आदित्य ठाकरे हरवले आहेत! कोळी बांधव संतप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2022   
Total Views |
 
coastal road
 
 
 
 
मुंबई : मुंबईतील बहुप्रतीक्षित अशा कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामावरून सोमवारी पुन्हा एकदा स्थानिक मच्छिमार आणि प्रशासनात कडवा संघर्ष झाल्याचे दिसून आले. सोमवार, दि. २१ मार्च रोजी वरळीच्या क्लिव्हलँड बंदर परिसरात सुरु असलेल्या कोस्टल रोडचे काम स्थानिक मच्छिमारांनी पुन्हा एकदा बंद पाडल्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. 'गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही हा संघर्ष करत असून प्रशासन कुठल्याही स्थितीत आम्हाला दाद देत नाही हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या विरोधात थेट संघर्ष करण्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे आता कुठलाही पर्याय नाही,' असा इशारा स्थानिक मच्छिमारांनी 'दैनिक मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिला आहे. सोमवारी स्थानिक मच्छिमारांनी आपल्या विविध मुद्द्यांवर ''दैनिक मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधला. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक मच्छिमार तसेच कोळी बांधव आणि प्रशासनात होणाऱ्या संघर्षाची एकप्रकारे जणू नांदीच बघायला मिळाली आहे.
 
 
 
'साधारणपणे ७ जानेवारी २०२२ रोजी राज्याचे पर्यावरण मंत्री तथा वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मत्स्योद्योग मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, संबंधित विभागाचे अधिकारी आणि स्थानिक मच्छिमारांच्या प्रतिनिधींच्या एका ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत देखील आमच्या प्रश्नावर कुठलाही तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले नव्हते. आमच्या मागण्या पटवून देण्यासाठी एक तांत्रिक अहवाल तयार करण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले होते, त्या अनुसार आम्ही अहवाल विहित वेळेत प्रशासनाकडे सुपूर्द देखील केला होता, मात्र त्या अहवालावर कुठलीही कारवाई न करत तो अहवाल तसाच बाजूला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता आमची भूमिका एकच आहे की जोपर्यंत त्या अहवालावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही,' असा इशारा स्थानिक मच्छिमारांनी दिला आहे. तसेच 'आमचा आक्रमक पवित्रा बघून प्रशासनाने आम्हाला आज एका बैठकीसाठी बोलाविले आहे, मात्र आम्ही त्या बैठकीवर बहिष्कार टाकणार आहोत,' अशी स्पष्टोक्ती देखील मच्छिमारांनी 'दैनिक मुंबई तरुण भारत'कडे केली आहे.
 
 
 
'स्थानिक आमदार आदित्य ठाकरे हरवले आहेत'

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि या प्रश्नातील तथ्यांवर आमच्यासोबत चर्चा केली. मात्र, दुर्दैव असे की आमच्या या समस्या समजून घेण्यासाठी आमचे स्थानिक आमदार आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना वेळ मिळाला नाही. आमचे हाल बघायला आदित्य ठाकरेंकडे वेळ नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी भेट देण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनीं दिले होते, त्याला मोठा कालावधी उलटला मात्र ते अद्याप इथे आलेले नाहीत. आमदार महोदय क्रिकेटच्या स्पर्धेचे उदघाटन करण्यासाठी येऊ शकतात, मात्र त्यांना इथे येण्यासाठी सवड नाही. स्थानिक मच्छिमारांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यास ते तयार नसतील तर त्यांच्या आमदारकीचा आम्हाला काय उपयोग ? त्यामुळे आमचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे हरवले आहेत का ? असा आमच्या पुढे प्रश्न निर्माण झाला आहे,' अशी प्रतिक्रिया स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@