटच्या खेळात कप्तानाला फलंदाजीचा क्रम ठरवावा लागतो. गोलंदाजीचा क्रम ठरवावा लागतो. क्षेत्ररक्षणाची रचना करावी लागते. फलंदाजी करायला कोण आला आहे, याचा अभ्यास करून त्याला बाद करण्यासाठी कोणता गोलंदाज उपयोगाचा आहे आणि त्याचे भोवती कोणते क्षेत्ररक्षण करावे, हे सर्व कप्तानाचे निर्णय करण्याचे विषय असतात. राजकारणाचा क्रिकेट करता येत नाही. सत्ताकराणात सत्ता संतुलन साधावे लागते. स्वपक्षातील लोकही कधी पाठीत खंजीर खुपसतील, हे सांगता येत नाही. प्रत्येक पक्षात एखादा शरद पवार आणि एखादा छगन भुजबळ असतो. हे लोक सत्तेसाठी काही करायला तयार असतात. त्यांना सांभाळणे इमरानला जमले नाही. पाकिस्तानच्या सत्ता संतुलनाचे तीन घटक आहेत. त्यांना ‘तीन ए’ असे म्हणतात- अमेरिका, अल्ला आणि आर्मी. या तीन घटकांना खूश करीत पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखाला सत्ता चालवावी लागते. पाकिस्तानची निर्मिती ब्रिटन आणि अमेरिकेने आंतरराष्ट्रीय राजकारणाचा डावपेच म्हणून केली. शीतयुद्धात या दोन्ही देशांच्या परराष्ट्रीय धोरणाचे मुख्य सूत्र कम्युनिझमला रोखण्याचे होते. रशियाला घेरण्यासाठी अमेरिकेने जगभर अनेक उचापती केल्या. पाकिस्तानच्या भूमीचा उपयोग करून रशियावर हेरगिरी केली. पाकिस्तानच्या भूमीचा वापर करून अरब तेलसाठे सुरक्षित ठेवले आणि चीनलाही पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. भारताला फार मोठे होऊ दिले नाही. पाकिस्तान गांधींनी निर्माण केले, ते हिंदूंच्या हितासाठी केले. राजकीय डावपेचात जिना यांनी काँग्रेसवर मात केली. सावरकरांच्या ‘हिंदूराष्ट्र’ संकल्पनेमुळे मुस्लीम पाकिस्तानला बळ मिळाले, असे विद्वातापूर्ण लेखन अनेकजण करतात. ते वाचावे, पण ते पूर्ण सत्य नाही, हे नीट लक्षात ठेवावे.
 
पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवणे आणि लष्करीदृष्ट्या बलवान करणे, ही अमेरिकेची गरज झाली. जनरल झिया यांनी ‘अमेरिका, अल्ला आणि आर्मी’ या तिघांचे संतुलन साधत जवळजवळ दहा वर्षे राज्य केले. जेव्हा पाकिस्तानातील राज्यकर्ता अमेरिकेला डोईजड झाला, तेव्हा त्याची उचलबांगडी झाली किंवा तो मारला गेला. पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा खून झाला. झुल्फिकार अली भुट्टो फासावर लटकला आणि जनरल झिया विमान अपघातात ठार झाला. परवेज मुशर्रफ देश सोडून पळून गेला. इमरान खान याने अमेरिकेशी पंगा घेतला. त्यांच्यापुढे दोनच पर्याय राहिले. लियाकत किंवा भुट्टोच्या मार्गाने जाणे किंवा सत्ता त्याग करून देशातून पळून जाणे. हा लेख लिहिपर्यंत ते पळून गेलेले नाहीत, उद्या काय होईल हे सांगता येत नाही. इमरान खान यांनी सत्तेवर आल्यापासून अमेरिकेशी संघर्षाची भूमिका घेतली. पाकिस्तानी सैन्यदलाला ती परवडणारी नाही. ६५ लाख ही पाकिस्तानच्या लष्कराची संख्या आहे. लष्कराला लागणारे सगळे साहित्य अमेरिकेकडून येते. ‘मला सत्तेवरून घालवून देण्याचा अमेरिकेने कट केला आहे’ हेे इमरान खान यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांच्याविरूद्ध अविश्वासाचा ठराव आणला गेला. त्या ठरावाला सामोरे न जाता त्यांनी संसद बरखास्त केली. प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायमूर्तींनी संसद बरखास्तीचा निर्णय घटनाबाह्य ठरविला आणि रविवार दि. १० रोजी संसदेच्या अधिवेशनात अविश्वासाचा ठराव पारीत झाला आणि इमरान खान ‘क्लीन बोल्ड’ झाले. यात अमेरिका कुठे येत नाही. परंतु, अमेरिकेविरूद्ध बोलणे ही इमरानची गरज झाली. गेले ७० वर्षे अमेरिकेने पाकिस्तानला वापरले आहे. लोकांच्या मनात त्याचा राग आहे. लोकमत नेहमीच अमेरिकेच्या विरूद्ध राहिले आहे, इमरान खानला हे माहीत आहे. म्हणून अमेरिकेविरूद्धच्या भावना भडकविण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्याला कारणही तसेच झाले. पुतीनने युक्रेनवर जेव्हा हल्ला केला, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी इमरान खान मॉस्कोला गेले. अमेरिकेच्या गटातील एखाद्या देशाने रशियाशी असे संबंध वाढविणे अमेरिकेला सहन होत नाही. अमेरिकेने त्याबद्दलची नाराजी तीव्र शब्दात प्रकट केली. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील दक्षिण आशियातील विषयाचे अधिकारी डोनाल्ड लू यांनी पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत असद एम खान यांना सुनावले की,“ इमरान खानच्या भेटीचे परिणाम चांगले होणार नाहीत.” इमरान खान यांनी डोनाल्ड लू यांचे नाव घेऊन जाहीर निषेध केला. आंतरराष्ट्रीय संबंधात असे कुणी करीत नाहीत. अमेरिकेचा हा अंतर्गत कारभारातील हस्तक्षेप आहे, असे ते म्हणाले.
 
 
आता शीतयुद्ध समाप्त झाले आहे. अफगाणिस्तानात तालिबानी सत्तेवर आहेत. तालिबानी आणि पाकिस्तान यांचे संबंध चांगले नाहीत. कतार देशाच्या माध्यमातून अफगाणिस्तानशी अमेरिका संबंध ठेवून आहे. पाकिस्तानची गरज अमेरिकेला राहिलेली नाही. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही अमेरिकेची वस्तू वापरण्याची संस्कृती आहे. पाकिस्तानच्या बाबतीत त्यांनी याच नीतिचा अवलंब केलेला आहे. असे असले तरी लष्कराला अमेरिका हवी आहे. पाकिस्तानी लष्कराला खूश ठेवणे इमरान खान यांना जमलेले नाही. पंतप्रधान इमरान खान यांना संसदेत पूर्ण बहुमत नव्हते. वेगवेगळ्या पक्षांचा त्यांना पाठिंबा होता. या पक्षांना पाठिंबा देण्यास लष्कराने भाग पाडले होते. इमरान खान यांना वेगवेगळ्या खासदारांचा पाठिंबा मिळवून देण्याचे काम लेफ्टंनन जनरल फैज हमीद यांनी केले. ते ‘आयएसआय’चे प्रमुख आहेत. या फैज हमीदला हटवून त्याच्या जागी लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांची नियुक्ती करण्याचा विषय लष्करप्रमुख बाजवा यांनी घेतला. इमरान खान यांना हमीद हवे होते. हमीदमुळे आपण सत्तेवर आहोत, तेव्हा हमीदला कशाला हटवा, असा इमरानचा विषय होता. लष्करप्रमुख बाजवा आणि इमरान खान यांच्यात तणाव निर्माण झाले. अमेरिका दूर गेली आणि आता दुसरी आर्मीदेखील इमरानपासून दूर गेली. आर्मीने भूमिका घेतली की, जो सत्तासंघर्ष चालू आहे, त्यात लष्कर भाग घेणार नाही, ते तटस्थ राहील. लष्कराने तटस्थतेची भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तानातील सर्व विरोधी पक्षांना इमरानच्या विरूद्ध एकजूट करण्याचे बळ प्राप्त झाले. आपापसात लढणारे हे सगळे पक्ष एक झाले. नवाझ शरीफ यांची ‘मुस्लीम लीग’ आणि भुट्टोंची ‘पिपल्स पार्टी ऑफ पाकिस्तान’ हे प्रतिस्पर्धी पक्ष आहेत. घराणेशाहीवर चालणारे आहेत. सगळे पाकिस्तानी हे पूर्व जन्माने हिंदू होते, त्यामुळे हिंदूंचे सर्व गुण त्यांनी उचलले आहेत. त्यात घराणेशाही हा एक विषय आणि एकमेकांचे पाय खेचत राहणे, हा दुसरा विषय. पाकिस्तानातील सत्तासंघर्ष ‘घराणेशाही विरूद्ध घराणेशाही विरूद्ध इमरान विरूद्ध लष्कर’ अशा प्रकारचा आहे. आता शाहबाज शरीफ हे पंतप्रधान झाले आहेत, ते शरीफ घराण्याचे आहेत. भुट्टो घराण्याचे बिलावल भुट्टो यांचा शरीफ घराण्याशी संघर्ष ठरलेला आहे. तो कोणत्या टोकाला जाईल, हे लवकरच दिसेल.
 
 
पाकिस्तानातील सत्ता संघर्ष डोळसपणे बघावा लागतो आणि नीट समजून घ्यावा लागतो. ‘मरेना का पाकिस्तान’ असे म्हणून चालत नाही. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत. हा देश अतिरेकी दहशतवाद्यांचा अड्डा आहे. नागरी सत्ता जेव्हा अयशस्वी होते, तेव्हा दहशतवादी जागा व्यापायला सुरुवात करतात. आज लष्करामुळे पाकिस्तान काहीशा प्रमाणात टिकून आहे. या लष्करातही अतिरेकी लोक आहेत. त्यांनी दहशतवादी गट तयार केले आहेत आणि ते पाकिस्तानी सैन्याचा अनधिकृत भाग समजले जातात. त्याचा सर्वाधिक फटका भारताला बसत असतो, असे अतिरेकी जर सत्तेवर आले तर ते माथेफिरु असल्यामुळे अणुबॉम्बचा वापर करणारच नाहीत, असे कुणी सांगू शकत नाहीत. यासाठी पाकिस्तानमध्ये नागरी शासन असावे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे, त्याची आर्थिक घडी नीट बसावी. पाकिस्तानला स्थिर लोकशाही राजवट प्राप्त व्हावी, यासाठी भारताने प्रयत्नशील असावे. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानची सत्ता लष्कराच्या ताब्यात जाता कामा नये आणि दहशतवादी गट सशक्त होता कामा नये, हेच भारताला बघावे लागेल. पाकिस्तानचा इतिहास असा आहे की, कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ आजवर पूर्ण करु शकलेला नाही. एकतर त्याची हत्या होते किंवा लष्कर त्याला दूर करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफ यांच्याशी संबंध चांगले ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आता पुन्हा शरीफ घराण्याचीच राजवट आली आहे. या राजवटीशीदेखील भारत सरकारने चांगले संबंध निर्माण करून आपल्यावतीने पाकिस्तानात राजकीय स्थैर्य राहील याचा सर्वोतोपरी प्रयत्न करायला पाहिजे, यातच आपले राष्ट्रीय हित आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@